रुदन
- ना.रा.खराद
रुदन अर्थात रडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.जन्मत: बाळ रडते ,त्या रडण्यात वेदना असेल किंवा सूटका झाल्याचा आनंद देखील
असू शकतो.अश्रू केवळ वेदनेतून वाहत नाहीत तर अतीव आनंदात देखील वाहतात.तसे क्षण फार दूर्मिळ असतात.वेदना हेच रुदनाचे प्रमुख कारण असते.मग ती वेदना कोणत्याही प्रकारची असू द्या.हसण्यासोबत रडण्याचे देखील आवाज कानी पडत असतात.
रडण्याची कारणे वेगवेगळी असतात परंतु रडण्याचे कारण दु:ख हेच असते.आपल्या मनाला किंवा शरीराला झालेली जखम वेदना देते.वेदना रडण्यातून व्यक्त होते.रडण्याने ती हलकी होते.लहान बाळांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत सर्व रडतात.
शाळेत मास्तरांनी छडीचा मार दिला की मुले रडतात.एखादे खेळणे नाही दिले की रडतात.
आईने बाहेर सोबत नाही नेले किंवा भूक लागली अशा अनेक कारणांमुळे बालकं रडतात.रडणारे मुल क्षणात हसायलाही लागते.त्याच्या छोट्या विश्वातले ते रडणे पुढे
पुढे मोठे रुप धारण करते.मनासारखे घडले नाही, मनाविरुद्ध काहीतरी घडले की रडू कोसळते.मोठे नुकसान झाले किंवा प्रिय व्यक्तिचा वियोग घडला की रडू येते.मुलीला सासरी पाठवितांना वाहिलेले अश्रू एक अमूल्य ठेवा असतो.भेटीमुळे झालेला आनंद
ते आनंदाश्रु असतात.अगतिकतेतून वाहिलेले
अश्रू फार वेदनामय असतात.इतरांनी दिलेली
टोमणे,उपहास, अवहेलना यातून देखील रडू
कोसळते.भावूक , संवेदनशील व्यक्तिला चटकन रडू कोसळते.डोळे पुसणारे कुणाचे हात असले तर ते रडणे आल्हाददायक होते.
कुणी लोकांत रडते,कुणी एकांतात. कुणी इतरांसाठी रडते ,कुणी इतरांमुळे 😭 रडते.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्तरडतात.कोमल मन लवकर रडते.कधी रडणे लपवावे लागते
तर कधी ते टाळावे लागते.धाय मोकलून रडणारे असतात तसे विना अश्रू रडणारेही.
कुणी मयतांसाठी रडते,कुणाला जिवित रडवतो.रडणे रडविण्याचे नाट्य या जगात सतत सुरू असते.कधीच न दडलेली परंतु इतरांना कायम रडवणारी नराधम माणसेही असतात.इतरांच्या रडण्याने रडणारी माणसे
असतात तशी इतरांच्या रडण्यावर हसणारीही
असतात.आसवांची भाषा समजण्यासाठी भावनेची भाषा अवगत लागते.आपल्यामुळे नाही तर आपल्यासाठी अश्रू वाहणारं कुणी तरी असावे एवढे मानवी भाग्य लाभले तरी पुरेसे!