माध्यमे

                 माध्यमे
                     - ना.रा.खराद
आईच्या माध्यमातून आपला जन्म होतो आणि अशा कितीतरी माध्यमातून आपले जीवन सरकत असते.आईशी नाळ तुटली की पुढे कितीतरी ठिकाणी जोडली जाते.आपले शरीर देखील एक माध्यम आहे आणि शरीराचा प्रत्येक अवयव हे देखील माध्यम म्हणजे साधन आहे.कोणतीही कशाच्या तरी किंवा कुणाच्या तरी माध्यमातून पूर्ण होते.सर्व साधने माध्यम आहेत.साधने साध्य नसतात आणि साधना शिवाय साध्य नसते.
डोळे हे बघण्याचे साधन आहे, माध्यम आहे.पाय चालण्याचे माध्यम आहे.वाणी बोलण्याचे माध्यम आहे.
घरातील नळ पाणी येण्याचे माध्यम आहे, वीजेची तार वीज पोहचविण्यासाठी माध्याम आहे.तारेच्या मार्फत वीज पोहचते , परंतु तार वीज देऊ शकत नाही,ती फक्त वहन करते.वाहक फक्त साधन आहे.
आपण विहिरीला पाणी लागले म्हणतो, परंतु आपण फक्त विहिरीच्या माध्यमातून ते पाणी बाहेर काढतो.विद्युत मोटारींच्या माध्यमातून ते पाणी बाहेर उपसतो.पाईपच्या माध्यमातून ते बाहेर येते.आईवडिलाच्या संपर्कातून गर्भधारणा होते,मुलं जन्माला येते.
अन्न पाणी व आक्सिजनच्या माध्यमातून आपण जिवंत रहातो.अनेक माध्यमे किंवा साधने एकत्र करून स्वयंपाक तयार होतो.वस्राच्या माध्यमातून अंग झाकल्या जाते.स्पिकरच्या माध्यमातून आवाज प्रसारित होतो.आपण याकडे साधने म्हणून बघतो , डोळे बघतात असे आपणास वाटते, परंतु डोळे बघण्याचे फक्त साधन आहे.पायाचा उपयोग चालण्यासाठी आहे, म्हणजे पाय म्हणजे जीवन नाही, ते तर फक्त साधन आहे.आपला देह म्हणजे फक्त साधन आहे, आपण साध्य शोधले पाहिजे.
दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरणे किंवा वर येणे केले म्हणून दोरी साध्य ठरत नाही,ती फक्त साधन आहे.असेही होते की एका साधनातून दूसरे साधन प्राप्त केले जाते, तरीही ते साधनच आहे, साध्य नाही.
जीवनाचे साध्य समजून घेणे खूप आवश्यक आहे.अंथरुन हे साधन आहे, झोप हे त्याचे साध्य आहे.
परंतु झोप हे साध्य असू शकते का? अर्थात नाही,ते फक्त विश्रांतीचा मार्ग आहे, माध्यम आहे.मार्ग हा साध्य नसतो,साधन असतो.
डाक्टरच्या माध्यमातून उपचार होतो, डाक्टर देखील औषधांचा साधन म्हणून वापर करतो.तसेच शिक्षणाचे आहे.आपण बोटाने पेन धरतो, परंतु बोट हाताच्या मदतीने चालतात आणि हात देखील खांद्यावर जोडला गेला आहे.हे सर्व वेगवेगळे दिसत असले तरी माध्यमे जोडल्या गेली आहेत.मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधला जातो.चरख्याच्या माध्यमातून रस काढला जातो.
मातीच्या माध्यमातून धान्य उगते,बीज हे माध्यम,पाणी हवे सर्व माध्यमे एकवटून इतर माध्यमांना जोपासतात.
आपण अशा कितीतरी माध्यमातून जगत असतो.अनंत साधने आपल्या उपयोगी पडतात, परंतु त्याची जाणीव आपणास नसते.उपकार वगैरे आपण किती केले असे आपण बोलतो, परंतु आपल्यावर किती कित्येकांचे उपकार आहेत हे विसरतो.
जसे पैसा हे साधन आहे, विनिमयाचे माध्यम आहे हे लक्षात घेतले पाहिजे.पैशांमार्फत आपण व्यवहार करतो, म्हणून पैसा हे साध्य ठरु नये.
आपण कुणाच्या उपयोगी पडलो, यामध्ये जीवनाची सार्थकता आहे.त्याचा अंहकार बाळगण्याची मूळीच गरज नाही, आपण फक्त निमित्त असतो, आपण नसतो तर दूसरा कुणी असता, त्यामुळे मीपणा असता कामा नये.
जीवनाचा हा सर्व खेळ विविध माध्यमांतून चालतो,
तो समजून घेतला पाहिजे.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.