- ना.रा.खराद
माणूस! खुपच अजब जीव.तो चिंता करतो,काळजी करतो,भय बाळगतो,हताश होतो,उदास होतो ,निराश होतो.तो आत्महत्या करतो.आत्महत्या करणारा एकमेव जीव म्हणजे मानव.इतर जीवांची हत्या होते, पण ते
जीव आत्महत्या कधीच करत नाहीत. नैराश्य
अखेर असते काय,ते कशाने येते? ते येते, आपल्या बुरसटलेल्या विचाराने.ते येते अज्ञान आणि मूर्खपणाने.ते येते आत्मबळ नसण्याने.
ते येते जगाला सुखी समजल्याने,स्वतःला करंटा समजल्याने. आहे ते कमीच आहे असा न्यूनगंड बाळगल्याने.हे सर्व घडते मनात .आपल्या विचारात. विचार कधी बदलतात? तसा विचार केल्याने. आपण कसा विचार करतो,यावर सगळे अवलंबून आहे. जीवनाचा अर्थ समजून न घेतल्याने,आपले मन न समजल्याने, मलाच सर्व कळतेअसे वाटल्याने मनुष्य एकांगी बनतो.
जीवन हसत खेळत जगण्यासाठी सगळे मानसिक
विकार दूर ठेवावे लागतात. आपली कोंबडी
मेली म्हणून जीव गमावणारेही असतात.
माझे नशीब चांगले नाही, मला कुणी विचारत
नाही असा सतत विचार करणे मानसिक आजाराकडे घेऊन जाते. आपल्या कुणीच कामं येत नाही.
सगळे माझे वाईट करु पहातआहेत किंवा या जगात कुणीच चांगले नाही अशा मानसिकतेतून नैराश्य निर्माण होते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपणास निराश बनवतो.आपल्या अवतीभवती लोक किती आनंदी आहेत, मलाच तसे का जगता येत नाही हा विचार देखील नैराश्य आणतो.
जगण्याची कला जमली पाहिजे. तुमच्याकडे
काही असो वा नसो.जगता आले पाहिजे. त्यासाठी हवं असतं निरोगी मन.त्यासाठी हवंअसतं धैर्य. हवा असतो आशावाद. आहे ते स्विकारण्याची तयारी. असे हवे होते, मी अमूक गमावले हे पालपूद काही उपयोगाचे
नाही. माझी लायकी काय आणि मी काय काम करतो हा समज देखील निराश बनवतो.
हे जीवन हि एक गंमत आहे. आहे ते सर्व ठीक आहे. असेच हवे असा आग्रह मनोरोग आहे. हवेत मनोरे बांधणे योग्य नसते. मी हे करून दाखविल असे म्हणणे उपयोगाचे नसते. मी माघार घेणार नाही, मी सोडणार नाही असली भाषा मनोरोग आहे. जीवन समजले तर काहीच नसते.
परीक्षेत एक गुण कमी मिळाला म्हणून निराश होणे अवगुण आहे. इतरांशी तुलना करून आपले मानसिक
स्वास्थ्य खराब करणे गरजेचे नाही. आपल्या
ठिकाणी सर्व श्रेष्ठ असतात. न्यूनतेचा भाव नैराश्य आणतो.
इतरांबद्दलचा अत्यधिक द्वेष देखील नैराश्य आणतो.
मानवाशिवाय या जगात इतर हजारों जीव जंतू आहेत. त्यांना विसरु नका.त्यांच्याशी मैत्री करा.झाडे वेली तुमची वाट बघत आहेत
थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवा.माणसांचा विचार सोडूनद्या.माणूसकाय,तुमच्यासारखाच भरकटलेला,बुरसटलेला,बहकलेला,खुळचट,बावळट,हलकट,हेकरट,स्वार्थी, लफंगा,मूर्ख आहे .त्याची संगत सोडा.पदं,संघटना,पैसा,स्पर्धा, जातीवाद,युद्ध, दंगली,मारामारी, कोर्ट हे मानवाचे चाळे त्याचा संसर्ग होऊ देऊ नका.नाव कमावणे,लोकांच्या टाळ्या मिळवणे,बक्षीस मिळवणे हे मानसिक रोग आहेत. सगळे
क्षणभंगुर असतांना का म्हणून हा आटापिटा
करायचा.स्मशानात वेगळे बोलायचे आणि
घरी आले की पुन्हा तेच.आहे तिथे आनंदी
जगता आले पाहिजे. त्यासाठी हवे असते
ताजे मन.मोकळे मन,मोठे मन.आकाश
न्याहळणारे डोळे. मोकळा श्वास घेणारे ह्रदय
आणि मोठा विचार करणारे मन.
चला तर आनंदाने जगूया.नैराश्य जाळून टाकूया.