- ना.रा.खराद
💒 लग्न, प्रत्येकाच्या जीवनात किमान एकदा येणारी गोष्ट, अपवादात्मक दोनदा!असो.लग्न जमणे हे मोठे दिव्य असते.आयुष्यभरचा जोडीदार निवडणे तसे
सोपे नसते.दोन रुपयांची वांगी आपण निवडून घेतो, ही तर सात जन्माची साथ.
लग्नाच्या तशा अनेक प्रथा होऊन गेल्या, आजही अनेक जाती,धर्म आणि भागात त्यांचे एक वेगळेपण आहे.काहीही असले तरी लग्न ते लग्नच.
प्रचलित पद्धतीनुसार सर्वाधिक लग्ने ठरवून
होतात.नातीगोती बघून, आर्थिक समानतेलाही महत्व दिले जाते.सौंदर्य, स्वभाव बघितला जातो.पैशाची किंवा दागिन्यांची देवानघेवान होते.जेवनावळी उठतात, मानपान होतात.
पूर्वी लग्न बहुदा जून्या नात्यात जुळवली
जायची, कुणीतरी मध्यस्थीने ते जुळलेलं असायचं.इतरांना त्याविषयी फार औत्सुक्य
नसायचं.मुलींचे शिक्षण कमी असायचे किंवा लगेच नसायचे.मुलेही खुप शिकलेली नव्हती.शेती , व्यवसाय वडिलांचा बघितला जायचा ,मुलगा कमावता असला पाहिजे अशी अट नव्हती.आजच्या काळात वडिलांची कितीही संपत्ती असली तरी मुलगा काय करतो हा प्रश्न केला जातो.
मुली उच्चशिक्षित असल्याने त्याही उच्चशिक्षित मुलांशी लग्न करु इच्छितात.मोठ्या शहरांकडे वाढणारा ओढा
त्यामुळे आर्थिक सुबत्ता आवश्यक झाली.जोडीदार कमावता हवा ही अपेक्षा मूळ धरू लागली.व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व वाढले.खेड्यातील उपवर वर होण्याची वाट बघू लागली.कष्टकरी, शेतकरी यांच्या मुलांना कुणी मुलगी द्यायला तयार नाही.खेड्यामध्ये रहावे लागेल, संयुक्त कुटुंब, सासु सासरे असतील, त्यांच्या बंधनात नकोसे वाटते.नोकरी हवी असे बहुतेक मुलींना वाटते.मुलांना देखील नोकरी करणारी मुलगी हवी .या आर्थिक गणितात संसाराचे गणित बिघडत चालले आहेत.प्रेमाची, जिव्हाळ्याची माणसे पैशाने मिळत नसतात.माणसाला माणसाची किती गरज असते, हे गरज पडल्यावर कळते.सर्वकाहीअसूनही काहीही नसल्याचे जाणवते.
लग्नगाठ फार जपून बांधली पाहिजे.लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.मौजमस्ती नाही,तर तो एक यज्ञ आहे.
मुलींचे नुसते सौंदर्य बघुन किंवा मुलांची संपत्ती बघून लग्न उरकून घेणे पश्चात्तापाची वेळ आणते.बहुतेक विवाहित मुलेमुली नंतर पश्चात्ताप करताना दिसतात ह्याचे कारण सारासार विचार न करता जमवलेले लग्न!
कधी मुलाच्या,कधी बापाच्या आग्रहाखातर लग्न जुळवले जाते.कधी आर्थिक बाबींकडेबघून.इतर बाबींचा विचार केला जात नाही आणि यातून पुढे अडचणी येतात.
लग्न म्हणजे केवळ दोन मुले मुली एकत्र येतात असे नाही तर दोन कुटुंबे व त्या अनुषंगाने अनेक नाती जुळतात.
पंचांग हा एक लग्नजुळण्यामधला मोठा घटक आहे.भटजीबुआ नावावरुन, जन्मकुंडली बघून त्यामध्ये काय शोधतात कोण जाणे.आतापर्यंतची कोट्यावधी लग्ने भटजींनी जुळवलेली आहेत, परंतु ती अजुनही जुळलेली नाहीत.नवराबायकोच्या रोजच्या कटकटी बघता ,टोकाची भांडणे किंवा घटस्फोट बघता हे पंचांग नावाचे शास्त्र फार काही उपयोगाचे आहे असे वाटत नाही.जन्माची गांठ पंचांगाच्या किंवा भटजींच्या भरोशावर बांधणे केव्हाही चूकीचे.
फक्त मंगलाष्टकात नाही तर लग्न जूळवण्यापूर्वी सावधान असावे.अगोदर काळजी घेतली तर नंतर सावधान असण्याची गरज नाही.
पाळण्यात होणारी लग्ने पासून तर वयाची
चाळीशी गाठली तरी लग्न न करणारी किंवा जुळणारी मुले मुली आज दिसत आहेत.माणसाचे आयुष्य आता किती कमी झाले आहे.शंभरी गाठू शकेल असं कोणी उरले नाही.अशावेळी लग्न उशिरा करणे
शहाणपणाचे नाही.योग्य वयात लग्न व्हावे.
करिअरच्या नावाखाली जीवन खराब करु नये.
हल्ली मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.शिक्षित मुली तर स्वतःच निर्णय घेत आहे.तो माझा अधिकार आहे,असे कायद्याच्या भाषेत बोलत आहे.तारुण्यात भावनेच्या आहारी जाऊन कित्येकदा आयुष्याचे मातेरे होते, ते होऊ नये म्हणून आईवडिलांना काळजी असते.त्यांची मध्यस्थी फार मोलाची असते.सर्वांच्या सहमतीने लग्नासारखा महत्वाचा निर्णय घेतला जावा.
लग्नात अनाठायी खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो.ज्यांची ऐपत नाही,असे लोक आपल्या मुलामुलींच्या लाडापायी किंवा प्रतिष्ठेसाठी अमाप खर्च करतात.ही पोकळ ऐट सोडली पाहिजे.थोडक्यात लग्न उरकलेले केव्हाही उत्तमच!
मुलींकडच्या मंडळींचा सन्मान राखला जाईल ह्याची काळजी घेतली पाहिजे.बडेजाव न करता,एक सोज्वळ असा सोहळा पार पडला पाहिजे.पैशाची उधळण नको,तशी फार काटकसर नको.पाहुण्यांचा योग्य असा पाहुणचार केला जावा.रुसवेफूगवे तर बंदच व्हायला हवे.मानपमानाचे नाटक तर मूळीच नको मुलामुलींचा एखादा गंभीर आजार किंवा मानसिक आजार लपवून ठेऊ नये.लग्न खोटी संपत्ती दाखवून किंवा सांगून जमवू
नये.जे आहे जसे आहे तसेच ते सांगितले जावे, नसता पुढे फार अडचणी येतात.वेळीच सावधान असावे.
यंदा कर्तव्य असेल तर, शुभमंगल उरकायचे असेल तर सावधान.....
शुभमंगल सावधान.....!