- ना.रा.खराद
या जगात सर्वकाही सापडेल, परंतु एक मूर्ख मनुष्य सापडणार नाही.मी स्वतःला शहाणा माणूस समजत असल्याने किंवा तसे प्रमाणपत्र मला काही लोकांनी बहाल केले असल्याने मी मूर्ख नाही,असा समज मी करुन घेतलेला आहे, तरीही काही लोक मला मूर्ख समजत असल्याने,मी स्वतःला मूर्ख समजले असते, परंतु मीच त्यांना मूर्ख समजत असल्याने,मूर्खाचे मनावर घ्यायचे नसते,असे अनेक शहाण्या लोकांनी मूर्खाना सांगितलेले आहे.
मूर्खपणा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तो प्रत्येकाने मिळवलेला आहे.मूर्खपणाचे धडे बालवयातच, अगोदरच्या नामांकित मूर्खाकडून मिळतात, मूर्खपणाची देखील आपली संस्कृती असते, तिचे पालन सर्व करताना दिसतात.
अनेक कवी, साहित्यिकांना भेटलो, त्यांनी अनेक मूर्खांची
नावे सांगितली, पैकी अनेक त्यामध्ये साहित्यिक होते.एकमेकांना मूर्ख संबोधणे साहित्यिक लोकांचे शहाणपण असते.वाद चालणे ते बुध्दीमत्ता समजत असल्याने,तिथे दाळ शिजली नाही.
स्वतःला वगळून जगातील सर्व माणसे मूर्ख आहेत,असे समजले जाते, आपल्यापेक्षा कुणी ज्ञानी , बुद्धीमान किंवा चतुर असू शकतो हे मूळीच आपण मान्य करत नाही. शहाणी माणसे तर पाऊलोपावली भेटतात, परंतु एखादा मूर्ख अद्याप भेटलेला नाही.मी ज्यांना मूर्ख समजत होतो, ते तर खूपच हुशार वाटले , त्यांनी आम्ही कसे मूर्ख नाहीत आणि कसे शहाणे आहोत हे दोन्ही समजावून सांगितले.
आतापर्यंत जगात अनेक गोष्टींचा शोध लागला, परंतु मूर्ख माणूस अद्याप सापडेना.शेख चिल्ली हा तर गोष्टीतला मूर्ख माणूस, खराखुरा मूर्ख माणूस मी शोधण्याचे ठरवले, तसे मित्रांना बोलून दाखवले.मित्र म्हणे,हा काय मूर्खपणा?
तरीही मी निराश झालो नाही, वाळूचे कण रगडीता..
ऐकलेले होते, कित्येकवेळा तेला ऐवजी वाळू घेऊन आलो, परंतु तेल काही गळले नाही.मनातल्या मनात.
मनुष्य इतरांना मूर्ख फार लवकर समजतो, शहाणपणविषयी तो चोखंदळ असतो.या जगात सर्वच माणसे इतरांना मूर्ख समजतात, परंतु कुणीही स्वतःला मूर्ख समजत नाही,मग अशावेळी मूर्ख मनुष्य शोधणे खुप अवघड होऊन बसते.तरीही मी प्रयत्न सोडणार नव्ह्तो.
शाळेत असताना शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांना मूर्ख म्हंटलेले मी ऐकलेले आहे, परंतु शहाणा कधीच नाही.फार शहाणा झाला,असे म्हणाले , परंतु फार शब्दांमुळे त्यातला उपरोध किंवा टोमणा लक्षात आला.
मूर्खाचा शोध या मोहिमेला सुरुवात केली, खुप लोकांना भेटलो, परंतु प्रत्येकाने दूसऱ्याकडे बोट दाखवले.जे नामांकित मूर्ख होते, त्यांनाही भेटलो.त्यांनी मला विचारले, तुम्हाला कुणी मूर्खाने आमचे नाव सांगितले?
दारुच्या अड्डा बघितला , इथे असेल वाटले . परंतु त्यांच्या गप्पा ऐकून मी चकित झालो, जगातील सर्व ज्ञान त्यांच्याकडे होते, प्रत्येक मद्यपी, 'तुला नाही समजत, माझे ऐकून घे' असे ठणकावून सांगत होता.बरं, कुणाला सरळसरळ विचारणे शक्य नव्हते,' तुम्ही मूर्ख आहात का?'
घराघरांतून नवराबायको एकमेकांना मूर्ख म्हणतात, ह्याचा अर्थ दोघेही मूर्ख आहे,असा होतो, परंतु मान्य कोण करणार?
धार्मिक लोक तर मूर्ख नसतातच असा त्यांनी समज पसरवला आहे,उलट जग हे कसे अज्ञानी आहे, लोक कसे मूर्ख आहेत,हेच ते पटवून देत असतात.
शिकलेली माणसे तर स्वतःला मूळीच मूर्ख समजत नाही, मिळवलेल्या पदव्या दाखवत , आपण शहाणे किंवा बुद्धीमान असल्याचे प्रमाणित करतात.शिकलेला माणूस मूर्ख नसतो,असा प्रचार करुन, आपल्या मूर्खपणावर पांघरूण घालतात.
तरुण तर मूर्ख लगेच नसतात, आपण जे करतो ते कितीही चूकीचे असले तरी, वृद्धांना, तुम्हाला नाही कळत असे बोलून आपला मूर्खपणा झूगारुन लावतात.
सत्ता आणि पैसा असलेले लोक तर या दोन गोष्टी मूर्खांकडे नसतात,असे समजतात.आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही समजदार,शहाणे आहोत.
अनेक ग्रंथात पुरुष लेखकांनी स्त्रियांना अक्कल नसते,अशी विधाने केली आहेत.तिथेही संपर्क केला, मात्र स्री घरची लक्ष्मी असते पासून तर जिथे स्त्रियांचा आदर होतो इथपर्यंत स्त्रियांचा महिमा ऐकला आणि माझ्या पदरात तिथे काही पडले नाही.
काही बालके दिसली , इथे तर भेटेल एखादा मूर्ख.परंतु
बालक निरागस असते, निष्पाप असते असे मी ऐकलेले होते,मग ते मूर्ख कसे असणार?
जिकडे तिकडे शहाणी माणसे, एकही मूर्ख सापडेना,शेवटी स्वतःला मूर्ख समजले आणि मोकळा झालो, निदान एका तरी माणसाने स्वतःला मूर्ख समजण्याचा शहाणपणा दाखवला ,ह्याचा मनोमन आनंद झाला.