माणसे अनेक प्रकारची असतात, त्यापैकी आळसी माणसे हा एक इरसाल नमुना आहे.आपले उभे आयुष्य या लोकांनी आडवे करून टाकलेले असते.झोपेतून क्वचितच जागे होणारी ही जमात असते.आपला जन्म हा झोपण्यासाठी आहे, अशी यांची समजूत असते.आपले ओझे दूसऱ्याच्या खांद्यावर टाकून हे लोक मोकळे होतात.
कोणतेही कार्य करण्याचा उत्साह नसलेले हे लोक म्हणजे भूमीला भार असतात,ऐतखाऊ असतात.
आळसी माणसाचे पोट मोठे असते,पण ते भरण्यासाठी तो श्रम करायला तयार नसतो.इतरांच्या श्रमावर जगणारी
ही परजीवी जमात असते.'दे रे हरी पलंगावरी' अशी वृत्ती यांच्या ठायी असते.आळसामुळे आहे ते गमावण्याची नामुष्की ओढवली जाते.निरुत्साह यांची खासियत असते.उद्या करु,नंतर बघू असे यांचे पालपूद असते.धैर्य नसलेले हे लोक नेहमी आळसावलेली असतात.इतरांना निरुत्साही करणे यांचा धर्म असतो.
अंगी कितीही बळ असले तरी ते कोणत्याही कामासाठी वापरायचे नाही,अशी भावना बळावलेली असते.आहे तेच
मोडून तोडून खायचे, अल्पसंतुष्ट अशी ही माणसे असतात.आळसामुळे कुस देखील बदलण्याची तसदी ते घेत नाहीत.आळसी माणसाचा देव नेहमी झोपेत असतो.आळसी माणसांना आपली जवाबदारी कळत नाही, कर्तव्य कळत नाही.आळसामुळे अनेक अनर्थ ते ओढवून घेतात.
या पृथ्वीवरील सर्वच जीव स्वतःचे पोट भरण्यासाठी भ्रमण करतात,आळस झटकून काम करतात, परंतु मानवामध्ये ऐतखाऊ मानव हा अविकसित प्राणी जन्माला आला आहे.जो कष्ट न करता पोट भरतो.कुठलाही
स्वाभिमान नसलेले हे लोक इतरांना मात्र डोकेदुखी ठरतात.कुणाच्या तरी दयेवर जगणारे हे भिकारडे लोक उपाशी मेले पाहिजेत.यांना पोसण्याची गरज नाही.जो पिकवित नाही,तो खातो कसा? हा विचार करावयास हवा.
काहींनी तर आळसचा कळस गाठलेला असतो.आळसाला त्याने मित्र बनवलेले असते.अंगावर घोंघावणाऱ्या
माशांना हाकलून जो लावत नाही, निपचित पडून राहतो,असले दळभद्री लोक कुटुंबाला कलंक असतात.
आयत्या पीठावर रेघोट्या ओढत आयुष्य पुढे ढकलण्यात हे पटाईत असतात.निरुत्साह हाच यांचा स्थायीभाव असतो.
आळसी कायम अपयशी असतो, चूकून देखील यशस्वी होत नाही.जो काहीच करत नाही,त्यांच्याकडून काय होणार.आळसामुळे तो अप्रिय होतो,एकाकी पडतो.लाचार बनतो.त्याच्या ठायी काम न करण्याची प्रवृत्ति असते.
काम पुढे ढकलण्यात तो तरबेज असतो.टाळाटाळ करतो.अठराविश्व दारिद्रय असले तरी हातपाय हलवायला तो तयार नसतो, फक्त हात पसरवतो.
आळसीपणामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत.नात्यामध्ये वितुष्ट येण्यामागे हा आळस कारणीभूत असतो.कुणीतरी काबाडकष्ट करतो आणि कुणी ऐतखाऊ असतो.कष्टाशिवाय पर्याय नसतो, आळसाने अधोगती होते.अंग झटकून काम केल्याविना यश लाभत नाही.उत्साही जीवन जगण्यासाठी आळस झटकून टाकला पाहिजे.कोणतेही काम तत्परतेने केले पाहिजे.आळस हा आपला खुप मोठा शत्रू आहे, हे ओळखून त्याचा
वेळीच खात्मा केला पाहिजे.