वैचारिक अधिष्ठान
- ना.रा.खराद
कोणतेही कृत्य अविचाराने,अविवेकतेने करु नये,त्यास वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे.आपले मत हे तर्कशुद्ध असले पाहिजे.आपला विरोध किंवा समर्थन यामागे विचार पाहिजे.मोघम,ढोबळ तर्कहीन गोष्टी
अज्ञान, वेंधळेपणा असतो.आपली आस्तिकता, नास्तिकता यामागे वैचारिक अधिष्ठान हवे, नुसते मानतो किंवा अमान्य करतो, हे पटण्यासारखे नाही.
आपले बोलणे उचलली जीभ लावली टाळ्याला असे असू नये, कुणी प्रश्न केला तर त्याचे स्पष्टीकरण,तर्क देता आला पाहिजे.निरुत्तर होणे योग्य नसते.असे तेव्हाच होते जेव्हा आपण तर्कहीन विधान करतो.आपले चिंतन ,मनन नसेल,आकलन नसेल तर आपसूकच अविचार बाहेर पडतो.विचारहीन बोलणे हे अर्धवट,उथळ स्वरुपाचे असते.तोंडातून बाहेर पडणारे शब्द,अगोदर तपासले पाहिजे,मूर्खासारखी बडबड
करु नये.उगीच काही तरी बोलून वातावरण दूषित करु नये, वितंडवाद होतो तो अविचाराने, आपल्या बोलण्यात वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे.
शब्द हा विचार असला पाहिजे.तो सत्य असला पाहिजे.तो सत्य असण्यासाठी त्यावर विचार केलेला असला पाहिजे, त्यामागे तर्क असला पाहिजे, तेव्हा तो परिणामकारक होतो.इतरांचे ऐकून आणि समजून घेतल्याशिवाय आपले मत मांडू नये.कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतला जावा.सबब तर्कशुद्ध असावी.
मी सांगतो,मी म्हणतो केवळ असे बोलून अविचार लादू नये, त्यामागील विचार सांगता आला पाहिजे, आपल्या मताशी सहमत होण्यासाठी वैचारिक अधिष्ठान हवे.
खंडन आणि मंडन करण्याची ताकद आपल्या विचारात असली पाहिजे, नुसती बडबड म्हणजे विचार नाही.
विचार खुप मोठी ताकद आहे.न्यायालयात आपले मत तर्कशुद्ध मांडणी केली तरच मान्य होते.उगीच
आकाटतांडव करुन मत खरे करता येत नाही.वैचारिक अधिष्ठान नसलेले लोक आग्रही, उतावीळ, भांडखोर असतात, आपले मत बळजबरीने लादू पाहतात.वैचारिक अधिष्ठान नसेल तर हसू आणि फजिती होते.
समाजातील अनेक गोष्टी अशाच तर्कहीन असतात, त्या फक्त चालत आलेल्या, चालवलेल्या असतात.थोडा जरी विचार केला तरी त्या बंद होऊ शकतात, परंतु फक्त परंपरा वगैरे म्हणून त्या सुरू ठेवणे कितपत योग्य आहे? जितके अविचार पसरतात, तितके विचार गुदमरून जातात.कुठलेही वैचारिक अधिष्ठान नसताना हजारों कर्मकांड बिनदिक्कत सुरू आहेत, त्यांच्याकडे त्याचा कुठलाही तर्क नाही.
कोणतेही कृत्य अविचाराने करु नये.काहीही केले, नाही केले यामागे मत असले पाहिजे, ते मत तर्कशुद्ध असावयास हवे,मतांवर असू नये.कुणाच्या उलट प्रश्नाने विचलित किंवा डळमळीत होईल इतके तकलादू असू नये.तर्कामध्ये विजय आपलाच होईल इतकी वैचारिक ताकद त्यामागे असली पाहिजे, पोरकटपणाचे
बोल असू नयेत.