नोकरीतले दुःख ती केल्याविना कळत नाही.

   
                               नोकरीतले गौडबंगाल!
                                                        - ना.रा.खराद
   नोकरी! किती गोड शब्द.नोकरी मिळाली की पेढे वाटले जातात.अभिनंदन आणि शुभेच्छांचे
मेसेज येऊ लागतात.नोकरी मोठी असेल तर हारतुरे मिळतात.स्वागत सत्कार होतात.प्रत्येक
शिकलेला नोकरीच्या शोधात असतो.एका जागेसाठी लाख इच्छुक असतात.एकेकाळी कनिष्ठ असलेली नोकरी पहिल्या स्थानावर कशी पोहचली कळलीच नाही.
नोकरी असली की चिंता मिटली असे वाटते.पेन्शन वगैरेमुळे म्हातारपण देखील मजेत.मुलीसाठी वर शोधतांना नोकरीस प्राधान्य,आता तर 👰 वधू संशोधन देखील सुरू झाले ,तिथेही नोकरीची अट.तसा नोकर हा शब्द
प्रतिष्ठेचा नाही पण नोकरी हा शब्द प्रतिष्ठेचा बनला आहे.नोकरीत मिळणारा मानसन्मान, साहेब ,सर वगैरेचे संबोधन सुखावून जाते.
नोकर असला तरी कामाचा मालक असतो.काम अडविले की चिरीमिरी मिळते हे आता सर्व
नोकरदारांना माहिती झाले आहे.सरकारी कार्यालय,साधने ह्याचा वापर करता येतो.अंगावर सरकारी झूल असली की झाले!
नोकरीवाल्यांची बायकां पोरे तर पार खुश असतात.घरातमध्ये फूकटचे पैसे येतात ,असाच
त्यांचा समज असतो.नोकरीमुळे विभक्त झालेले कुटुंब चंगळवादी बनते.नवऱ्याच्या नोकरीमुळे
बायको देखील भाव मारते.नवरा अधिकारी असेल तर साहेबांचा कसा दरारा आहे,मोठे साहेब तर त्यांना डोक्यावर घेतात वगैरे असे बोलले जाते.नोकरीमुळे कायम खुळखुळणारा पैसा.एक तारीख हा तर सणासुदीच्या दिवसा
सारखाच असतो.नीटनेटका पेहराव,गाडी वगैरे असतेच, त्यामुळे नोकरी हवीशी वाटते.
नोकरी मिळविणे हे जसे दिव्य,तसे नोकरीवाला वर शोधतांना नाकीनऊ येतात.नोकरीचे हे डोंगर
दूरुन साजरे दिसते.जो नोकरी करतो हे फक्त त्यास ठाऊक असते.जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.नोकरीचे दु:ख हे नोकरीच्या सुखापेक्षा खुप जास्त असते.लाखाचा नोकर होण्यापेक्षा हजाराचा मालक बरा असेच वाटू लागते.एकदा
नोकरीचे जू खांद्यावर पडले की घाण्याच्या बैलासारखे जागेवर फिरत रहायचे.पुन्हा सुटका
नाही आणि जेव्हा सुटका होईल तेव्हा जगण्याची लायकी रहात नाही.उभे आयुष्य नोकरीत घालायचे आणि आडवे व्हायचे.
जो कुणी नोकरी करतो तो गरज म्हणून करतो,आवड म्हणून नाही.अनेक मोठे अधिकारी आपल्या गरीबीचे किस्से सांगतात. पैशाची गरज पूर्ण होते परंतु त्याची कुचंबणा संपलेली नसते.वरवर दिसणारा रुबाब हा पोकळ असतो.नोकरी म्हणजे धरलं तर चावतं
आणि सोडलं तर पळतं,अशी गत असते.आठवड्यातून एक मिळणारा रविवार.
त्याचेही नियोजन दूसरेच करतात.किती केविलवाणा हा प्रकार.वेळेचे बंधन ही तर नोकरदारांना मोठी डोकेदुखी असते.ससेहोलपट बघायला मिळते.त्याची ती धावपळ त्यास मेटाकुटीला आणते.शारिरिक आणि मानसिक
स्थिती कशीही असो,त्यास वेळेवर पोहचावे लागते.पुन्हा नोकरीची आपणास गरज त्यामुळे
निमुटपणे सर्व सहन करावे लागते.लोकांना पैसे खाल्लेले दिसतात पण बोलणे खाल्लेले दिसत
नाहीत.नोकरीत वरिष्ठांना मान सन्मान द्यावाच लागतो.अर्धा पगार तर त्याच कामाचा असतो.
नोकरी म्हटलं की बदलीची टांगती तलवार कायम डोक्यावर असते.काम करत असतांना
इतरांच्या सोबत रहावे लागते,त्या़ंच्याशी जुळवून घेणे जमले तर ठीक नसता ,नसता मानसिक त्रास होतो.तपासण्या, चौकशी, मूल्यमापन अशा विविध जाचातून जावे लागते.
लोकप्रतिनिधी मालक असल्यासारखे नोकरदारांशी वागतात.सामान्य माणूस देखील
तुम्ही आमचे नोकर आहात असे मोठ्या दिमाखात बोलतो.नोकरदारांना चाकरमानी का
म्हणतात, आता उमगले. नोकरीची ही आतंरबाह्य बाजू मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.आपणास काय वाटते कळाले तर बरे होईल.
              
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.