- ना.रा.खराद
सतत कानी पडणारा प्रश्न ," किती वाजले ?" मनातल्या मनात देखील हा प्रश्र्न कायम पडलेला असतो.झोपण्यापूर्वी,झोपेत जाग आल्यानंतर किंवा झोपेनंतर प्रथम प्रश्न ," किती वाजले?"
जन्म देखील किती वाजता झाला हे लगेच बघितले जाते, लिहून ठेवले जाते.घड्याळाचे कायम फिरणारे तीन काटे जसे आपले ह्रद्याचे ठोकेच आहेत.घड्याळ,मग ते भिंतीवरचे असो की मनगटावरचे वेळोवेळी वेळ बघितली जाते.
नोकरदारांना तर घड्याळाचे महत्त्व ,बायकोच्या आदेशाइतकेच महत्त्वाचे असते.आफिसात उशिरा पोहचले की बास फक्त घड्याळाकडे कटाक्ष टाकतो,आपण सर्व समजून जातो.घरी उशिरा आलेले बिघडलेल्या पोराला बाप इतकेच विचारतो," आता किती वाजले?" शब्द बाणासारखे टोचतात.
गाण्यांमध्ये देखील ," आता वाजले की बारा."
वेळेची आठवण करून दिली जाते.
सर्वकाही विसरता येते पण वेळ नाही.घड्याळातले काटे एक काटेरी कुंपणच असते.अडाणी माणसे देखील वेळ विचारतात.
वेळापत्रक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य
भाग बनला आहे.लग्नपत्रिकेवर लग्नाची वेळ
असते.पुन्हा लग्न वेळेवर लावले जाईल अशी
ताकीद देखील अर्थात ती किती खरी ठरते हे
वेळेवरच कळते.एखाद्याची किंवा एखादीची वाट बघतांना सारखे घड्याळात बघितले जाते.वेळ कटत नसला की घड्याळाची चीड येते .वेळ संपूच नाही,असे सुख असेल तर घड्याळ आज वेगाने धावते आहे असे वाटते.
वेळ पाळायची असो की टाळायची असो, घड्याळात बघावेच लागते.घड्याळ केवळ वेळ दाखवते असे नाही,तर मनगटाची शोभाही वाढवते.म्हणून तर वेधक
घड्याळी बनवल्या जातात.एकाच वस्तूंचे अनेक उपयोग असतात.कधीकधी मूळ उपयोग गौण होऊन जातो.
लिंगभेद घड्याळाच्या बाबतीतही केला जातो.लेडिज चप्पल असते, तसे घड्याळही.लग्नामध्ये तर घड्याळाचा विशेष मान.लग्नातले घड्याळ हे अवशेष म्हणूनही
जपले जाते.वेळेचे भान रहात नसले तरी भानावर आल्यावर वेळ बघितलीच जाते.
भिंतीवरच्या घड्याळाचा रूबाब वेगळा असतो.पण ते अचल असते.मनगटावरच्या घड्याळासारखे त्याचे पर्यटन घडत नाही.
घरातील किंवा आफिसातील ते एक मूक साक्षीदार असते.उशिरा येऊन कोण सह्या करते,त्यास ठाऊक असते पण ते वाच्यता करत नाही.
काही महाभाग वेळ काटेकोरपणे पाळतात.सेंकदकाटा हा त्यांचा प्रिय काटा असतो.तो इतक्या वेगाने धावतो की एखाद्यास'तुला दहा सेकंद उशीर झाला.' म्हणेपर्यंत तो
वीस दाखवतो.
घड्याळातले तीन काटे तीन तऱ्हेचे असतात.
आकार आणि वेग त्यांचे वैशिष्ट्य असते.
तास काटा हत्तीसारखा संथ, मिनिट काटा गाढवाच्या चालीचा तर सेकंद काटा हरिणाच्या
वेगाने धावतो.तिघांची भेट एकदाच होते.
आपण झोपलो तरी घड्याळाची टिकटिक सुरूच असते.आयुष्यातील बराच वेळ,वेळ बघण्यात जातो.प्रत्येक काळात वेळ दाखवणारे घड्याळ आपले अस्तित्व टिकवून आहे.ते कधीच कालबाह्य होऊ शकत नाही.