गर्वाचे घर..
- ना.रा.खराद
अनेकांच्या ठिकाणी गर्व ही भावना वास करते.त्याचा दर्प जाणवतो.पद,पैसा, प्रतिष्ठा याचा गर्व बाळगला जातो,तसाच तो ज्ञान, सौंदर्य याचाही बाळगला जातो.वरील सर्व असतांना त्याचा गर्व न बाळगणारेही माणसे असतात तर वरीलपैकी काहीही नसणारेही त्याचा गर्व बाळगतात.स्वभावात गर्वीष्ठपणाअसला की कशाचाही बाळगला जातो.
एका मित्राने घर बांधले ,त्याचा तो इतका गर्व बाळगू लागला की प्रत्येकाला हीनवू लागला की,", तुमच्याकडे आहे का माझ्यासारखे घर?" घर नसणाऱ्या लोकांना तो तुच्छ समजूलागला.कालपर्यंत ज्याच्याकडे घर नव्हते तो घर बांधताच गर्व करु लागला.दूसरे असे कुणाचे घर कितीही चांगले असले ते आपल्या काय कामाचे? कुणी गर्वाने बोलते,"बघ माझी गाडी किती महागडी आहे?" कमालच आहे हो.व्यक्तिगत वापराच्या वस्तू त्याचा गर्व बाळगता? कसला मूर्खपणा हा.
कुणीतरी ,"आम्ही शुद्ध तूप वापरतो." म्हणावेसे वाटते ," तु खातो,आमच्या काय उपयोगाचे?" काही लोक तर आपल्या घरातील शौचालय दाखवतात.त्यातील व्यवस्था,फरशी वगैरे किती महाग आहे हे सांगत असतात.म्हणजे हागणार तो आणि आपण का ऐकायचे? काही माणसे तर सुंदरबायकोचाही गर्व करतात. म्हणतात,"माझ्या बायको सारखी सुंदर बायको कुणाचीच नाही"'माकड म्हणते माझीच लाल' अशीच त्यांची गत असते.
गर्वाचा हा पसारा फार मोठा आहे. तो सांगत होता,"आजपर्यंत असे लग्न झालेच नाही."
खरेही असले तरी तसे सांगत फिरणे गरजेचे नसते.उद्या त्यापेक्षा मोठे लग्न कुणी केले तर
त्याचे',गर्वहरण' होऊ शकते.आहे त्या क्रमांकावर कुणी कायम नसते.कुणीतरी वरचढ भेटतो , त्यावेळी काय अवस्था होत असेल?
माझे चांगले आहे,हा आनंद आहे पण माझेच चांगले आहे असा भ्रम हा गर्व आहे.मनुष्य
इतरांना तुच्छ लेखू लागला की समजावे,ह्यास गर्व हा रोग झाला आहे.मी,माझे शब्द वारंवार
येऊ लागले की गर्वाची बाधा झाली असे समजावे.काही माणसे झालेला गर्व लपवण्याचा प्रयत्न करतात.आपण त्यांना जर म्हणालो," आपण फार ज्ञानी आहात." मनातल्या भावना लपवत ,"नाही, नाही मी तर
तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस आहे." "तुमच्या सारखाच?" आम्ही समजून जातो.
कुणी आपल्या परिधानाचा गर्व बाळगते.आपला पेहराव दाखविण्यासाठी गावभर फिरते.विजय झाला,यश मिळाले अशावेळी आनंद होणे स्वाभाविक आहे पण त्याचा गर्व होणे योग्य नाही.आपल्याकडे जे
आहे ,ते इतरांकडे नाही किंवा आपण जे आहोत ते इतर नाहीत अशी भावना बाळगणे हा गर्व होय.
आपण आपल्या सुखासाठी जे करतो त्याचा गर्व असणे तर फारच हास्यास्पद आहे." मी
पहाटे चारला उठून व्यायाम करतो." कशाला गर्व पाहिजे."मी न चूकता पंढरपूरची वारी करतो." हा काही गर्व बाळगण्याचा विषय आहे? "आमचा मुलगा सूपारी देखील खात नाही." नसेल खात आम्हाला काय त्याचे.त्याने कोणती क्रांती होणार आहे?
गर्व कशाचा बाळगला जाईल सांगता येत नाही.एक मनुष्य गल्लीत अंडरवेअर घेऊन
फिरत होता,"बघा माझ्या सारखी कुणीच वापरत नाही." अरे ती तुझ्या ढूंगनावर चढणार आम्हाला काय त्याचे.आपण गर्वीष्ठआहोत हे आपणास कळत नसते.लोक दोष समोर सांगत नाहीत.पाठीमागे आपले सारे दोष चर्चिले जातात.कधी कधी अभिमान,स्वाभिमान या शब्दाचा आधार घेऊन गर्व खपवला जातो.मला गर्व नाही,असा प्रचार करणे गर्वाचा भाग ठरतो.
शारिरीक क्षमतेचा गर्व बाळगणारेही असतात."मी एक पोते उचलतो,तू उचलू शकत नाही." तू पोतेच उचलत बस.असे बोलून निघून जायचे. " मी एका बुक्कीत नारळ फोडतो." असे एकजन म्हणाला.दगडं
असतांना त्याची गरज काय? परंतु गर्व बाळगण्यासाठी काही तरी वेगळे करुन दाखवावे लागते.बरीच कामे केवळ आपला गर्व सिद्ध करण्यासाठी केले जातात.कामाचा गर्व ,गर्वाचे काम असते.
सौम्य प्रकारचा गर्व प्रत्येकजन बाळगतो.इतरांना तो नसावा अशी अपेक्षा करतांना तो आपल्याही ठिकाणी आहे का हा विचार करावयास हवा.गर्व कशाचा,किती असावा ह्याचा विवेक हवा.मी ज्ञानी,धनी,गुणी
आहे आणि मीच आहे,ह्यातला फरक लक्षात घ्यावा.
-