संकल्प_ बायकोशी न भांडण्याचा

        संकल्प_ बायकोशी न भांडण्याचा
                                                - ना.रा.खराद
 मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.
  जूने वर्षे सरले आणि नवीन सुरू झाले की संकल्प करतो, परंतु माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.शपथ वगैरे मी कधीच घेत किंवा खात नाही.पैज वगरै लावतो परंतु हारलो तरी कुणालाही छदाम दिल्याचे मला आठवत नाही.या सर्व संकल्पाच्या यादीमध्ये जो     संकल्प कधीच अल्पसा देखील यशस्वी झालेला नाही आणि कधी होईल अशी आशा देखील मी आता बाळगत नाही.दरवेळी अधिक दृढ संकल्प मी करतो.कधी नववर्षाचा.कधी वाढदिवसाच्या निमित्ताने तर
कधी लग्नाच्या वाढदिवसाला.लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यामध्ये वाढच झालेली दिसून येते.
आता अधिक न ताणता सांगूनच टाकतो
'बायकोशी न भांडण्याचा संकल्प.'
  मी तसा भांडणाच्या विरोधात आहे.विरोध करण्यासाठी देखील भांडावे लागते तो भाग वेगळा! आयुष्यात खुप भांडावे लागते.काही भांडणात आपला विजय होतो,काहींत पराभव होतो.पुन्हा नव्या जोमाने भांडणात
उतरायचे असते.असो.
   बायको सोबतच्या भांडणात माझा कधीच विजय होत नाही.नेहमी पानीपत होते.माघार घेणे,क्षमा मागणे ,करार करणे ,गुडघे टेकणे हे जागतिक युद्धाचे सगळे प्रकार या घरगुती भांडणात बघायला मिळतात.बायकोशी भांडणे सोपे नसते.माहेरच्या लोकांचा सरकारला बिनशर्त पाठिंबा असतो.नवरा करतो तोच फक्त छळ मानला जातो.या देशातील कायदे देखील स्रियांवरच फिदा आहेत.बायकोशी भांडायचे नाही,माझा हा संकल्प अयशस्वी होण्यामागची कारणेही शोधली पाहिजेत.क्रिकेटमध्ये हारलेली टीम जशी आत्मचिंतन करते अथवा युद्धांत पराभवाची कारणे शोधली जातात .
  कधी कधी न भांडण्याचा संकल्प यशस्वी होण्याच्या अगदी जवळ येतो आणि पुन्हा ठिणगी पडते.मी नाही भांडलो तरी ,"सालं मी
केव्हाची वटवट करते तरी तोंड उचकटत नाही." यामधले 'सालं' आणि 'उचकटणे' हे शब्द उचकटण्यासाठी असतात हे मी अनुभवाने ओळखत होतो.भांडणाचे   कुठलेही कारण नाही असे समजून मी आनंदाने घरात
शिरतो , मांजराच्या तावडीत उंदीर सापडावा
तसा. बायको ,"काय झालं एवढं दात काढायला,भेटली काय एखादी सटवी." एखाद्या दिवशी मी गंभीरपणे घरात शिरतो.
 बायको,"घरात मी दिसले की चेहरा पडतो,बाहेर सारखे खिंदळत असतील." बायकोचे संशय कधीच संपत नाहीत.तरीही बायको संशयी आहे असे म्हणता येत नाही.मात्र नवरा इतके जरी म्हणाला ,"तुला फार
वेळ लागला ." तर नवरा संशयखोर ठरतो.संशय घेण्याचा मूलभूत अधिकार देखील त्यास मिळत नाही.
दूधवाला दूधात पाणी टाकतो यामध्ये नवरोबाचा काही दोष असतो का? तिथेही बायको,"तुम्हाला त्याला बोलता येत नाही का?" बायकोची ही कटकट दूधवाल्याच्या कानापर्यंत गेलेली असते.दूधवाला विवाहित
असल्याने बायको नावाचा हा हिंस्त्र प्राणी घरात बाळगणे किती जिकिरीचे असते हे तो जाणून होता.नवरा     बायकोची भांडणे शेजारी ऐकू जात नाही.आपल्या घरातील भांडी आवाज करत असली की शेजारच्या भांड्याचा आवाज येत नाही.जे भांड्याचे तेच
भांडणाचे असते.कशावरून भांडायचे हे महत्त्वाचे नसते.भांडणे महत्त्वाचे असले की कशावरूनही भांडता येते,हे 'आखिल भारतीय विवाहित महिलांना'ठाऊक असते.
   मोठ्या शिताफीने नवरा भाजीपाल्याची पिशवी घेऊन घरी येतो.भरलेली पिशवी बघून बायको आनंदी होईल असा त्याचा कायम गैरसमज असतो.बायको पिशवीमध्ये काहीतरी शोधू लागते.सर्व भाजीपाला ,कांदे बटाटे बाहेर काढते.काय शोधते सांगत नाही.मलाही
प्रश्न पडतो.काय विसरलो नाही ,सगळे बघून
घेते आणि मग विसरलेला'कढीपत्ता'भांडणास कारणीभूत ठरतो.पुन्हा न भांडण्याचा संकल्प मोडीत निघतो.एकदा तर मला कसला तरी पुरस्कार भेटला.मोठ्या आनंदाने शाल,श्रीफळ घेऊनघरी आलो.वाटले बायको आता तरी भांडणारनाही . यापूर्वी नेहमी टोमणे असायचे,"त्या फलान्याला पहा किती पुरस्कार भेटलेत,एकतुम्ही वेंधळे साधी शाल पण तुम्हाला कधी भेटली नाही." शालजोडीतून मारण्याचे हे कसब साहित्यिक नसतांना बायकांकडे कसे असते हे उमगत नाही.शाल आणि श्रीफळाकडे तिने केलेला कानाडोळा मला भलतेच सांगून गेला,ती शोधक दृष्टीने बघतहोती,"पाकिट कुठे आहे?" मी म्हणालो ,"कसले पाकिट?" " मग काय नुसताच दीड दमडीची शाल घेऊन आलात!"असल्या शाली आणि नारळं ढिगारभर पडलीत आपल्या घरात." तिथेही माझा भ्रमनिरास झाला.लग्नात गुण जुळले तरी दूर्गुंन जुळवलेले नसतात.ते लग्नानंतर जुळवायाचे असतात.
              
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.