नववधू मी.....

                 नववधू मी.....
                              - ना.रा.खराद

  नवरी म्हणून मी नटले होते, नव्हे मला नटवले गेले होते. एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे मी काहीच बोलत नव्हते. माझ्या मनात चाललेला भावकल्लोळ कुणीच लक्षात घेत नव्हते."किती छान दिसतेस." असे जेव्हा कुणी म्हणायचे तेव्हा चिड यायची.'सुंदर दिसणे.' एवढे महत्त्वाचे! इतर कशाला महत्त्व नाही?
लग्नमंडप पूर्ण गजबजलेला होता.जिकडे तिकडे आनंदी आनंद.पाहुण्यांचे हास्यविनोद,बायांचे नटणे,तरुणींचे गालात हसणे.पोरांचे धिंगाणा करणे ,मिष्टान्न भोजनाचा दरवळ ,पुरोहिताची पुजा मांडणी हे सर्व लग्न या नावाखाली चालले होते. 
जिचे लग्न होते ती 'मी' वेगळ्याच जगात होते, एकटीच.
या सर्व गजबजलेल्या जागेत फक्त एक व्यक्ती गंभीर, उदास होती ते म्हणजे ,माझे बाबा!
बाप काय असतो,हे कुणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नसते. त्यासाठी फक्त मुलीचा जन्म घेणे गरजेचे असते. ते भाग्य मला लाभले आहे. हो मी माझ्या बापाची 'लाडकी लेक आहे.' 
जन्मतः मी जेव्हा माझे चिमुकले डोळे उघडले तेव्हा प्रथम दिसला तो बाप,ज्याच्या डोळ्यात मायेचा सागर दिसला.जेव्हा बापाच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा जाणवले'आईच्या उदराइतकी सुरक्षित जागा कोणती
असेल तर बापाचे हात!' 
अठरा वीस वर्षाची मी.आजही बाबा मला 'चिऊ 'म्हणून हाक मारतात. झोपेतून उठवतांना 'माझं सोनू' म्हणतात. आज त्या बापापासून मी वेगळी होणार होते. हे माझे
दुःख मी कुणाला सांगू शकत नव्हते.
"लग्नसोहळा" हा शब्दही मला अजूनच डिवचित होता.बाजेवाले जसे माझ्या दुःखाची खिल्ली उडवत होते. नवरदेवाची वरात वाजत गाजत मंडपात आली.नवरदेवाचे मित्र हास्य विनोद करत होते.एखाद्या क्रुर राजाने आपल्या सैन्य बळावर आक्रमण करावे व लूट करावी असेच सगळे ते भासत होते. 
माझ्या सोबतच्या करवल्या माझा थाट बघून स्वप्नात
रमल्या होत्या.स्वप्न आणि सत्य ह्यातील फरक
अद्याप त्यांना कळायचा होता.
आंतरपाटापलीकडचा नवरदेव अत्यंत प्रसन्न होता.कारण तो काही मिळवणार होता,त्यास काही गमवायचे नव्हते. मी मान खाली घालूनआपला भूतकाळ आठवत होते. त्या आठवणीत मी गहिवरून गेले होते.वराचे कटाक्ष थांबत नव्हते. तारुण्याने भरलेला माझा देह बघून तो उतावीळ झाला होता.
पुरोहिताने शेवटचे अष्टक सुरू केले तसे ,बाजेवाले सावध झाले, वऱ्हाडी उठू लागले.जेवणावळी उठू लागल्या.
पाहुणे परतू लागली होती.मंडपवाले मंडप गुंडाळण्याच्या तयारीला लागले.स्वयंपाकी आटोपते घेऊ लागले.गाद्या वगैरे जमा होऊ लागल्या.हळूहळू सर्व मंडप खाली झाला. काही मोजके पाहुणे तेवढे थांबले होते.
आपल्या शेकडों प्रियजनांना सोडून एका वेगळ्या जगात मी पाऊल टाकणार होते.थोड्याच वेळात मला निरोप देणार होते.आईच्या कुशीत जेव्हा मी डोके टेकले,तेव्हा
मायेची हि ऊब यापुढे मिळणार नाही या विचाराने हुंदका आवरत नव्हता. आईने पदराने माझे डोळे पुसले. गेली वीस वर्षे आईचा पदर मी चिंब केला होता.
माझा एकुलता एक लहान भाऊ लग्न जमल्यापासून बाबांना सगळ्या कामात मदत करत होता.
'माझ्या ताईचे लग्न आहे, ये बर का!' असे मित्रांना सांगत होता'.नवरीचा भाऊ आहे.'अशी त्याची ओळख करून दिली जात होती.आज पायाला भिंगरी असल्यागत तो पळत होता.आज त्यास थकवा नव्हता.पडेल
ते काम तो करत होता.बाबा कधी कधी आम्हा दोघांना सोबत बाहेर फिरायला घेऊन जायचे.आम्ही दोन्ही हात पकडून ठेवायचो.
खरे सांगू बाबा सोबत असले की अख्ख जग कवेत असल्यासारखे वाटायचे.निरोपाच्या वेळी माझा भाऊ तिथे नव्हता.कुणीतरी म्हणे,तो भांडी भांडारकडे गेला आहे. तो न भेटल्याची सल मनात होती.
निरोप देतांना बाबांनी हंबरडा फोडला.वज्रासारखे कठोर माझे बाबा किती कनवाळू आहेत हे मला आज जास्त जाणवत होते.माझाही अश्रूंचा बांध फूटला .मी बाबाच्या छातीवर डोके ठेवले.ओले लागत होते. 
बाबा कितीदा लपून रडले हे मी ताडले
होते. अश्रूंचा तो ओलावा सोबत घेऊन मी सासरी चालले होते.
 माझे बाबा एवढेच बोलले,"लेकरा सुखी रहा,आम्हाला विसरु नको." मी काही बोलण्यापूर्वी गाडी निघाली होती.आई बाबा,भाऊ हातवारे करत होते. थोड्याच वेळात ते नजरेआड झाले!
      
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.