तावून सुलाखून

            तावून सुलाखून
                               - ना.रा.खराद
  कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे परक्या सारखी वागली पाहिजेत, गरजेच्या वेळी सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी. एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की, त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
बहिष्कार व्हावा,छळ व्हावा, उपेक्षा व्हावी.
  परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर त्याला गहाण टाकण्याची वेळ यावी,
 कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसतानासुद्धा कुणाची तरी हजार वेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा,
 रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा!
 अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं! अन् मग बघावं या वेदनांतून तावूनसुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन!
जगातील सर्व संकटे सहन करुन जो उभा राहतो,तोच कणखर बनतो, संकटापासून पळायचे नाही, एकतर
त्यांना पळवून लावायचे आणि शक्य नसेल तर ते सहन
करायचे, दोन्ही गोष्टी माणसाला कणखर बनवतात आणि एकदा मनुष्य कणखर बनला की तो हवे ते करु शकतो.
खाण्याची भ्रांत पडावी, उपाशी पोटी झोप येवू नये.
मित्रांनी दगा द्यावा.एकटं पडावं आणि अश्रू कुणी पुसू नये अशी वेळ यावी.
 ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो. फक्त आलात, तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय, या एकाच तत्त्वावर!
 ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी आला, फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही! ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं! और हटनेका भी नहीं! पण कसं आहे, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात.
  'ठेच! एक अनुभव.... जीवनाचा एक अध्याय एकाची समाप्ती, तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ..
त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचा शहाणपण.......
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.