- ना.रा.खराद
हल्ली कोणत्याही गोष्टीचा गवगवा फार केला जातो.सोशल मिडियाच्या सुलभ साधनांचा वारेमाप वापर केला जातो, अगदी विवेक हरवून तो होतो.ज्या गोष्टी निमुटपणे, शांतपणे, सामान्यपणे करावयास हव्यात त्याचा देखील गवगवा केला जातो.अतिरंजितपणा हा आज सामान्य बाब झाली आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भावपूर्ण श्रद्धांजली या दोहोंचा सारखाच दबदबा आहे .कुणी सायकल खरेदी केली तरी शुभेच्छांचा वर्षाव केला जातो.कुणी दहा मिनिटे दिसला नाही की ' हरवला आहे ' अशा पोस्ट सुरू होतात.
वाढदिवसाचा धुमाकूळ आपण बघतोच , रस्त्यावर तो साजरा होतो? किती तो कैफ.कशासाठी हे सर्व?
पुरस्कारांची तर स्पर्धा लागलेली दिसते.देणारे इतके झाले की घेणारे दुर्मिळ झाले,मग द्या कुणालाही एकदाचा.कवडीमोल असणारे ते पुरस्कार आणि ते प्राप्तकर्ते , परंतु काय त्याचा गवगवा करतात.वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर त्याचे मार्केटिंग केले जाते.परंतु ते इतके होत आहे की हा गवगवा कुणाच्या पचनी पडताना दिसत नाही.
शासकीय कामाचे उद्घाटन तर गवगवा करुनच केले जाते, कारण त्यापासून त्यांना राजकीय फायदा हवा असतो.आपण जे करतो ती एक सामान्य बाब वाटली पाहिजे, त्यामध्ये गवगवा करण्याची गरज नसते.चार
लोकांना जेवू घालण्याची ऐपत नसताना चार लोक जेवणार असल्याचा गवगवा का करावा?
हल्ली लहान लहान माणसे आपण खूप मोठे असल्याचे भासवत आहेत.चार दोन पैसे बाळगुन करोडपती असल्याचा गवगवा करत आहेत .चारदोन तोडक्या मोडक्या कविता करणारे आपण जागतिक स्तरावरचे कवी असल्याचा परिसरात गवगवा करत आहेत.आपणच भावी आमदार किंवा नगरसेवक असल्याचा गवगवा कित्येक स्वतः किंवा त्यांचे बगलबच्चे करत असतात.एखादी क्षुल्लक घटना असते, परंतु तीचा गवगवा करुन त्या घटनेला मोठे केले जाते.
आरडाओरड करणे, धुमाकूळ घालणे,प्रसार व प्रचार करणे हा गवगवा आहे.कुणी एखाद्या परीक्षेत यश मिळवले की त्याचा इतका भयंकर गवगवा केला जातो की जसा तो चंद्रावर जाऊन आला.अनाठायी उदोउदो करण्यात येतो.हा गवगवा कमी झाला पाहिजे.अतिरंजित गोष्टी टाळाव्यात.
विजया नंतरची मिरवणूक हा एक गवगवाच
आहे, जिंकला तर शांत हो आता, उड्या का मारतो? कशाला गवगवा करतो.गवगवा तर इतका घसरला आहे की आम्हीगावरान तूपाशिवाय खात नाही किंवा आम्हाला अमूकच लागते ह्याचा गवगवा केला जातो.लहानसहान वस्तू खरेदी केली तरी साऱ्या गावभर चर्चा.कशाला हे सर्व.हा सर्व खटाटोप म्हणजे अंहकार आहे.फाजिल गर्व आहे.निसर्ग जसा निमुटपणे आपले काम सुरू ठेवतो ,तसे आपण देखील आपल्या कुठल्याही कामाचा किंवा यशाचा गवगवा करु नये.