गुणग्राहकता
- ना.रा.खराद
आपण डोळ्यांनी बघतो ते दृष्य आणि डोळसपणे बघतो तो दृष्टिकोन.जसा दृष्टीदोष असतो तसा दृष्टी कोन दोषही असतो.आपणास आहे ते दिसत नाही.आपण बघतो तसे दिसते.जसे ढगांकडे बघितले की हवे ते दिसते.ढग तेच असतात , दृष्टीकोन वेगळाअसतो.
प्रत्येक व्यक्ती स्वत:ला निर्दोष व इतरांना दोषी मानतो.आपण चूकतो असे कुणाला वाटतच नाही.
कुणी चूक दाखवली की राग येतो.लगेच अनेक तर्क आणि स्पष्टीकरण देऊन तो आरोप आपण परतून
लावतो.चूक सांगणारा व्यक्ती शत्रु वाटू लागतो.फक्त आपली स्तुति करतो तोच फक्त आपला असे आपण
समजू लागतो आणि हिच फार मोठी चूक ठरते.
अनेक बाबतीत आपण इतरांपेक्षा मागे असतो,दूय्यम असतो.इतरांच्या काही जमेच्या बाजू असतात.गुण असतात.आपणास ते दिसले पाहिजे.एका निरपेक्ष नजरेला ते दिसते.मी जेव्हा प्रथम होतो तेव्हा आपण
गुणग्राहकतेची दारे बंद केलेली असतात. आपल्या अवतीभवती अशा असंख्य गुणवानांची फळी
असते परंतु आपण ते गुण वाखाणत नाही.त्याकडे दूर्लक्ष करतो.घरातली गृहिणी उत्तम स्वयंपाक करत
असेल तर कधीतरी त्याचा उल्लेख करावयास पाहिजे.'त्यामध्ये काय इतके,करतच असतात.' अशी वक्तव्ये
केली जातात.कुणाचे सुंदर अक्षर बघून मला माझ्या कुरुप अक्षरांची जाणीव होते तेव्हा ,मी सुंदर अक्षरांची
प्रशंसा न करता ,'अक्षराला काय महत्त्व आहे.'असे बोलून उलट त्याचीच अवहेलना करतो.
जे जे चांगले ,उत्तम, श्रेष्ठ आहे ते आपल्या नजरेत अगोदर आले पाहिजे.इतरांकडे काही विशेष आहे
असे आपणास वाटतच नाही.प्रत्येकाकडे तुच्छतेने बघण्याची सवय झाली आहे.मीच तेवढा श्रेष्ठ .मीच
सर्वगुणसंपन्न बाकी सगळे गुणहीन.आपला दृष्टिकोन इतका बुरसटलेला असतो.आपल्यापेक्षा कुणी कशातच पुढे असू नये असे आपणास वाटते.एखाद्याचे गुण नाकारण्यासाठी त्याचे दोष आपण पुढे करतो.
आपणास त्रास आपल्यापेक्षा निम्न लोकांचा होत नाही,तर वरचढ लोकांचा होतो.तुम्ही कुणाचेही
मोठेपण नाकारता तेव्हा तो चिडतो तो याच कारणाने.कुणी म्हंटले,"अरे तो फार उत्तम गातो." आपण लगेच
म्हणतो,"अरे कित्येक पडलेत." आपणास गरीबांविषयी दया असते मग श्रीमंतांचा द्वेष का?
आजारी माणसाला बघून हळहळतो मग तंदुरुस्त माणसाला बघून आनंद का वाटत नाही.आपण इतरांच्या उणीवावर बोट ठेवतो मग आपणास गुण का दिसत नाहीत.कारण आपली दृष्टी सदोष
आहे हा दृष्टिकोनदोष आहे.
इतरांचे धन फुकटचे वाटते.इतरांचे ज्ञान पोकळ वाटते.इतरांचे धाडस मूर्खपणा भासते.चारित्र्य संशयास्पद
वाटते.सौंदर्यं बनावटी वाटते.प्रसिद्धी खोटी वाटते.यश चूकीचे वाटते.इतरांबद्दलचा हा दृष्टिकोन एक
मनोरोग आहे.
दृष्टिकोन स्वच्छ असावा.पूर्वग्रहदोषाची धूळ बाजूला सारावी.नाकरणे सोडून स्विकारण्याची वृत्ती बाळगावी.लहानांचे कौतुक करता यावे.सहमती आणि समर्थन करायचे जमले पाहिजे.गुणांची कदर करण्यास
कंजुषी करु नये.दिव्यत्वाची प्रचिती घडावयास हवी.प्रत्येकामधले चांगले अगोदर दिसावे.चांगल्याचे चांगले
मान्य करावे.विशाल दृष्टिकोन ठेवावा.सर्वांना सामावून घेणारे मन असले की बघा ,किती आल्हाददायक
वाटते.मग कपाळावर आठ्या रहात नाही.आपण अधिक प्रगल्भ बनतो.प्रसन्न बनतो. एवढा प्रयोग कराच.