- ना.रा.खराद
कुटुंबात, समाजात एकंदरीत आपल्या आयुष्यात आपली आवडती ,नावडती माणसे असतात.त्या आवडीनिवडी जशा व्यक्तिसापेक्ष असतात तशा त्या धूर्तपणाच्या देखील असतात.स्वार्थप्रेरित किंवा शह काटशह असतात.ज्याच्याबद्दल द्वेषभावना असते तो नावडता असतो.त्यास कमी लेखण्याकडे आपला कल असतो.त्याची उपेक्षा करणे,त्यास डावलणे ,त्याचा उपमर्द
करणे असला खटाटोप सुरू असतो.
आवडत्या व्यक्तिचा उदोउदो केला जातो.त्यास संधी दिली जाते.हेतुपुरस्कर त्यास पुढे आणले जाते.नावडत्या व्यक्तिबद्दल मनात आकस रहातो.आवडत्या व्यक्तिची प्रत्येक गोष्ट आवडते.आपला तो बाब्या उगीच मानत नाहीत.आपला माणूस हा आवडीचा असतो.
हे आपलेपण कधी नात्यातून,कधी मैत्रीतून तर कधी स्वभाव साम्यातून निर्माण झालेले असते.
जसे आवडीचे कारण असते तसे ते नावडीचे
पण असते.आपणास जे आणि जसे आवडते
ते आपले आवडीचे बनते .व जे आवडत नाही
त्याविषयी नावड तयार होते.नावडीतूनच द्वेष
निर्माण होतो.द्वेषातून पुन्हा नावड निर्माण होते.सर्व बाबतीत ती भावना कार्य करते.
प्रत्येक बाबतीत आवड नावड असते.आपणआयुष्यभर आपल्या आवडी जपतो .
आवडते त्याचे समर्थन,नावडीचा निषेध हे आपले जीवन बनते.अगदी जन्मापासूनच ही आवड नावड आपली संगत सोडत नाही.
म्हणतात,"दिल गया गधी..." "नावडतीचे मीठ
अळणी." दोन्हीही सत्य आहे.
आपला आवडता रंग कोणताही असला तरीउरलेले रंग टाकावू नसतात तेही कुणाचे तरी आवडीचे असतात.
जीवनाचे तसेच आहे.
आवडते अवश्य असावे परंतु नावडते असू नये.किमान घृणा , तिरस्कार करु नये.
आपले मन निरोगी राखावे एवढेच!