आयुष्य हे अमूल्य आहे,त्याचे मातेरे करु नका.

                                                  आयुष्याचे मातेरे !
                                                                        - ना.रा.खराद
आयुष्य आपणास लाभलेला अमूल्य ठेवा आहे, ते कसे घालवायचे हे आपल्या हातात आहे,त्याचा वापर आणि विनियोग कसा करायचा हा सर्वस्वी अधिकार आपला असतो.आयुष्य हे मोफत लाभत असल्याने
त्याचे मोल अनेकांना उमगत नाही, आयुष्य घालवण्यासाठी असते, हे जरी खरे असले तरी ते वाया घालवण्यासाठी नसते हे लक्षात घेतले पाहिजे.
  आयुष्य म्हणजे जगण्यासाठी लाभलेला वेळ! आपण वेळ कसा घालवतो, यावरुन आयुष्याचा स्तर ठरतो.
   आयुष्य म्हणजे खुप मोठा प्रवास नसतो, तो एक क्षण असतो, आयुष्य क्षणभंगुर असते.ज्यांना ते खुप मोठे वाटते, ते आयुष्याचे मातेरे करतात.नको तिथे, नको तितका वेळ घालवतात, ज्यांना वेळेची किंमत कळत नाही, त्यांना आयुष्याची देखील किंमत कळलेली नसते.आयुष्य हे उधळण्यासाठी नसते,तर खर्ची घालण्यासाठी असते.
  आयुष्याचे मोल समजून घेतल्याशिवाय त्याचे मोल कळत नसते.काही न करणे एकवेळ आयुष्य मानता
येऊ शकेल , परंतु काहीही करणे हे आयुष्य नसून आयुष्याचे मातेरे आहे.जिवंत राहण्याची धडपड आयुष्याची गरज दाखवते,मग जिवंत राहून आपण नेमके काय करतो ह्याचे चिंतन व्हावे.
   आयुष्य हे स्वतःचे स्वतःसाठी असते, आपण ठरवायचे असते ते इतरांसाठी किती वापरायचे.आपल्या
आयुष्याचे गणित आपण मांडायचे असते.स्वत्वाचा विसर पडणे आयुष्याचे मातेरे आहे.आयुष्य संपते, निघून जाते तेव्हा कळते, मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते.वेळ आपणास घेऊन जाते त्याअगोदर आपण वेळेस वापरले पाहिजे.
   आयुष्य हे अकारण नसते, आयुष्य काही कारणासाठी असते.ती कारणे आपण शोधली पाहिजेत.जे परत लाभणार नाही, ते आयुष्य समजून घेतले पाहिजे.आयुष्याचे नुसते प्रेक्षक होऊन चालणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कलाकार व्हायला हवे.इतरांचे ऐकत,बघत बसण्यापेक्षा आपल्याकडेही काहीतरी दाखवण्यासाठी असले पाहिजे.फक्त इतरांकडून मागत बसण्यापेक्षा इतरांना देण्यासाठी आपल्याकडे असले पाहिजे.
  आयुष्याचा प्रत्येक क्षण आपणांस आनंद देऊ शकतो, परंतु त्यासाठी अंगी पात्रता असावी लागते.आयुष्याचे विविध रंग न्याहाळता आले पाहिजे.ज्ञानाच्या आड असलेले अज्ञान दूर करता आले पाहिजे.जे आले ते स्पष्ट कळाले पाहिजे.आयुष्य गेले नाही तर घालवले पाहिजे.
    नको त्या उचापती, अर्थहीन हारतुरे ,पोकळ मानसन्मान, स्वार्थी प्रेम यापासून दूर राहिले पाहिजे.
   बारीकसारीक कटकटी,फूकटची आरडाओरडा आणि मोकाट स्पर्धा यांना आयुष्यात थारा असू नये.जिथे आणि ज्या गोष्टीने जीवनात काही साध्य होत नाही,बदल होत नाही, तिथे कशासाठी थांबायचे, जिथे फक्त उपद्व्याप आहे,
वितंडवाद आहे तिथे आयुष्य कशाला खर्ची घालायचे.आपण आपल्यातच गुरफटलेले असले पाहिजे.इतरांचा
विळखा असू नये.
  संगीत, साहित्य,कला यामधील सृजनशीलता हे आयुष्य आहे.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.