घरगुती जीव
- ना.रा.खराद
आपण ज्यांना पाळलेले नसते तरीही कित्येक जीव घरामध्ये आपल्या सोबतीला असतात.आपल्या मर्यादा
ओळखून ते सोबत करतात.घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकलेला असतो.अत्यंत सावधपणे ते जीव वावरत असतात.घरधन्याला कुठलाही उपद्रव न होऊ देता ते जीव आपले इच्छित साध्य करतात.यामधील अनेक जीव दृष्टीस देखील पडत नाहीत,नजर चुकवत ते विचरण करतात.
कुठल्यातरी आडोसा त्यांनी निवडलेला असतो.घरामध्ये असे कित्येक जीव आपली उपजीविका भागवतात व निवाराही मिळतो.या जीवांची तशी गरज देखील असते.
घरातील हे पाहुणे जीव मुक्कामी राहतात.त्यांचा सहवास
थोडासा नको वाटत असला तरी त्यांच्याशिवाय देखील 🏡 🏠 घराला घरपण येत नाही.
घरासमोर एखादे झाड असले की पहाटेच्या वेळी चिमण्यांची किलबिल सुखावून जाते.त्या झाडाच्या बूंध्यापासून येरझारा घालणारी 🐿️🐿️ खारुताई किती आनंद देते.मध्येच एखादा सरडा डोकावतो तेव्हा त्याचे
बदलणारे रंग बघून मन हरपून जाते.मुंग्यांची रांग, मुंगळे
किती मनोहर सगळे!
घरामध्ये धान्याची पोती असेल तर उंदीर डल्ला मारायला
तयारच असतात.घरातील सदस्यांची नजर चुकवत अत्यंत अलगदपणे सावज साधणे आणि पुन्हा नामानिराळे होणे उंदराकडून शिकले पाहिजे.उंदरांचा सुळसुळाट झाला की 🐱 मांजर त्यावर नियंत्रण मिळवते.एकमेकांना अडथळा न करणे जसे या सर्व जीवांनी ठरवून टाकलेले असते.मांजर तर मांजर पावलांनी घरात शिरते.घराबाहेर हाकलेले तरी पुन्हा ते येतेच.गुपचुप आपले कार्य उरकून पसार,मांजराकडून शिकावे तर हेच!
पाल तर प्रत्येक ठिकाणी दिसते.भिंतीवर इकडून तिकडे
झेपावणारी ,कीड्यांचा पाठलाग करणारी, त्यांना आपले
भक्ष बनवणारी पाल घरामधील इतर शेकडो पदार्थांकडे
ढुंकूनही पाहत नाही.भींतीवर पळण्याचे तिचे कौशल्य मोठे विलक्षण असते.
घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे जीव लपलेले असतात.
आपल्या सोबतीला असतात.निरुपद्रवी असे हे जीव सोबतीला असतील तर एकटेपणात देखील अस्तित्व
सोबतीला असल्या सारखे वाटते.मला वाटते या जीवांशी
मैत्री करुया!