नादब्रह्म
- ना.रा.खराद
🏡 घरामध्ये विविध नाद , ध्वनी किंवा आवाज 👂 कानी पडत असतात, हे विविध नाद आपल्या इतक्या अंगवळणी पडलेले असतात की त्यांना आपण वेगळे समजतच नाही,आपण त्यांच्याशी एकरुप होऊन गेलेले असतो.
युद्ध मैदानावर वाजणारे पडघम असो, एखाद्या विवाह प्रसंगी वाजणारी शहनाई असो नाद आपले महत्त्व दाखवतो.
वाऱ्याने पानांचा होणारा आवाज असो की मांजराचे गुरगुरणे असो, वातावरणात गोडवा निर्माण करते.
जन्मापासून कान हा अवयव आपणास हा नाद ऐकवतो,हेच खरे जीवन संगीत आहे.जीवनात पार्श्वसंगीत यामुळे मिळाले आहे.घर म्हंटले की विविध वस्तू आणि त्या वस्तूंचा संयोग आणि त्यातून निघणारा कंप, ध्वनी किंवा नाद आयुष्याची गोडी वाढवतो.
असे लहान मोठे, सजीवांचे, निर्जीवांचे ध्वनी म्हणजेच नाद कानावर पडत असतात.
अगदी घरामध्ये चप्पल, बुट सोडताना होणारा आवाज असो की वस्त्र परिधान करतांना 👂 कानी पडतोच.चोरुन दुध पिताना 🐱 मांजराचा आवाज असो की 🐕 कुत्रा भुंकल्याचा हे सर्व आवाज जीवन समृद्ध करतात.कीड्यांची किर्र किर्र देखील एक वेगळा नाद निर्माण करते,आपण ते लक्षात घेत नाही.भल्या पहाटे घरातील स्त्रिया झाडू हातात घेऊन घर अंगण झाडून घेतात, तेव्हा तो आवाज पहाटेचा राग वाटतो.सुर्योदयापूर्वी जशी त्याच्या स्वागतासाठी अंगण सजवले आहे असे वाटते.सडा शिंपतांना होणारा नाद पहाटेच्या वेळी किती मंजुळ वाटतो.
भांडी घासताना विविध भांड्याचे आवाज म्हणजे जीवनातील संगीताचे वाद्ययंत्रच.अंघोळीसाठी बादली मध्ये पाणी ओतताना होणारा पाण्याचा आवाज समुद्राच्या लाटांचा भास करतो,तेच पाणी जेव्हा डोक्यावर घेतले जाते ,तेव्हा झरा वाहत असल्याचा भास होतो.सकाळी चहा तयार झाला की कपबशीचा नाद तर कैफ वाढवतो.ग्लासमध्ये ग्लास ठेवताना होणारा आवाज, भांड्याला भांडे लागले की होणारा आवाज, तव्यावर भाकरी टाकण्याचा किंवा ती भाकरी थापण्याचा आवाज नकळत आपल्या कानी पडत असतात.
विविध वाहनांचा आवाज,विमान किंवा हेलिकॉप्टर ह्याचा आवाज कानी आदळतो.अचानक होणारा आवाज चकित करतो.अनेक संगीत साहित्य, गावात वाजणारा डफ खुप काही संकेत दिले जातात.
खरे म्हणजे कान फक्त माध्मम असतात,ऐकत असतात खरे आपले मन, 💓 हृदय,आत्मा .
कपड्यांच्या घड्या घालतांना होणारा आवाज, तेच अंथरताना होणारा आवाज वेगळा असतो, आवाजावरून ते कळते.घरात भींतीवरचे घड्याळ सोबतीला असते,त्याची टिकटिक किती गोड असते,कुणी तरी कायम सोबतीला आहे,ह्याची जाणीव होते.निर्जीव वाटणारी ही साधने सजीवांना साथ करतात,त्यास सुखावून जातात.
घरामध्ये लहान मोठे चमचे असतात,त्यांचा गरजेनुसार वापर होतो , त्यावेळी ते आपला
नाद पसरवतात आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.घरातील पंखे तर चित्र विचित्र आवाज करतात.प्रत्येक पंखा आपल्या आवाजाने वातावरणात संगीत भरतो.,ब्रश करताना होणारा आवाज दैनंदिन असतो.मिक्सर, किंवा चूल पेटल्याचा आवाज.दरवाजा वाजवला किंवा लावला, खिडक्यांचा आवाज.वस्र दगडावर आपटून होणारा नाद,फरशी पुसताना, खुर्ची इकडून तिकडे घेतांना होणारा आवाज खिळवून ठेवतो.
विविध प्रकारचे कीडे आपल्या सोबतीला असतात,त्यांचे विविध स्वर आपल्या जीवनात संगीत निर्माण करतात.या अनेक आवाजाच्या जडणघडणीत आपण घडत असतो.आपण एकटे कधीच आणि कुठेच नसतो.हा नादब्रह्म कायम आपल्या सोबतीला असतो.ज्यास उमगते त्याच्यासाठी तो मोलाचा असतो.