वस्तूशास्त्र
- ना.रा.खराद
घर ही एक अशी जागा आहे, जिथे आपल्या गरजा पूर्ण होतात.बाहेरच्या जगात आपण जे वावरतो ते आपलेघर सावरण्यासाठी. आपली सर्व सुखसाधने घरात असतात. गरजेच्यावस्तू घरात जमा केल्या जातात.
अगदी सूईपासून .म्हणून घराला वास्तू म्हणत असावेत.जे वस्तूने भरलेले असते ती वास्तू.
घरातल्या काही वस्तू पिढीजात असतात. आजोबा पणजोबाच्या काळातील. त्या वस्तू त्या घराची ओळख बनतात. वस्तू बघून सारा गांव सांगू शकतो,कुणाची वस्तूआहे.वस्तूंचाही एक अजब वारसा असतो.
काही दणकट वस्तू अनेक पिढ्या पालथ्या घालतात. घरामध्ये कित्येक वस्तू अत्यावश्यक सेवेत मोडतात. ज्याच्यावाचून अडते अशा वस्तू. ज्याची किंमत कमी आणि मोल जास्त असते अशा वस्तू. याच कारणामुळे लग्नसमारंभात वस्तूभेट प्रथा सुरू झाली.
काही मौल्यवान वस्तू असतात,त्या फार जपल्या जातात.काही व्यक्तीगत वापराच्या असतात.आरसा वगैरे तर कायम
डोळ्यासमोर.कंगवा असतोच केसांना वळण लावायला.उखळ,मुसळ,सुप, जाते वगैरे आता कालबाह्य झाले.
शेतकऱ्यांच्या घरात तर शेतात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तू जपून ठेवलेल्या असतात.गरजेनुसार त्या उपयोगी पडतात.अनेक वस्तू लवकर संपतात, लगेच खरेदी कराव्या लागतात, स्वस्त असल्या तरी त्यांचे नसणे महाग पडते.
ताट,वाटी,पेला,बकेट अशा वस्तू भेट दिल्या जाऊ लागल्या.पुढे त्यामध्ये अनेक वस्तूंची भर पडली.तो एक वस्तूपाठच ठरला .वस्तूंसाठी स्वतंत्र वाहनांची गरज पडू लागली.घर वस्तूंनी भरु लागले.गरजेपेक्षा जास्त वस्तू घरात येऊ लागल्या ,गरज नसलेल्या वस्तू घरात घर करु लागल्या.अनेकवस्तू तर फिरत्या ढालीसारख्या इकडून तिकडे फिरत असतात.
कित्येक वस्तू वापराविना पडून असतात.वस्तू जपणे काहींचा छंद असतो.अगदी निकामी वस्तू कधीतरी कामी येईल अशी त्यांची धारणा असते. काही वस्तू तुरळक लोकांकडेच असतात. ती एक वेगळी प्रतिष्ठा असते.गावभर त्याचे कौतुक असते.
काहींना निरर्थक वस्तू सांभाळण्याचा छंद असतो.अनेक वस्तू भंगार संज्ञेत मोडतात. त्यांची विल्हेवाट लावली जाते. काही वस्तू भेट आलेल्या असतात. त्या जपल्या जातात.खुप घरामध्ये वस्तूंचे वर्गीकरण केले जाते.
नीटनेटकेपणाने त्या वस्तू मांडलेल्या असतात. क्षणात ती वस्तू हजर होते.अपवादात्मक ठिकाणी वस्तूंचा ताळमेळ
नसतो.भंबेरी उडते.कुठे,कशात थांगपता नसतो.घरामध्ये लहान सहान वस्तूंचे फार महत्त्व असते. दैनंदिन गरजा त्याशिवाय पूर्ण होत नाहीत.
घर हे अशा शेकडों वस्तूंनी भरलेले असते.त्या वस्तू त्या घराचे अंग बनलेल्या असतात. चहाचे कप वेळोवेळी अंपग होतात, काही काळ दिव्यांग अवस्थेत सेवेत असतात. कप बदलेले जातात, बशी तीच राहते.वस्तूंमध्ये अनेक वस्तू शस्त्रसम असतात. त्या हळूवार हाताळाव्या लागतात.
सूईसारखी नगण्य वस्तू ,प्रसंगी आपले आस्तित्व दाखवते.कित्येकांना वस्तूंची आवड असते. त्यांचे घर वस्तूभांडारच असते. काहींना इतरांकडे जे आहे ते आपल्याकडे असलेच पाहिजे असे वाटते.नको असलेल्या वस्तू ते खरेदी करतात. बऱ्याच ठिकाणी बायकोच्या हट्टापायी वस्तू खरेदी होते.चारचौघात अपमान नको म्हणून नवरोबा तीचे ऐकतो.
घरामध्ये व्यक्तीगत वापराच्या काही वस्तू असतात. इतरांचा त्यावर अधिकार नसतो.
अनेक वस्तू कालजयी असतात. काही वस्तू तर कधीच वेळेवर सापडत नाहीत. कुठे दडून बसतात काय ठाऊक!
गरजेची प्रत्येक वस्तू आपल्याकडे असली पाहिजे ,असा काहींचा दंडक असतो.तर काही गरजेची वस्तू शेजारी मागायची या विचारसरणीचे असतात.
कपाटे बायांच्या साड्यांनी भरलेले असतात. शेकडों साड्या.बाया साड्यात अडकतात.काही वस्तू मौसमी असतात. छत्री ,मफलर वगैरे .गरज संपली की अडगळीत पडतात.अनेक वस्तू इतरांना दिल्या की परत मिळत नाही,त्या विवाहितेसारख्या त्या घरच्या होऊन राहतात. काही वस्तू तर तत्पर लागतात. खाण्यासाठी
लागणाऱ्या वस्तू टिकाऊ नसतात. त्यांचे आयुष्यमान बघून त्या वापराव्या लागतात.कालांतराने काही वस्तू निकामी होतात.
वस्तूंशिवाय संसार नाही.माहेरची भांडी फार अप्रूप असतात.कोणती वस्तू कुणी भैट दिली त्याची आठवण
त्यामध्ये असते.काही वस्तू फक्त सणावारालाच बाहेर पडतात,एरवी त्यांना विश्रांती असते.
घरामध्ये काही वस्तू ज्याच्या त्याच्या असतात.बरीच घरे तर 'वस्तूसंग्रहालय' च भासतात.वापराविना वस्तू पडून
असतात.हौस म्हणून अनेक वस्तू खरेदी केलेल्या असतात.वस्तूंचा मोह आणि गरज यामध्ये फरक असतो.
वस्तूंच्या गर्दीमुळे माणसे अडगळीत पडलेली दिसतात.भांडी ही सर्वाधिक वापरात असतात ,अशा भांड्यांना रोज
साबन लावून अंघोळ घातली जाते.
घरामध्ये वस्तूंच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या असतात.जिथली वस्तू तिथे ठेवणे हे घराचे घरपण असते.
घरकाम हे काही सोपे काम नसते, सुगरणीलाच ते नीटपणे जमते.
भेटवस्तू या हा एक वस्तूंचा प्रकार आहे.आलेल्या, मिळालेल्या, लाभलेल्या वस्तू असतात.
वापरात नसलेल्या, जून्या झालेल्या किंवा कालबाह्य झालेल्या वस्तू 'भंगार' समजल्या जातात व त्या वस्तूंचा
पुढचा प्रवास सुरु होतो. वस्तूंशिवाय वास्तू नाही.संसाराचा कणा म्हणजे वस्तू.वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे शेजारपण.जन्माची नाळ तूटली की ती वस्तूंशी जोडली जाते.