दादागिरी
- ना.रा.खराद
बालवयात मी शाळेत असतांना आमच्या वर्गातील एक मुलगा रोज कुणाला तरी विनाकारण मारत असे. इतर मुलांना धमकावणे,मारहाण करणे त्याचा दैनिक उपक्रम,त्यामुळे मुले त्यास भित असे. त्याच्याशी गोड बोलत असे.त्याचा खोटा सन्मान करत असे. इतकेच नाही तर वर्गप्रमुख म्हणून तो बिनविरोध निवडला जायचा.त्याच्या खोडकरपणाला शिक्षकही वैतागले होते. एकदा त्याच्या पालकाला शाळेत बोलावले ,"बापापेक्षा पोरगं बरं."असे
म्हणण्याची वेळ आली.बापाने उलट शिक्षकांना शिव्या दिल्या,धमकावले.कुणीतरी म्हणे," हा दादा आहे, खुप दहशत आहे याची,चांगले चांगले टरकतात." शिक्षक अजूनच घाबरले. विनवणी करून त्यास शांत केले. तो पालक परतला .
दादागिरी काहींना कुटुंबातील संस्कारातून मिळते.काहींचा तो पोटभरण्याचा उद्योग असतो.
दादांचे पीक सगळीकडे असते. प्रत्येक गावात,गल्लीत, शहरात आवारा कुत्र्यासारखे चार दहा दादा असतातच.दादा लोकांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी विनाकारण लोकांना त्रास द्यावा लागतो.मग लोक त्यास घाबरतात. कोणताही दादा मोठ्या गर्वाने म्हणत असतो,"मला ओळखत नाही का?" समोरचा घाबरून म्हणतो,"तुम्हाला कोण ओळखत नाही दादा."
दादा लोकांचा एक वेगळा स्वभाव असतो.जातील तिथे आपल्या दादागिरीचे प्रदर्शन आवश्यक असते. बसमध्ये घुसतांना सीट पकडतांना आपला एक वेगळा अविर्भाव असतो.
दादा लोकांचा एक खास पेहराव असतो.आपण दादा आहोत हे लोकांनी ओळखावे, आपणास भिऊन रहावे यासाठी त्यांचा खटाटोप असतो.रस्ता अडवणे,कट मारणे,धक्का मारणे,शिव्या देणे असले छोटे
उद्योग सतत सुरू ठेवावे लागतात. ताकदीचे प्रदर्शन करावे लागते.जाळून टाकू,गाडून टाकू,संपवून टाकू असे एकदाही न करता सतत फक्त म्हणत रहावे लागते म्हणजे लोकांच्या मनातील दहशत कमी होत नाही.
नुसत्या दादागिरीच्या जोरावर कित्येकांनी खुप संपत्ती कमावली आहे. शासनाने दादागिरीला उद्योगाचा दर्जा द्यावयास हवा.
दादागिरी हा एक प्रकारचा उद्योग झाला आहे.खंडणी वगैरे जसा हक्क झाला आहे.काहीतरी कुरापती काढून गोंधळ
निर्माण करायचा आणि आपले उखळ पांढरे करून घ्यायचे.नेहमी काही तरी चूकीचे करत राहिले की दादा या
पदापर्यंत पोहचता येते.आपली ओळख निर्माण करणं दादागिरीचा पहिला फंडा असतो.
कायद्याचे उल्लंघन हा दादा लोकांचा आवडीचा खेळ. गाडीचा वेग जास्त ठेवावा लागतो,तेव्हा लोक चर्चा करतात. आठवड्यातून एखाद्या तरी गरीब माणसाला मारहाण करावी लागते.दहशत जेवढी जास्त
तितका मोठा दादा माणले जाते.राजकारणी लोक अशा लोकांना जवळ करतात. त्यांना पदे बहाल करतात. खाण्यासाठी कुरणं देतात. त्यांना वाचवतात. गरीब जनता मग कुणाच्या भरवशावर?
परंतु दादागिरीचा हा मार्ग अत्यंत वाईट आहे. कोणताच दादा सोयीना मरत नाही. इतरांना
त्रास देण्याचे पाप ज्यांनी केले ,ते कुत्र्यासारखे मेले.दादागिरी मनात देखील आणू नये.इतरांना त्रास होईल असे वागू नये.नसता तळतळाट तळाला नेऊन बसवतो.आपण साधेपणाने जगू शकतो.इतरांना लुबाडून मोठे
होण्याचा प्रयत्न करु नका.हिंसा,मारहाण या गोष्टींपासून दूर रहा.आपण मानव आहोत ,माणसासारखे वागा.जगा आणि जगू द्या,हाच मूलमंत्र बाळगा.
जय मानवता!