बालपणीच्या लपवाछपवी इतकेच जीवनात लपवालपवीचे साम्राज्य आहे.खुलेपणाने जगता
यावे असे वातावरण या जगात नाही म्हणून लपवालपवी शिवाय पर्याय नसतो.हे जग जितके प्रकट आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त अप्रकट आहे.दिसते त्यापेक्षा ते नेहमीच वेगळे असते.
जगण्यातले स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे असते ते जेव्हा त्यास उघडपणे मिळत नाही तेव्हा तो लपवालपवी करतो.इतरांच्या नजरेत न पडू देता आपले इच्छित साध्य करण्यासाठी लपवालपवी केली जाते.गरजेतून तिचा जन्म झाला.नसता कटकट म्हणून लपवालपवीचा अवलंब केला जातो.
आपण उघड बोलतो म्हणणारे देखील खुप काही लपवत असतात.आपले सगळे उघड आहे
असा दावा करणारे अनेक गोष्टी लपवत असतात.अनेक गोष्टी मनात लपविल्या जातात.मनाचा ठाव घेणे कठीण कार्य असते.
मोकळेपणाने बोलणारे देखील महत्वाच्या गोष्टी लपवतात.
कुणीच पूर्णपणे कुठे व्यक्त होत नाही.
गरज आणि वेळ काळ बघूनच माणसे रहस्य उघडतात.
लपवालपवी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.लपवालपवी उघडपणे केली जाते.काय
लपवले हे कळत असूनही ते लपवले जाते.झाकले म्हणजे लपवले असे होत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट लपवण्याची माणसाला सवय असते.आयुष्यभर मनुष्य लपून जितके कृत्य करतो तितके उघड नाही.प्रत्येक मनुष्य म्हणजे रहस्य असतो.ग्रह ताऱ्यांचा शोध लागेल परंतु माणसाच्या मनाचा ठाव लागू शकतं नाही.
लपवालपवीसाठी खोटे बोलावे लागते.
कुणी काय लपवावे,कुणापासून लपवावे आणि
कशासाठी लपवावे ही ज्याची त्याची गरज असते.बाळपणी मुल आईपासून लपवून माती खाते, खेळायला जाते हे कुणी शिकविलेले नसते.जे उघडपणे करता येत ते नाही ते लपून करणे हे सुत्र आहे.त्याचा अवलंब अखेरपर्यंत होतो.अनेक सत्य मनुष्य आयुष्यभर लपवतो.मरणानंतर ते उघड होते.चोर जसा लपून चोरी करतो तसे आपण सर्व अनेक गोष्टी
लपून करतो.मुले आई-वडिलांपासून, आई-वडील मुलांपासून खुप काही लपवतात.कुणी आपले वय लपवतो.
परीक्षेत नकल लपून केली जाते.अनेक माणसे
आपले सुख दुःख लपवतात.कुणी धन,कुणी ज्ञान लपवतो.कुठे खाणे पिणे लपून चालते.अनेक लोक आपले रोग लपवतात.गुन्हेगार गुन्हा लपवतात.
लाचखोर लपून लाच खातात.कुणी लपून भेटते,कुणी लपून बोलते.कुणी आपले प्रेम लपवते कुणी कपट.
सगळीकडे लपवालपवी बघायला मिळते.
लहान मुल आपली खेळणी लपवून ठेवते.वर्गात
मुले लपवून चिंचा बोरे खातात.आवडत्या पोरीकडे लपवून बघतात.आपण जसे आहोत तसे इतरांना कळू नये याची काळजी घेतली जाते आणि त्यासाठीच लपवालपवी केली जाते.
भ्रष्टाचार लपवून केला जातो पण उघड दिसतो.
कृत्य लपवून केले तरी परिणाम लपवून रहात नाही.लपवलेले उघड करण्याचा माणसांचा छंद
आहे.आपले लपवून इतरांचे उघड करत रहायचे
हां मानवी स्वभाव आहे.शिकार लपवून केली जाते.जीवजंतू देखील ह्यास अपवाद नाहीत.
घरामध्ये आई देखील काही वस्तू लपवून ठेवते.
जपवणूक ही देखील लपवणूकच असते.
या जगात बहुतेक गोष्टी लपवून केल्या जातात,उघड तर फक्त औपचारिकता असते.
जगण्यातले खरे गमक लपवालपवीत आहे.