विश्वास हा आपला श्वास बनला पाहिजे.

                                            विश्वास

विश्व हे विश्वासावर चालते, विश्वास हाच मानवी श्वास आहे.विश्वविश्वास किंवा खात्री असल्याशिवाय कोणत्याही कार्याचा , व्यवहाराचा आरंभ होत नाही.माणसातील आपसातील सर्व संबंध हे विश्वासावर अवलंबून असतात.विश्वास ठेवावाच लागतो.आपले जीवन इतरांच्या सहकार्य घेवून चालते, किंबहुना तरच
चालते.नाते मैत्रीचे असो की इतर कोणते , विश्वास हेच त्याचे गमक असते.मनुष्य जितका विश्वसनीय असतो,तितका तो प्रगती करतो, लोकप्रिय होतो.
    बस चालक गाडी चालवतो, प्रवासी त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त असतात.डाक्टर उपचार करतो
त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो.नेत्यांवर विश्वास ठेवून मतदान केले जाते.मालक नोकरांवर विश्वास ठेवतो,
म्हणून त्याचा व्यवसाय चालतो.स्वत:च्या वाहनांवर विश्वास ठेवून आपण प्रवास करतो.विश्वास जसा इतरांवर ठेवावा किंवा असावा लागतो,तसा तो स्वतःवर देखील असावा लागतो.
  मी अमुक गोष्ट मिळवणारच,अशी खात्री बाळगणे किंवा असेच होणार हा विश्वास जगण्यासाठी आवश्यक
असतो.आपल्या आयुष्यात खात्रीचे काही लोक असतात, ज्यांच्या जवळ मनातले बोलता येते, ते इतरत्र
वाच्यता करणार नाही याची खात्री असते, कोणतेही नाते विश्वासाने बळकट होते.आस्तिकांना ईश्वर असल्याचा विश्वास आहे, श्रद्धा असला की विश्वास असतो.नास्तिकाला देखील ईश्वर नसल्याचा विश्वास असतो, शेवटी विश्वास हाच आपला श्वास आहे.इतरांने बनवलेले अन्न,चहा किंवा पाणी आपण प्राशन करतो, विश्वास असतो की त्यामध्ये काही अपायकारक मिसळलेले नसेल.
  सोयरसबंध विश्वास असेल तरच जुळतो.कोणताही व्यवहार विश्वास असल्याशिवाय होत नाही.तिकिट
अगोदर दिले आणि पैसे नाही दिले तर किंवा पैसे दिले परंतु तिकिट नाही दिले तर अशी शंका उभयतांना नसते, विश्वास ही एक व्यावहारिक गरज आहे.
  अनेक प्रसंगी अनेकांकडून विश्वासघात होतो, तरीही विश्वास ठेवावाच लागतो.आपला कुणावरही विश्वास नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही.आपले प्रत्येक पाऊल हे विश्वासावर पडते.उडी मारताना देखील ती योग्य ठिकाणी पडेल ह्याची खात्री असते.इतर ग्रहावर जाणारे लोक किंवा त्यांना पाठवणारे शास्त्रज्ञ विश्वासाच्या जोरावरच पाठवतात.राजे लोक आपल्या ठराविक लोकांवर खुप विश्वास ठेवत असत, मोठमोठ्या मोहिमेवर त्यांना पाठवित असत.
   आपल्यावर इतरांचा किती विश्वास आहे आणि आपण इतरांवर किती विश्वास ठेवतो हे कधीतरी तपासून बघितले पाहिजे.डोळे बंद ठेवून ठेवलेला विश्वास अंधविश्वास समजला जातो.अनेक विश्वास हे फाजील असतात.सरसकट विश्वास ठेवणे धोकादायक असते.जिथे विश्वास ठेवू नये तिथे ठेवला तर धोका ठरलेला आहे.विश्वास जसा आवश्यक आहे तसा तो योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.विश्वासास पात्र ठरणे महत्त्वाचे असते.
  एखाद्या कामासाठी आपली निवड केली तर ते काम उत्तम केले पाहिजे, जेणेकरून विश्वास या शब्दाचा महिमा कायम राहील.आपण जितके विश्वसनीय बनाल तितके यशस्वी व्हाल.आपणास इतरांची जितकी
गरज आहे, तितकीच इतरांनाही आपली वाटली पाहिजे, विश्वास हा आपला श्वास बनला पाहिजे.
                                                                - ना.रा.खराद,अंबड जि.जालना
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.