- ना.रा.खराद
आपले शरीर हेच आपले जगण्याचे साधन असते. त्याची रचना मोठी अदभूत आहे.अवयवांना वेगवेगळी नावे दिली गेली.प्रत्येक अवयवाचे कार्य ठरलेले असते.
'हात' त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळेच हस्तरेषा बघितली जात असावी.इतर अवयव आपल्या परवानगीविना कार्य करतात परंतु हात हे आपल्या इच्छेने कार्य करतात म्हणूनच म्हणतात,'यामध्ये त्याचा हात आहे.' पाय,पोट वगैरे म्हणत नाही. भविष्य देखील हातावर बघितले जाते.
अमूक व्यक्तीचा कुणी हात धरु शकत नाही.कुणी हात मोकळा सोडतो.कशात तरी कुणाचा हात असतो.
मनुष्य हाताने खातो, हाताने लिहितो,गाडी चालवतो, वस्तू उचलतो, हातभार लावतो.काम हातावेगळे करतो.हातचे राखून ठेवतो.हात घालतो,हात लावतो,हात ✋ जोडतो,हात दाखवतो.
दोन माणसे हातमिळवणी करतात. 'त्याने माझ्यावर हात उगारला .' असे बोलले जाते."आम्ही त्याच्या हाताखाली काम करतो." असेही म्हणतात. 'हि गोष्ट आपल्या हातात नाही.'' यामध्ये कुणाचा हात आहे?' 'त्याने हात लावला की सोने होते.' हिंदी मध्ये,'कानून के हाथ बहुत लंबे होते है।' प्रसिद्ध आहे. लग्नासाठी मुलीचा 'हात मागितला 'जातो. एखाद्या दुकानाचे उद्घाटन कुणाच्या तरी 'हस्ते' होते. हात दाखवून अवलक्षण,हातचे सोडून पळत्याच्या
पाठीमागे, हातच्या कंकनाला आरसा कशाला इ.वाक्प्रचार उदयास आले.
चोर हातचा पळाला. खर्च कमी केला की ,हात आखडला असे म्हणतात. त्याचा हात मोकळा आहे, त्याने हात वर केला.तो याच्या त्याच्या समोर हात पसरतो.हात दाखवला जातो.हात केला जातो.
हात दाखवून गाडी थांबवली जाते.अमूकचे वरपर्यंत हात आहेत, असे बोलले जाते.
कुणी विषयाला हात घालते.काम हातावेगळे
केले जाते.निरोप कुणाच्या तरी 'हस्ते'पाठविला जातो.कुणी संकटात हात देतो.सर्व कामे हाताने केली जातात. हात डोक्यावर ठेवला जातो.तोंडावरून फिरवला
जातो.हाताने नखे काढली जातात. हाताने दिले जाते घेतले जाते. हात पाहिजे तसे झटकलेही जातात, हात वर केले जातात.
हाताला काम हवे असते.चित्रपटात "मैं तुम्हारी बेटी का हाथ माँगने आया हूं"असे संवाद असतात. इशारा हाताने केला जातो.
हातभर इकडे की हातभर तिकडे. हात गुंतलेले असतात. हात कशात तरी बरबटलेलेअसतात, हात खोललेले असतात. कुणी हात झटकलेले असतात. कुणी हातचे राखून असतो.तुरी हातावर दिल्या जातात. 'हात लावाल तर याद राखा.' इथे धमकी हातालाच.
कुणाला निवडून द्यायचे जनतेच्या,'हातात'असते.एक हात दुसऱ्या हाताची मदत करतो.सर्व शरीर हाताने स्वच्छ
केले जाते.हात देखील हाताने स्वच्छ केले जातात.कुणाच्या तरी कुणाचा तरी पाठीवर
हात असतो.कुणी कुणाच्या तरी हात धुवून पाठीमागे लागलेले असते. सुगरणीला ,हिच्या हाताला चव आहे.' असे बोलले जाते. अमुकच्या हातचे लोणचे छान लागते.कुणाचा हातभार असल्याविना काम पूर्ण होत नाही. अमूक डॉक्टरच्या हातचा गुण येतो म्हणतात.काम हाताळले जाते. हाताखालून गेलेले असते.
हातचलाखी असते,हातगुण असतात. कुणी काम हातात घेते.कुठे सत्ता हातात असते.
मी हाताने टाईप केलेला लेख तुमच्या हाती देत आहे.