शिक्षण म्हणजे काय हे कळल्याविना ते देणे किंवा घेणे निव्वळ फार्स ठरतो.शिक्षण ही संकल्पना खुपच व्यापक स्वरूपाची आहे,सुक्ष्म आहे,ती कधीच ढोबळ असू शकत नाही.शिक्षण कशासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे आणि नंतर ते कसे द्यायचे याविषयी चिंतन करायला हवे.चिंतनाविना दिले जाणारे शिक्षण चिंता वाढवणारे ठरते.
आज शिक्षणातून तत्वज्ञान नष्ट होत चालले आहे.वैचारिक प्रगल्भतेच्या अभावामुळे व दूधखुळ्या लोकांच्या हातात शिक्षणासारखेअत्युच्च साधन असल्यामुळे खुप नासधूस होताना दिसत आहे.शिक्षण हे मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान यांची सांगड आहे.ते राबवण्यासाठी तितकेच कुशल मनुष्यबळ हवे असते, उगीच माकडाच्या हाती कोलीत देऊन काही चांगले घडण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
कल्पकता, तर्कनिष्ठता , समरसता या गुणांमुळे शिक्षण ध्येय साध्य होऊ शकते.
शिक्षण हेच परिवर्तनाचे अमोघ साधन आहे,त्याचा वापर तितक्याच कौशल्याने, कार्यक्षमतेने व परिणामकारक व्हावयास हवा, त्यासाठी शिक्षक हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे.शिक्षकाचे शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.त्यासाठी शिक्षक मननशील व चिंतनशील असणे गरजेचे आहे,शाळेचा मुख्याध्यापक हा त्या शाळेचा कणा असतो, शिक्षकांचा तो मार्गदर्शक असतो,त्याच्याठिकाणी अनेक गुणांचा खजाना हवा तरच तो शिक्षक आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल.
मुख्याध्यापक हा उच्च विचारसरणी असलेला असावा.साधारण व तुच्छ व्यक्ती या पदावर शोभत नाही.तो उत्तम वक्ता असावा,लेखक असावा, तत्वज्ञानी असावा.माणसे पारखण्याची क्षमता त्याच्याकडं असावी.निर्णयक्षमता असलेला , स्वाभिमानी वृत्तीचा व्यक्ती या पदावर असावा तेव्हाच विद्यार्थी घडू शकतात,नसता शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन जातो.
शिक्षकांकडे आपले ग्रंथालय असावे,त्याने नियमितपणे काहीतरी वाचले पाहिजे, आत्मचिंतन केले पाहिजे,आपले व्यक्तिमत्व खुलवले पाहिजे.शिक्षक प्रेरक असेल तरच मुलं प्रेरित होतात,नसता अजून वाया जातात.मुख्याध्यापकाची नेमणूक खुप विचारपूर्वक केली पाहिजे, हजारों मुलांचे भवितव्य ज्याच्या हाती द्यायचे तिथे वशिला महत्वाचा ठरत असेल तर काही चांगले घडण्याची अपेक्षा फोल आहे.
शिक्षण हे तर्कशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे
ते हाताळणारे देखील तत्वज्ञानी असले पाहिजे.