विजोडपे
पती-पत्नी हे एक अजब नाते आहे.या नात्यात जितके माधुर्य आहे तितकीच कटुता आहे.हे नाते ज्या पद्धतीने जुळविले जाते ,ती पद्धत मोठी अतार्किक आहे, अवैज्ञानिक आहे.
बाजारात बैल खरेदी करताना देखील सारखेपणा बघितला जातो, तेव्हा त्यास जोडी म्हणता येते.जोड सारखा असला पाहिजे.
भारतीय 💒 लग्ने बहुदा 'पंचांग' नावाच्या पुस्तकाच्या आधारे जुळविली जातात.नाते आणि आर्थिक स्तर बघितला जातो.व्यावहारिक
पद्धतीने सर्व देवानघेवान ठरते.वधूपक्षांकडून 'हुंडा' नावाने नकदी रक्कम ,सोने वरपक्षांना दिले जाते.भांडीकुंडी दिली जातात.
एका अनोळखी मुला-मुलीं सोबत जन्माचे नाते
जुळले जाते.एकमेकांना समजून घेण्यामध्ये बराच वेळ जातो, कधीकधी आयुष्य देखील!
पती-पत्नीची भांडणे नित्याची असतात.ती इतकी अंगवळणी पडली आहेत की न भांडणारे
पती-पत्नीच नाहीत,असे बोलण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे.
लग्न झालेल्या जोडप्यांना विचारा," तुम्ही जोडीदारांसोबत समाधानी आहात का?" उत्तर
'नाही' असेच येईल. पती-पत्नी कायम एकमेकांना "मी फसलो." असे चिडून म्हणतात.
जोडीदार योग्य मिळाला नाही असे बहुतेक पती-पत्नींना वाटत असते.विजोड असले तरी त्यास जोडपे संबोधले जाते.शारिरिक विरोधाभास तर खूप ठिकाणी बघायला मिळतो,
बौद्धिक स्तर कुठेच जुळलेला दिसत नाही.
भावूकता तर कमालीची वेगळी असते.इतके
वेगळेपण असून देखील जेव्हा पती-पत्नी या
गोंडस नावाखाली आयुष्य कंठत राहण्याशिवाय
पर्याय उरलेला नसतो.या असामाधातून अनेक
भलतेच प्रकार जन्म घेतात,अनर्थ घडतात.
रितसर घटस्फोट वगैरे उच्चभ्रू लोक घेतात परंतु
मध्यमवर्गीय कुटुंबात तडजोडीने संसार सुरू असतो.यामुळे प्रचंड मानसिक हानि होते.
घरातील कटकटीमुळे मुलांवर वाईट परिणाम होतो.त्यांची काही चूक नसतांना आई-वडील
ज्या पद्धतीने एकमेकांचे वाभाडे काढतात ते
त्यांच्यावर मानसिक आघात करतात.मुले वैफल्यग्रस्त, नाउमेद होतात आणि यातूनच ती वाया जातात.
लग्न जुळवणे फार जोखीमीचे काम आहे.परंतु
पंचांगानुसार 'गुण' जुळले की झाले सर्व ठीक!
आपले दिलेले नाव,त्या नावावरुन लग्न जुळवले
जाते.जुळवणारा 'दक्षिणा' घेऊन नामानिराळा होतो.इकडे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकले जाते ते कायमचेच.
लग्नाच्या अनेक प्रथा होऊन गेलेल्या आहेत,आजही काही प्रमाणात उपलब्ध आहेत.
परंतु सर्वाधिक प्रचलित पद्धतीनुसार 'मुलगी
दाखवणे' हा प्रकार सर्रास सुरू आहे.एका मुलीला शंभर मुले बघून जेव्हा नाकारतात तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम होत असेल ह्याचाकुणी कधीच विचार करत नाही, एखाद्या वस्तूप्रमाणे तीची किंमत ठरते.तीच्या सौंदर्याविषयी बोलले जाते ,ही अवहेलना आहे.
लग्नाच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे तर विवाहाची प्रासांगिकता टिकून राहिल,नसता चूकीचे जे घडते त्यातून कधीच चांगला समाज निर्माण होऊ शकत नाही.
संसारात दु:ख असते,असे आपण मानूनच चाललो आहोत.जिथे दुःख स्विकारले जाते तिथे सुखाचा शोध संपतो." अरे संसार संसार" व्यथित लोकांची भाषा आहे.विवाहित म्हणजे दुःखी, अशी व्याख्याच बनली आहे.परंतु दुःखाच्या कारणांचा शोध कुणी घेत नाही.
जुन्या लोकांनी लग्न फार भयंकर करुन टाकले
आहे.' चूल आणि मूल' ची संस्कृती आता संपली आहे.दोन व्यक्ती लग्न नावाच्या संस्थेत आयुष्यभर सोबतीला राहतात ,जगभर हे चालते परंतु सुखमय संसार हा प्रकार दिसून येत नाही.कुठेतरी, काहीतरी चूकीचे घडते आहे, त्याशिवाय हे दुःख नाही.
लग्नाला विरोध नाही परंतु चूकीची पद्धत व विजोड जोडपे असू नये असे वाटते.
' अरे, संसार संसार' ऐवजी 'व्वा रे संसार' घडला
पाहिजे.