खंबीर व्हा! ताठ मानेने, धैर्य आणि मुक्त जगा!

                  खंबीर व्हा!

जीवन ताठ मानेने,स्वाभिमानाने जगायचे असेल तर खंबीरपणा आवश्यक आहे.धैर्य त्यासाठी हवे असते.
कचखाऊ माणसे संकटांना घाबरतात.घाबरणे हे दूबळेपणाचे लक्षण आहे.आपल्या ठिकाणी असीम शक्ति
वास करते परंतु आपण ती ओळखत नाही,वापरत नाही.समाजाच्या साच्यात एक साचेबंद जीवन जगत रहातो.जीवन आपल्या मर्जीने जगले पाहिजे.कुणासमोरही दबण्याचे कारण नसते.हा मोठा,तो मोठा यामुळे स्वत:ला लहान समजण्याची सवय लागते.हा समजच आपणास मोठे होऊ देत नाही.प्रत्येकाच्या ठिकाणी ती अद्भूत शक्ति आहे.तिस ओळखा.तीचा अपमान करु नका.
दीड दमडीसाठी मागे फिरु नका.पोटासाठी
हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करु नका.पोटासाठी आत्मा मारु नका.पाषाणातूनही इवलासा अंकुर बाहेर पडतो.पाण्याचा एक थेंब पाषाणातही छेद करु शकतो हे उघड्या डोळ्यांनी बघा.
झुकायचेच असेल तर फक्त नम्रतेने झूका.या जगात कुणालाच आपला मालक मानू नका.तुम्ही त्या विधात्याचे अंश आहात त्याचा अपमान करु नका.मिंधे जीवन जगू नका.सारी निराशा सोडून द्या. तुमच्या मध्ये
असीम शक्ति दडलेली आहे.त्याच्यावरची जळमटे बाजुला सारा. संकटे मोठी नसतात तर आपले धैर्य छोटे असते.कशाचेही भय बाळगू नका.व्हायचे ते होणार आहे.त्याची तमा बाळगू नका.अंधारी रात्रभर त्या रातकीड्यांचे संगीत थांबवू शकत नाही.
समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा बघून त्यातील जीव आपले धैर्य सोडत नाहीत.
  लहान लहान पक्षी आकाशात स्वच्छंदी बनतात.मनावरचे ओझे कमी करा.खांदे अधिक मजबूत करा.आपल्याच धूंदीत जगणे शिका.इतरांची जास्त तमा बाळगू नका.
खंबीरपणा हेच जीवन आहे.तुफानात डगमगणारी झाडे नष्ट होतात.एकटा बाजी खिंड पावन करतो.हे बळ येते खंबीरपणातून. शरीराची नाही तर आत्मबलाची गरज असते.
 अमेरिकेत जाऊन आपल्या विचाराने जगाला हादरवून सोडणारे विवेकानंद आठवा.मुठभर मावळ्यांच्या बळावर मोगलांशी झूंज दिलेले छत्रपती शिवाजी महाराज आठवा.
कशानेही खचून जायचे नाही,हे ठरवून टाका.संकटाशी दोन हात करा.मांडीला चिकटलेला मुंगळा देखील शेवटपर्यंत लढतो.
जगण्याची धमक असावी लागते.जिथे तिथे नाक घासणे बंद करा.अपयश हा शब्द आपल्या डायरीतून काढून टाका.यश अपयश हे केवळ शब्द आहेत.शब्दाभोवती नाही तर धैर्य,धडाडी दाखवा.जीवनाचा उन्माद पाहिजे.फार हिशोब करु नका.हिशोबाने वागून कुचंबणा करु नका.थोडे सैल व्हा, मोकळे व्हा.
 ते आकाश तुम्हाला उंच भरारीसाठी बोलावत आहे.तो खवळलेला सागर तुम्हाला न्हावू घालू इच्छित आहे.क्षणाला बदलणारा वायु तुमच्या नसानसात संचार करत आहे.तुम्ही वायुसारखे स्वैर व्हा.समुद्राच्या लाटांवर स्वार व्हा.आकाशाला गवसणी घाला.यासाठी धैर्य
पाहिजे.मानसिक गुलामीतून मुक्त झाले पाहिजे.फालतू पगडा सोडता आला पाहिजे.मी चैतन्य आहे.मी असीम आहे याची जाणीव सतत ठेवली पाहिजे.निधड्या छातीचे व्हा,अढळ रहा,खंबीर रहा!
                       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.