या जगात जागा धरणे हा एक मानवी उपक्रम, पराक्रम आहे.ह्यास जागा मिळविणे ,जागा बळकावणे ,जागा पटकावणे असेही जागेनुसार संबोधले जाते.जागा ही माणसाची गरज आहे.
नोकरी साठी शुद्धा जागा असावी लागते.खेळण्यासाठी.
जागा मग ती बसमध्ये का असेना,मिळाल्याचा
आनंद मिळतो.जीवनातली सारी धडपड जागा
मिळवण्यासाठी आहे.कुणाच्या मनात जागा निर्माण करणे हे मोठे दिव्य असते.
प्रत्येकाला आपुलकीची हक्काची एक जागा हवी असते.जिथे मान टेकून निश्चिंत पडावे अशी
जागा.ताटकळत उभे राहण्यापेक्षा टिचभर जागेवर बूड टेकून बसले की बरेच.
जन्मापासून मरेपर्यंत, मृत्यूनंतरही या देहाला
जागा हवी असते.जागा जशी भौतिक असते तशी आत्मिक असते.कुणाच्या तरी मनात आपण जागा शोधतो.बापाचे खांदे ,आईची मांडी मुलाची हक्काची जागा असते.
शाळेत मुले जागा मिळविण्यासाठी स्पर्धा करतात, आपले दफ्तर टाकून ताबा मिळवतात.
बसमध्ये तर सर्व प्रवासी सर्व बाजूंनी चढाई करतात, असेल ती वस्तू सीटवर टाकून आपले आरक्षण पक्के करतात.महाभारताचे युद्ध असो वा दोन देशांमधील युद्ध जागेसाठीच असते.
दोन शेतकऱ्यांमध्ये असो वा दोन शेजारच्या घरामध्ये भांडणे जागेवरून असतात.
निवडणुकीत जागा सूटणे,जागा जिंकणे आणि
जागा वाटप मोठा तिढा असतो.विविध खात्यामध्ये खाण्याची जागा असते.कोणती जागा मोक्याची त्याचे गणित असते.
एखादे नाटक ,सिनेमा बघायला जातांना जागा
मिळवण्यासाठी प्रयत्न होतो.जागेच्याही किंमती
ठरलेल्या असतात.त्याची बोली लागते.काही जागा उपेक्षित असतात.जागेवरुन न हलणारेही लोक असतात.
कुणी हजारों एकर जमीनीचा मालक असतो.
काही जागा सार्वजनिक असतात, सरकारी असतात.जागा जागेवरच रहाते.इच्छित जागेसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.कवी,शायर डोळ्यात जागा शोधतात.
नळावर पाणी भरण्यासाठी हंडा ठेवायला जागा
हवी असते.पक्षी असो की प्राणी सुरक्षित जागा
हवीअसते.बसण्यासाठी,झोपण्यासाठी,बागडण्यासाठी जागा हवी असते.
मित्र, नातेवाईक या आपल्या हक्काच्या जागा असतात.थोडा वेळ पिशवी ठेवायची असेल तरी
ओळखीची जागा हवी असते.विश्वासाच्या काही
जागा असतात,त्या जागाच आपणास तारतात.
पैशाने जागा विकत घेता येते पण एखाद्याच्या
मनात जागा निर्माण करता येत नाही.
देश म्हणजे एक जागा असते.जगाचा नकाशा
हा जागेचा नकाशा असतो.जागा कागदावर रहाते, आपण कागदासारखे उडून जातो.
जागेवर देखील जागा निर्माण करता येते.
प्रत्येक पाऊल टाकण्यासाठी जागाच लागते.
मृत्यूनंतरही स्मशानात जागा हवी असते.
किमान चार खांदे इतकी जागा तरी कमवायला
हवी.आपले ओझे वाटू नये अशी चार माणसे
तरी आपण कमवायला हवीत.