मागे एकदा मी मोटरसायकलवरून तीनशे किलोमीटर प्रवास केला, हे जेव्हा माझ्या एका मित्राला कळले, तेव्हा तो म्हणाला,“ इतका दूर मोटरसायकलवरून कसा गेला,मी तर वीस किलोमीटर गेलो की थकतो."
मी त्यास पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले की,“ मी मोटरसायकलवरूनच गेलो, आणि तु वीस किलोमीटरवर थकतो ही तुझी क्षमता आहे."
मागे एका नामवंत प्राध्यापकाने मला,“ तुम्हाला हे लिहायला कसे सुचते हो, कोठून शोधून लिहिता?" असा उपरोधिक प्रश्न केला. मी वाईट न मानता म्हणालो,“ तुम्ही प्राध्यापक कसे झालात हो, वशिला होता की काय?"
जे आपणास शक्य नाही, ते इतरांनाही असू नये अशी अपेक्षा असते.तुलनेचा हा मानसिक रोगी आहे.
इतरांच्या क्षमतेवर कायम शंका घेणारे आपले मन तपासले पाहिजे.कुणी विमानाने प्रवास केला की , ह्याची काय लायकी आहे! कुणी म्हणाले," मला इतके टक्के गुण मिळाले." लगेच शंका, वाटत नाही मला!
इतरांचे यश किंवा गुणवत्ता जेव्हा खुपते तेव्हा,त्याचे रुपांतर ईर्ष्यत होते आणि निंदा करुन त्या व्यक्तीला कमी
लेखले जाते.
जो तो आपल्या क्षमतेनुसार प्रदर्शन करतो.त्याचे इतरांना कुतुहल वाटले पाहिजे,वैष्यम नाही.माझ्यापेक्षा कुणीच ,कशामध्येच पुढे असू नये,ही अपेक्षा हा अंहकार आहे,तो बाजुला सारला पाहिजे.जसा मी श्रेष्ठ आहे,तसा दूसरा ही आहे.इतरांच्या क्षमता माझ्यासाठी प्रेरणा ठरावी, ईर्ष्या नाही.
इतरांना जे शक्य असते, ते आपणास असेल असे नाही, म्हणून का खचित व्हायचे? खचितच नाही.इतिहासात अशी अनेक नावे आहेत की त्यांनी जे करुन दाखवले, ते अद्यापही कुणी करु शकलेले नाही, परंतु हेही खरे आहे की क्वचित सामान्य माणसाने देखिल असामान्य कृत्य केले आहे.क्षमता प्रसंगी प्रगट होते,ती सुप्त असते.ती संधी शोधत असते.जो तो आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो, त्यासाठी इतरांना कमी लेखण्याची किंवा श्रेष्ठ मानण्याची गरज नसते.
इतरांची बरोबरी करण्याऐवजी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे, ईर्ष्या करण्याऐवजी गुणग्राहक बनले पाहिजे आणि निंदा ऐवजी समर्थन केले पाहिजे.
जो तो त्याच्या ठिकाणी क्षमतावान असतो, क्षमता अनेक प्रकारच्या असतात.हजारो प्रकारची कामे वेगवेगळ्या क्षमता असलेले लोक करतात.आपण जर इतरांच्या क्षमता अमान्य करत असू ,तर इतरांनी तरी आपल्या क्षमता का मान्य कराव्यात? हा प्रश्न पडला पाहिजे.
जशी धावण्याची गति सर्व प्राण्यांमध्ये सारखी नसते,तशीच ती खाण्याची नसते, आयुष्याची नसते.एकदा हे वेगळेपण लक्षात घेतले की मग मन शांत होते.मनातील द्वेष नष्ट करायचा असेल,तर अंगी शहाणपण हवे.
कुणाचे सुंदर अक्षर बघून," किती सुंदर आहे!" असे सहज
उद्गगार निघतील तेव्हा समजावं की तुम्ही आता गुणग्राहक बनले आहात.ऐवजी," अक्षरांवर काही नसते हो, कित्येक सुंदर अक्षरावाले मूर्ख असतात!" असा टोमणा मारुन मोकळे होतात.गरुड खुप उंच उडतो म्हणून सरपटणारे प्राणी वाईट मानत नाहीत,उलट गरुडाला सरपटता येत नाही असे समजून आनंदी राहतात.
कोकिळा मधुर गाते म्हणून कावळ्याने दुःख मानायचे नसते,कावळ्याचेही चाहते असतातच!
माणसातील विविध क्षमता,त्याची ओळख निर्माण करतात.स्वत: इतकेच इतरांना महत्व द्यायचे शिकले तर
सर्वच आनंदी राहतात आणि आपणही दुःखी राहत नाहीत.