एप्रिल फूल !
- ना.रा.खराद
दरवर्षी एक एप्रिल उजाडला की आतापर्यंत मला किती जणांनी मूर्ख बनवले ह्याचा मी हिशोब करत असतो.इतरांना आपण किती मूर्ख बनवू शकतो,ह्यावर आपला शहाणपणा अवलंबून असतो.शहाणी माणसं एकटी पडण्याचे हेच कारण असते की ते मूर्ख नसल्याने त्यांचा वापर करुन घेता येत नाही.
शहाणे असण्यापेक्षा मूर्ख असणे कधीही फायद्याचे आहे.
जिकडे तिकडे माणसे एकमेकांना मूर्ख समजत आहेत किंवा बनवत आहेत,कारण त्याशिवाय जीवनात यश नाही.
प्रत्येकजन इतरांना मूर्ख समजतो, स्वतःपेक्षा कमी शहाणा समजतो.
सर्व जाहिराती, निवडणुकीतील प्रचार, शृंगार इतरांना मूर्ख बनविण्यासाठी आहे,भूलविणे म्हणजे मूर्ख बनवणे होय.
सर्व चमत्कार मूर्ख बनविण्याचा उद्योग आहे. जो जितका मूर्ख बनवू शकतो,तो तितका यशस्वी होतो.
कुणीही स्वतःला मूर्ख समजत नाही, उलट शहाणा समजतो.
स्वतःला शहाणे समजणे हाच खरा मूर्खपणा आहे.मूर्ख काहीही करू शकतो,त्यास काहीही वाटू शकते,त्यास काहीही हवे असू शकते.तो कुठेही जाऊ इच्छितो,तो काहीही मागू शकतो,तो काहीही बोलू शकतो.मूर्खपणाला मर्यादा नसतात.
दैनंदिन जीवनात कितीतरी लोक आपणास मूर्ख समजत असतात किंवा बनवत असतात.परंतू आपण मूर्ख बनवले गेलो,ह्याची वाच्यता कुणी करत नाही.फसवणे म्हणजे मूर्ख बनवणे.वेळ टाळण्यासाठी, वेळ मारुन नेण्यासाठी मूर्ख बनवले जाते.
कुणी जन्मजात मूर्ख असते, बनवण्याची गरज नसते.असे मूर्ख सदैव उपलब्ध असतात, त्यांना समजावणे शक्य नसते
म्हणून कुणी त्यांना समजावत नाही.मूर्खांचे शहाण्यांशी जन्मजात वैर असते.आपण मूर्ख बनवले जात आहोत किंवा गेलो आहोत, हे अनेकांच्या कधीच लक्षात येत नाही.
नको त्या गोष्टीत नाक खुपसून मूर्ख फजिती करुन घेतात.फाजिल लाड किंवा अभिमान बाळगतात.उचापतीखोर
असतात.आपणास लोक मूर्ख समजतात, इतके देखील त्यास
कळत नाही.
मूर्ख व्यक्ती कुठल्याही अधिकारावर असेल तर त्याचा मूर्खपणा झपाट्याने पसरतो.मूर्ख असून देखील मिळणारा मानसन्मान त्यास मूर्खपणाचा विसर पाडतो. समर्थ रामदासांनी मूर्खांची अनेक लक्षणे सांगितली आहेत,ती तपासून बघण्याची तारीख एक एप्रिल असावी.आपल्या शहाणपणाविषयी शंका घेण्याचा दिवस म्हणजे एक एप्रिल.
आपण शहाणे असल्याचा टेंभा सर्व मिरवतात परंतु आपण मूर्खपणा करतो असे कुणीही सांगत नाही, खरे म्हणजे प्रत्येकाने आपण केलेला मूर्खपणा उघड केला पाहिजे,तरच
या दिवसाचे महत्त्व सार्थकी लागेल.