लग्नासाठी मुलगी बघणे असो की नोकरीची मुलाखत असो.बाजारात वांगे निवडणे असो की दगडगोटे निवडणे असो. जिथे निवडीचे स्वातंत्र्य आहे. तिथे पारख महत्त्वाची असते.ज्याची योग्यता आपणाकडे
असते साहजिकच त्याची पारख आपणास चटकन होते.माणसे असो वा वस्तू ती पारखली जातात. पण ती पारखी नजर सर्वांकडे नसते. अधिकार असतो,पारख नसते.
पारख नसल्यास योग्यता कळत नाही. कित्येक हिरे कवडीमोल ठरतात. तर दगडगोट्यांना हिऱ्याचे मोल प्राप्त होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण ते ओळखण्याची ताकत सर्वांकडे नसते. हिरा देखील गारगोटीच्या भावात विकणारे लोक आहेत. जवळचे लोक जेव्हा पारखी नसतात तेव्हा दूरचा कुणीतरी पारखी त्याचे मोल जाणतो त्यास पैलू पाडतो.
साध्या साध्या गोष्टींची देखील पारख लागते.पारखून तर सगळेच घेतात पण खरी पारख क्वचितच असते. अनेक गुणवान उपेक्षित रहाण्यामागचे हेच कारण असते. पारखी नजर कुछ और चीजहै.प्रतिभा,गुणवत्ता हि कुठेही असू शकते.ती शोधायची असते.उद्याचा वटवृक्ष आजच्या बीजात दडलेला असतो.बीज ओळखण्याची प्रतिभा असली पाहिजे. ओळखणे म्हणजेच पारख.अशा पारखी व्यक्तीची समाजाला गरज असते.
जे पुस्तक मी एक हजार रुपयाला खरेदी केले होते, एक अडाणी मनुष्याने आपल्या लहान
बाळाला खेळायला दिले होते. पारख ,ओळख असल्याविना महत्त्व दिले जात नाही. आपण कशाला महत्त्व देतो यावरून शुद्धा आपली पारख होते. कोळी पाण्यात फक्त मासे बघतो.जसी वासना तशी
नजर असते. श्रेष्ठ गायकास गायकाची पारख असते. आपण जसे असतो ,ज्या योग्यतेचे असतो आपल्या आवडी निवडीही तशाच असतात. अनेक क्षेत्रातील आजचे नामवंत कुणी तरी पारखलेले आहेत. रद्दीत एखादे विशेष पुस्तक हाती लागावे तसे घडते. एकासाठी जी रद्दी असते कदाचित दूसऱ्यासाठी तो हिरा असेल. सर्व बाबतीतली
प्रतिभा सर्वांकडे नसते. योग्य संयोग घडला की मेहनत फळाला येते. गाढवांपुढे गीता वाचून उपयोग नसतो.बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला किंमत नसते. मूर्खांला विवेक सांगून उपयोग नसतो.
लताच्या आवाजातला गोडवा कुणीतरी पारखला तेव्हा त्याचे सोने झाले. न्यूटनकडे
पारखी नजर होती म्हणून गुरुत्वाकर्षणचा शोध लागला. बोधाशिवाय शोध लागत नाही.
चिखलात पडलेले एक रुपयाचे नाणे जसे लहान मूलही ओळखते.ओळख असली की लाखोंत आपण ओळखीचा माणूस ओळखतो.इतरांचे गुण ओळखणे यासाठी महान प्रतिभा लागते.नसता ईश्वराला तुडवत
मंदिराच्या पायऱ्या चढणारे कमी नाहीत. जवळचे गुणी लोक आपणास ओळखत नाहीत किंबहुना तसे आपण सोंग केलेले असते. जवळच्या मंदिरात जसे आपण जात नाहीत. तसे आपणास घरातले,सहवासातले
प्रतिभावंत, गुणवंत.दिसत नाही.
बाळकृष्णाला देखील ओळखणारे सर्व नव्हतेच.त्याचे दिव्यरुप अनेकांना ओळखता आले नाही. मूळी आपणास आपल्या जवळचा,आपल्यातील कुणी गुणी असल्याचे सहन होत नाही त्याने आपणास कमीपणा येतो.सर्वच प्रतिभावंताची जवळचे लोक उपेक्षा करतात. इतरांनी उदोउदो केला कीनाईलाजाने आपणही तो करतो.
हा करंटेपणा सोडला पाहिजे.