सुधीरचे महाविद्यालयीन शिक्षणाचे अखेरचे वर्ष होते,आता पुढे काय करायचे हा यक्षप्रश्नही त्यास छळत होता.
आयुष्याचे एकविस वर्षे सरली होती.वडीलाचा शेती व्यवसाय, त्यामुळे सुट्टी असली की तो शेती कामात मदत करत असे.सुधीरला शेतातील ते नैसर्गिक वातावरण खूपच आवडत असे,कधी मित्रांच्या शेतात तो जात असे.
सुधीर स्वच्छंदी असला तरी स्वैर नव्हता,त्यास वाचनाची खूप आवड होती, हातात नेहमी पुस्तक असायचे, गावचे टवाळ त्यास ' पुस्तकी कीडा ' म्हणून हीनवायचे, परंतु तो त्याचे वाईट मानत नव्हता, वाचनामुळे तो लहान वयात प्रगल्भ विचार करु लागला होता. सुधीर तरुण वयात होता, उच्च शिक्षित होता, देखना होता त्यामुळे अनेक सग्यासोयऱ्यांच्या नजरेत होता.घरातमध्ये लग्नाचा विषय निघायचा,नकळत सुधीर ते ऐकायचा.सुधीर वृत्तीने भाऊक होता, चटकन रडायचा.आईच्या मायेला पारखा होता,कुणी थोडं चांगलं बोललं की तो विरघळून जायचा.
आतापर्यंतचे सुधीरचे आयुष्य अत्यंत सुकर होते, कशाचीही उणीव नव्हती परंतु दिवस फिरले होते.होत्याचे नव्हते होऊ लागले होते.जगातील सगळीच संकटे त्याच्या वाट्याला येऊ लागली होती.नाव जरी सुधीर होते,तरी धीर
सुटत चालला होता.असंख्य जवाबदारीचे ओझे त्यावर पडले होते,एक तर उचलावे नसता त्याखाली दबून मरावे अशी अवस्था झाली होती.जगण्याचा मोह सुटत नव्हता, कर्तव्याचा विसर पडत नव्हता,दाही दिशा अंधारल्या होत्या, तो सहन करत होता,लढत होता.गरीबीने तो पार कोलमडून पडला होता.सुधीरला आज नाही तर उद्या नोकरी मिळेलच असे सर्वांना वाटते होते, तशी पात्रता त्याच्याकडे होती, परंतु "स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरच
आपण लग्न करू." असे त्याने ठरवले होते परंतु मध्यस्थीच्या आग्रहास्तव तो मुलगी बघायला गेला.आणि " मला मुलगी पसंत आहे,मी तिच्याशीच लग्न करणार." असे निक्षून सांगितले.
मोठा भाऊ संपत म्हणाला," या वयात सर्वच मुली सुंदर दिसतात,तु घाई करू नको, अजून मुली बघ". सुधीर काहीच बोलला नाही.वडील म्हणाले," त्यास पसंत आहे मुलगी,मग हो म्हणून सांगा." मुलगी पसंत असल्याचा निरोप गेला.लग्न मात्र एक वर्ष लांबणीवर, नोकरी मिळेपर्यंत!
सुधीर नोकरी शोधू लागला, अनेक संस्था चालकांना भेटला.नोकरी मिळणार ह्याची खात्री पटली.मे महिन्यात त्याचे लग्न उरकले, पुन्हा नोकरीचा शोध!