माणसाच्या शरीराचा सर्वात जुल्मी अवयव म्हणजे डोळा.दिसतो चिमुकला पण ब्रम्हांड पहाण्याची ताकत.जन्मलेले बाळ जेव्हा डोळे उघडते आणि पहिली नजर त्या नजरेवर पडते तेव्हाच जन्माचा डोळस सोहळा पार पडलेला असतो.
डोळे हे भावनेचे आगार आहे. सर्व भाव डोळ्यावाटे व्यक्त होतात. डोळस माणसे
प्रत्येक भाव ताडतात.तेज डोळ्यात दिसते. स्नेह डोळ्यातून झरतो.दूःखाचा बांध डोळ्यावाटे फूटतो.मायेचा पाझर डोळ्यात साठतो.आनंदाची चमक डोळे दाखवतात.
प्रेम डोळ्यावाटे जुळते.ज्ञानाचे तेज डोळ्यात दिसते. तपश्चर्येची शांती डोळ्यात दिसते.
क्रोध,वासना याचे द्वारही डोळेच आहेत.
डोळे मिटले की झोपला म्हणतात. मरणातही डोळे लागले म्हणतात. चिंतेत डोळ्याला डोळा नसतो.कुणाचा कशावर तरी डोळा असतो.अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला जातो.डोळेझाक केली जाते. कुणी डोळे वटारतो.कुणी डोळा मारतो.वय झाले की डोळे जातात. आजाराने डोळे येतात. ठेचा खाल्ल्या की
डोळे उघडतात. परीक्षेच्या तयारीत मुले डोळे फोडतात. लाजाळू मुली डोळे वर
करुन बघत नाही.अनेकजन डोळे
लावून बसतात.ढगांप्रमाणे डोळे भरून येतात.
कुणी डोळ्यात खुपतो,कुणी डोळ्यात बसतो.कुणी डोळ्यातून उतरतो.तर कुणी डोळ्यात चढतो.डोळे कुणी फिरवतं,डोळा
चूकवून आपले काम साध्य करते.काही कारणांनी डोळे जातात. आजारात किंवा
घाबरल्याने डोळे पांढरे होतात. रागाने डोळे लाल होतात.सीमेवर सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. झोप आली की डोळे ताणले जातात.
डोळे हा ब्रम्हांड पहाणारा तसाच डोळ्यात
ब्रम्हांड दिसणारा अवयव आहे. आपण जसे असतो तसे डोळ्यात दिसतो.डोळे खाली घालण्याची वेळ डोळ्यावर आणू नये. डोळ्याला डोळा भिडवून बोलण्याची ताकत त्यात असावी.भावनेचा ओलावा आणि ज्ञानाचे तेज ज्या डोळ्यात दिसते,
तेच दिव्य डोळे होय.