पूर्वी घर म्हणजे माणसांचा संग्रह होता, अनेक माणसे एकोप्याने, विश्वासाने आणि आधाराने राहत होती.हल्ली घरे मोठाली झाली, त्यामध्ये माणसे मात्र नाहीत.
माणसांऐवजी घरं वस्तूंनी भरु लागली,
माणसांची अडचण वाटू लागली आहे.
सतत वस्तू खरेदी करत राहणे व पुढील वस्तूसाठी कुरबुर करत राहणं हाच वस्तूपाठ झाला आहे.घरात गरजेच्या वस्तू असाव्यात परंतु वस्तू हिच जर आपली गरज बनली तर घर हे वस्तू संग्रहालय होऊन जाते.
साधनांची आता इतकी रेलचेल झाली आहे की संपूर्ण आयुष्य या साधनांसाठी घालवलं जाऊ शकतं.गरज असो वा नसो , जे इतरांकडे आहे ते माझ्याकडेही असलेच
पाहिजे ही भावना बळावत चालली आहे.
हा हव्यास अनाठायी आहे, परंतु लौकिकतेसाठी त्याचा वापर होतो.
एकापाठोपाठ एक वस्तू खरेदीथद करताना घर नकळत वस्तू संग्रहालय होऊन जाते.माणसे नकोशी होतात, वस्तू जवळच्या वाटतात.
कुवत नसताना वस्तू खरेदी करणं तर महामूर्खपणा आहे.इतरांची बरोबरी करणं,शक्य असेल तर त्यास मागे टाकणे
असले गलिच्छ विचार सुरू असतात.
माणसाची प्रतिष्ठा त्याच्या घरात कोणत्या वस्तू आहेत यावरून ठरु लागली, त्यामुळे यातील स्पर्धा वाढली आहे.
क्वचित वापरात येणाऱ्या वस्तू किंवा अल्प उपयोगी वस्तू या घरात बाळगणे कितपत योग्य? ज्या वस्तू सहज भाड्याने मिळतात, त्या कायमच्या घरात नसलेल्या बऱ्या.
एकाच प्रकारच्या एकापेक्षा जास्त वस्तू, कालबाह्य झालेल्या वस्तू उगीच अडगळीत बाळगणे गरजेचे नाही.घरात सामान हवे, परंतु सामानासाठी घर नको!
घर हे माणसाने गजबजलेले असावे.तिथे नात्यातील लोकांचा गोपाळकाला असावा
नुसता वस्तूसंग्रह नसावा.
सर्वच कामे साधने करु लागली तरी त्या साधनांसाठी कामे करावी लागतात.
जिवाचा इतका आटापिटा कधीच करु नये.कुणालाही आपणाकडे काय आहे हे सांगू नये आणि त्याच्याकडे काय नाही हे लक्षात आणून देऊ नये.
साधेपणात देखील खूप सुख असते,सुख हे वस्तूंमध्ये नसते.
घराचे घरपण त्या घरातील लोक आणि आपुलकीची माणसे आणि नेहमी असणारी वर्दळ हेच खरे वैभव, फक्त वस्तूंनी भरलेले व माणसांनी रिकामे असलेले घर ,घर नव्हे!