जीवन गाणे..

         जीवन गाणे..
                          - नारायण 
जीवनात आनंदी रहाता आले पाहिजे.
त्यासाठी जीवन समजून घेतले पाहिजे.
आपण प्रथम डोळे उघडतो तेव्हा सर्वकाही नवं असतं.चिमुकल्या डोळ्यांसमोर अफाट जग पसरलेले असते.
आपले काहीच नसते तरीही सर्वकाही आपलेसे वाटते.
आपले काहीच नसते, त्यामुळे कमावणे गमावणे ह्याला फार महत्त्व देण्याची गरज नसते.आपलेही कुणीच नसते म्हणून आयुष्यभर कुणामुळे किंवा कुणासाठी झुरण्या मरण्याची गरज नसते.दु:खाला तर मुळीच कवटाळू नये,त्यास चांगल्या दोन लाथा घालाव्यात.एकदाच मिळणारे इतके आनंदमयीजीवन उगीच रडण्यात वाया घालायचे हे मला मान्य नाही.
 आयुष्य चौफेर जगले पाहिजे.खळखळून हसले पाहिजे,रडले पाहिजे पण निराश कधीच व्हायचे नाही.काही असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही.
 जगण्याची एक धुंदी पाहिजे.जगणे पुळचट नसावे‌.फार हिशोबी नसावे, ओसंडून वाहवे.
आपल्याच विश्वात रममाण व्हावे.कुठे बरे वाटले विसावा घ्यावा,कुणाशी बोलणे बरे वाटले बोलावे, नको ते टाळावे.घालू नये हुज्जत कुणाशी , अमूल्य वेळ वाया घालू नये.न्याहाळावे स्वतः ला आणि निसर्गाला व्हावे बेधुंद आपल्याच जगात.
बघावीत स्वप्ने हवी ती.काढावी आठवण पाहिजे त्याची.असावे मनात कुणीतरी मनासारखे जपावे त्यास स्वतः साठी. फुलपाखरू बघावे, पाखरांचे थवे बघावेत.असावे माणसाच्या जगात परंतु इतर पशु पक्षांचा विसर पडू नये.चाखावीत फळे प्रत्येक मोसमातली.समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांसोबत बेधुंद व्हावे.
पावसाच्या सरी घ्यावात अंगावर,पडू द्यावे चांदणं मुखावर, सूर्यकिरणांना रमू द्यावे थोडे सर्वांगावर,लागू द्यावी झुळूक वाऱ्याची कोमल ओठांवर ,उडू द्यावे केश मुक्त. पडू द्यावा कानी स्वर खळखळून वाहणाऱ्या झऱ्याचा.
🌙 चंद्राच्या मंद प्रकाशात न्याहाळत बसावे सौंदर्य सखीचे.नसानसात भिनू द्यावा सुगंध झाड फूल वेलींचा.
लुकलुकणारे तारे बघायला शिकावे.कोकीळेच्या स्वर मिसळावा ,गावे गोड गाणे जीवनाचे.
 सुगरणीचा खोपा बघावा, बघावं स्वप्न आपल्याही घरट्याचे.ओढे नालेही तुडवित जावे.डौलात उभी असलेली काटेरी बाभूळही डोळ्यात भरावी कधी.कडू लिंबाची गोड सावली घ्यावी अंगावर.
खारुताईचे खेळ बघावेत.निसर्गाच्या मांडीवर पहुडावे मुक्तपणे ,जीवन गाणे गात राहवे.
           ‌

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.