- ना.रा.खराद
लग्नं एक सामाजिक व्यवस्था आहे,गरज आहे, प्रथा आहे, संस्कृती आहे, अजून वाट्टेल ते! असो.
विषय असा आहे की लग्न जुळवले कसे जाते? सर्वांना ठाऊक आहे की नाव,रासनाव, कुंडली वगैरेंचा
आधार घेऊन भटजी लग्न जुळवतात.ज्यांचे लग्न आहे, त्यांचे खरे गुणदोष न बघता फक्त नाव, जन्मपत्रिका बघितली जाते.हे कितपत वैज्ञानिक आहे,कधी कुणी तपासून बघत नाही.
न्यायालयातील घटस्फोटाचे खटले हेच दाखवतात की लग्न योग्य ठिकाणी जुळलेले नाही.लग्न जमवतो
भटजी आणि विच्छेद मात्र कोर्टात! बैलजोडी घेताना देखील सारखेपणा हा निकष असतो. आज टक्के लग्न अयशस्वी ठरले आहेत,कारण गुण सारखे नाहीत.कागदावर गुण जुळणे आणि खरेखुरे गुण जुळणे यामध्ये खुप फरक आहे.लग्नाचा गाजावाजा खुप होतो, परंतु पुढे काय होते कधी कुणी बघतं का,भटजी
तरी विचारतो का? मंडपवाला लग्न लागले की मंडप सोडायला सुरुवात करतो.घोडेवाला घोडा घेऊन निघून जातो,वऱ्हाडी जेवून तृप्त होतो,निघता होतो.बैंडवाले वाजून मोकळे होतात.फोटोग्राफर एक डोळा झाकत
पाहिजे तसे फोटो काढतो.जवळचे नातेवाईक नावं ठेवत निघून जातात.बायांचे मानपान सुरू होतात.
नवरदेवाचे मित्र मनसोक्त ढोसतात आणि नाचतात.हा सगळा फार्स संपला की लग्न काय असते हे कळते.
लग्न जुळविताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे,कारण लग्न हे दोन वस्तूंचे नसून दोन जिवांचे आहे. आर्थिक स्तर देखील बघणे गरजेचे आहे.मुलगा असो वा मुलगी आर्थिक स्थिती समान असलेली बरी.यामध्ये खुप तफावत असेल तर खुप ओढाताण किंवा कुचंबणा होते. आर्थिक स्तर समान असेल तर एकमेकांना समजून घेणे सोपे जाते,कुणी कुणाला कमी लेखत नाही किंवा फार श्रेष्ठ समजत नाही.
शारीरिक व मानसिक आणि बौद्धिक क्षमता कितपत समान आहे, शैक्षणिक आणि सामाजिक ज्ञान कितपत आहे, भावनिक समानता आहे का ,या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.लग्नापूर्वी कोणतेही दुर्गुण माहिती नसतात आणि मग एकापाठोपाठ एक दिसू लागतात, आणि आयुष्याचे मातेरे होते.दोन व्यक्तीमधला खुप फरक त्यांना कधीच सुखी ठेऊ शकत नाही, त्यामुळे आवडीनिवडी माहिती करुन घेणे गरजेचे आहे.
दोन चपाती खाऊन जिचे पोट भरते आणि नवरा जर बारा पोळ्या खात असेल तर ती खरेच सुखी राहू शकेल का,तोंडात कायमचा तंबाखू, गुटखा चघळणारा नवरा,त्याचा दर्प पण सहन न करु शकणारी पत्नी कधीतरी त्यास पसंत करेन का? जसं असेल तसे निभावण्याचे दिवस आता संपले, आता पटत नसेल तर कुणी पटवून घेत नाही, त्यासाठी अगोदरच विचार व्हायला हवा.
मुला मुलींना कायम जडलेला आजार असेल आणि तो लपवून ठेवत लग्न उरकले, कालांतराने ते उघड होते आणि त्या कुटुंबात वितुष्ट निर्माण होते.घोरणे,बरळणे असल्या गोष्टी लपवू नये.कोणत्या कलेची आवड आहे, एकत्र कुटुंब आवडते की विभक्त हे विचारले पाहिजे.लग्न विनाअट पार पडते आणि नंतर अपेक्षांचा पाढा वाचला जातो.
दोन व्यक्ती पूर्णपणे समान असू शकत नाही, परंतु किमान गुण समान असले तर लग्न यशस्वी होऊ शकते, त्यामुळे पंचांगानुसार लग्न न जुळवता खरेखुरे गुणदोष समोर आले पाहिजेत.