धांदल..

              धांदल..

आजकालचे जीवन धावपळीचे झाले आहे.कुठेच थांबता येत नाही.जिथे जावे तिथे रांगा.उसंत अशी नसते.रांगेत मिळते तेवढीच उसंत मानायची, पुन्हा पळायचे.निवांतपणा असा कुठेच नाही.वेळेचे बंधन पाळणे आणि त्यासाठी पळणे नित्याचेच झाले आहे.
गरजेनुसार घाई ,धावपळ किंवा धांदल करावी
लागते परंतु गरज नसतांना जेव्हा ती केली जाते तेव्हा ती हास्यास्पद ठरते.
धांदल हा काहींचा स्वभाव असतो."अति झालं आणि हसू आलं." या प्रकारात ते मोडते.
माझे एक शिक्षक मित्र असेच अति धांदली आहेत. .या धांदलीमुळे त्यांच्या हातून कितीतरी कपबशा फुटल्या असल्याची माहिती त्यांच्या अतिशांत सौ कडून मिळाली.
"लग्नाच्या वेळी शेवटचे मंगलाष्टक संपण्याच्या अगोदर माझ्या गळ्यात माळ टाकून मोकळे झाले होते." हाही पराक्रम त्यांच्या नावी आहे.त्यांच्या धांदली स्वभावाचे अनेक किस्से अनेकांनी ऐकवले आहे.पैकीमाझ्याकडेही ते कमी नाहीत.
"अति घाई ,काम वाया जाई." हा फलक आम्ही त्यांच्या घरासमोर लावला होता.त्या कामात त्यांनी देखील मदत केली होती.
त्यांनी घाईघाईने वाचले ,त्यांना ते कळाले नाही.साधे कुलूप लावतांना एक दोनदा ते हातातून निसटते.कडीमध्ये तीन चार प्रयत्नानंतर ते अडकविण्यात त्यांना यश येते.
चावीचे छिद्र अचूक सापडत नाही.चावी छिद्रात घातल्याविना चावी फिरवली जाते.कित्येकवेळा ते कुलूप तसेच निमुटपणे लटकत रहाते.या गृहस्थाला सूईमध्ये धागा कधीच टाकता आला नाही.सावधानमध्ये उभे रहाता आले नाही.हा गृहस्थ वैद्यकीय क्षेत्रात नसल्याने अनेक अनर्थ टळले असेही बोलले जाते.कुणाचा खांदेकरी हा कधीच नसतो.
धांदल ही त्यांची मुख्य ओळख आहे.इतर सर्व
गुण अवगुण धांदलीत गायब झाले. त्यांचे वर्गातले अनेक किस्से विद्यार्थीसांगतात.डस्टर चार-पाच वेळा खाली पडते तेव्हाच ते फळ्यापर्यंत पोहचते.लिहितांना खडू हातातून निसटला नाही,असे कधीच घडले नाही.खडू उचलण्यासाठी एक विद्यार्थी जवळच बसलेला असे.वही तपासणी वेळेस इतकी धांदल की पान उलटून ठेवलेले असले तरी पाने उलटली जातात.तपासलेली पाने पुन्हा तपासली जातात.बऱ्याच वेळा ते दूसऱ्याच वर्गावर शिकवून यायचे.लघवी नंतर चैन लावणे तर ते कायम विसरायचे.एकदा तर घरून शाळेत निघतांना फक्त अंडरवेअरवरच निघाले होते.गनिमत खिशातून चावी काढतांना त्यांच्या ते लक्षात आले.
एकदा तर मोठी गंमत झाली.बसस्थानकावर ते घाईने महिलेच्या शौचालयात घुसले.आरडाओरडा
झाला.चपलेचा प्रसाद घेऊनच बाहेर!
त्यांच्या या स्वभावापायी त्यांचे हसू तर होतेच,
संकटालाही सामोरे जावे लागते.
बसस्थानकावर बस थांबण्याअगोदरच पायरीवर पाय ठेवण्याची घाई.मग लक्षात येते,"अरे खाली तर पायरीच नाही." कित्येकवेळा गर्दीमध्ये दूसऱ्यांची मुले हाताला धरुन घरी आणली आहेत.आपली सोडून दूसऱ्याच बसमध्ये बसल्याचे ,त्यांचे अनेक प्रसंग आहेत.
अंथरुन तर त्यांना टाकताच येत नाही.पसरविणे आणि लगेच जमा करणे अशी धांदल असते.आपण झोपलो की नाही हे देखील जागे होऊन बघतात.ते चहा घेऊनआले की माणसे उठून चहा घेतात.त्यांनी दिलेला चहा म्हणजे,सांडलेला चहा .'भिक नको पण चहा आवर 'अशीच भावना असते.
त्यांच्या हातामध्ये कोणतीच वस्तू थोडावेळ
देखील स्थिर रहात नाही.पैसे मोजणे तर त्यांना जमतच नाही.शेवटची नोट मोजतांना पुन्हा विसर पडतो.अंघोळ तर इतकी घाईत असते की काही भाग कोरडा घेऊनच बाहेर. विजेचे बटन तर कधीच अचूक दाबता आले नाही.नको ते त्यांच्याकडून सुरू झालेले आहे.
धांदलीमध्ये जोडे तर इतके बदलले जातात की मूळ जोडा कुणाचे पदस्पर्शाने पुनीत झाला कळू शकत नाही.एकदा तर लेडिज चप्पलच घालून घरी.बायकोने पुन्हा लेडिज हिसका दाखवला.
शेकहैंड तर एका हैंडमध्ये कधीच नाही.बऱ्याच प्रयत्नाने हस्तयोग जुळतो.
गिअर टाकतांना तर त्यांची भीती वाटते.ब्रेक वगैरे मध्ये इतकी धांदल की यमसदनीच.
जेवण वाढतांना तर धमाल होते.कढीच्या वाटीत श्रीखंड टाकल्याशिवाय ते स्वस्थ बसत
नाहीत.हात धूण्यापूर्वीच त्यांनी ताट उचललेले
आहे.शर्टचे बटन खालीवर लावणे तर रोजचेच
आपल्या अवतीभवती अशा प्रकारची स्वभाव
वैशिष्ट्ये असलेली माणसे असतात.जीवनात
गंमत यामुळेच आहे.
                                - ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.