- ना.रा.खराद
मी स्री म्हणून जन्माला आले तेव्हा पासूनच मला दुःखाची चाहूल लागली
माझ्या चिमुकल्या कानावर , मुलगीच झाली का? असे शब्द पडू लागले
खरंच मुलीचा जन्म खुपच वाईट
मुलगी झाली म्हणून माझी आई शुद्धा
आतून दुःखी होती,कारण तिने स्री असल्याचे दुःख भोगले होते,तीचे हे तिसरे बाळंतपण होते, अगोदरच्या दोन मुली आणि आता मी तिसरी,मुलगा पाहिजे म्हणून, माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, खुप अगतिक होती,माझा बाप देखील भेटायला नाही आला,मुलगीच झाली म्हणून तिच्यावर खेकसत होता,ती तरी काय करणार होती, इच्छा नसताना तिसरे अपत्य,तेही तिलाच सांभाळावे लागणार होते, वरुन पुन्हा टोमणे!
मी आता रांगू लागले होते
आई कामात असली की मी अंगणात खेळायचे,मी नको असलेली मुलगी
कुणीच माझे लाड करत नव्हते
बाबा दिसले की मी चिमुकल्या पावलांनी त्यांच्याकडे जायचे परंतु कामात असल्याचे दाखवून ते निघून जायचे, आईच्या मागे खुप काम असायचे, कधी कुणी आजारी पडायचे
तेव्हा आई खुप काकुळतीला यायची
मी जसजशी मोठी होऊ लागले
तसतसं दुःखही तीव्र होऊ लागले
माझ्या मोठ्या दोन बहिणी शाळेत जाऊ लागल्या, खरं सांगू त्या दोघी माझ्यावर खूप प्रेम करायच्या, मला कडेवर उचलून घेत, माझे चुंबन घ्यायच्या,मी त्यांच्या मागे लागायचे, मला त्यांच्या सोबत रहावं वाटायचं
आता मी बरीच मोठी झाली होती
माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होणार होतं, मुलं बघायला येत असत, मला वाटायचे, लग्न झाले की ती मला सोडून जाणार,मी पसंत पडू नये यासाठी देवाकडे प्रार्थना करायचे
मीही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होते, जवळपासची तरुण मुले माझ्याकडे आसुसलेल्या नजरेने पाहत होती, माझ्या बद्दलच्या वावड्याही उठवत होती, एकीकडे दोन
मोठ्या बहिणीचे लग्न,बाप पैशाची जमवाजमव करत होता, माझ्याकडे तिरस्काराने पहात होता,आई नदीवर
धुणं धुवायला जायची तेव्हा तिच्या मनात पाण्यात उडी टाकण्याचा विचार यायचा,सुख असे तीला माहीतच नव्हते,नुसते काबाडकष्ट आणि अवहेलना,ती तरी किती सहन करणार,
आईचे दुःख बघून मला खूप दुःख व्हायचे,ती कसाबसा संसार पुढे रेटत होती, अगतिक होती
घरातले सगळे उघडण्यापूर्वी आई उठत असे आणि सगळे झोपले की मग ती झोपत असे,स्री जन्म किती दुःखमय असतो, हे मला उमगू लागले होते
सासूचा जाच,जावाची भांडणं,नवऱ्याचा मार आणि नित्याची
कामे याशिवाय जीवन काहीच नव्हते
आई या सर्व गोष्टींना कंटाळली होती,ती फक्त आमच्यासाठी जगत होती,मी नसेन तर लेकरांना कोण सांभाळेल यासाठी मरण पुढे रेटत होती, परंतु किती दिवस?
माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने कशीबशी उरकून टाकली होती,आई आता खुप थकली होती, अधुनमधून जूना आजार डोके वर काढत होता, काही दिवस ती
अंथरूणावर होती,मी शाळेत जाऊ लागले होते,असेच एक दिवस मी शाळेत मैत्रीणीसोबत खेळत होती, तितक्यात कुणीतरी मला बोलवायला आले,मी दफ्तर घेऊन घरी गेले,बरीच
गर्दी होती,मी आईजवळ गेले, तीला हलवू लागले,आई कायमची गप्प झाली होती.