स्वभावाचे औषध !

         स्वभावाचे औषध !
                               - ना.रा.खराद

प्रत्येक आजारांवर औषध आहे परंतु माणसाच्या
स्वभावावर आजतागायत औषध सापडलेले नाही.जन्मासोबत मनुष्य स्वभाव घेऊन जन्माला
येतो,तो स्वभाव मृत्यूपर्यंत कायम राहतो.
स्वभावदोष व स्वभावभिन्नता यामुळे मनुष्य
वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे.
स्वभावानुसार वर्तणूक किंवा आचरण असते, त्यामुळे आचरणातून स्वभाव प्रगट होतो.
ओळखीचे लोक एकमेकांचा स्वभाव ओळखून असतात.स्वभाव माहिती नसेल तर अडचणी निर्माण होतात.
माणसे आपला स्वभाव लपवण्याचाही प्रयत्न
करतात, परंतु अनायासे तो व्यक्त होतोच.स्वभाव कधीच लपवता येत नाही.
माणसे आपल्या स्वभाववैशिष्ट्याने देखील ओळखले जातात.कित्येकांचा स्वभाव हा स्वभावदोष असतो. 'स्वभाव नडला' असे बोलले जाते.जित्याची खोड असो वा कुत्र्याचे शेपूट ..स्वभावाची अपरिहार्यता दाखवते.
स्वभावानुसार माणसे एकत्र येतात.अगदी भिन्न
स्वभावाची माणसे एकत्र येणे दुरापास्त असते.
लग्नाची बायको आणि नोकरीतला Boss आहे तसा पचवावा लागतो.स्वभाव जसा इतरांचा बदलता येत नाही तसा तो इतरांचाही बदलता येत नाही.अपरिहार्यता असेल तरच मनुष्य इतरांच्या स्वभावानुसार चालतो ,नसता प्रत्येक व्यक्तीला स्वभावानुसार वर्तणूकमध्ये धन्यता वाटते.
शरीराप्रमाणे मन आणि बुद्धी जन्मासोबतच असते.केवळ आहे ते विकसित होते.हवे तसे कधी बनता येत नाही.
लहानसहान गोष्टी देखील स्वभाव प्रगट करतात.
मनुष्य स्वतःच्या स्वभावाला कवटाळून बसलेला
असतो.त्यापासून त्यास वेगळे करता येत नाही.
स्वभावानुसार 'चांगला माणूस' आणि 'वाईट माणूस' असे गट पडतात.
प्रत्येक माणसामधले एक ठळक स्वभाव वैशिष्टे
ओळखीच्या लोकांना निश्चित माहिती असते,त्यानुसार त्यांच्याशी वागावे लागते.
स्वभावाला मुरड घातल्याशिवाय हवे तिथे वावरता येत नाही.तसे करता नाही आले तर माणसाचे हसू होते.
काही ठळक स्वभाव वैशिष्टे बघुयात.
रागीट,तापट किंवा चिडचिडी माणसे खूप आढळतात .शांत, संयमी लोकांना अशा लोकांचा खूप त्रास होतो.अशी माणसे त्यांच्या सारख्याच लोकांसोबतही राहू शकत नाहीत.अशी माणसे कशाने भडकतील सांगता येत नाही.
अशी माणसे पिण्यासाठी पाणी मागायचे असेल तरी रागाने मागतात.'नमस्कार' देखील रागात! 
चिडचिडेपणा हा तर सतत केलाजातो.गरज नसतांना केवळ स्वभाव म्हणून तो केला जातो.अशा लोकांना पार वैतागून जातात
सगळे.सार्वजनिक ठिकाणी तर हा स्वभावदोष फारच फोफावतो.मनासारखे काहीच नसले की
अजूनच चिडचिड होते.या स्वभावाची माणसे
कायम त्रस्त राहतात.लोकांना आनंदी बघून देखील ते चिडतात.लोकांना अक्कल नाही,बेशरम आहेत असा तो त्रागा करतो.
बडबडी माणसे, आपल्या स्वभाववैशिष्ट्याने अत्यंत नावाजलेली असतात.असतील तिथे त्यांची बडबड सुरु असते.इतरांचे ऐकायचे नाही, स्वतः चे बोलणे थांबवायचे नाही.पूर्णविराम असा त्यांना माहिती नसतो.कान नसल्यासारखे ते फक्त बोलत राहतात.
मितभाषी स्वभाव ,अशा स्वभावाची माणसे वाखाणण्याजोगी असतात.परंतू मठ्ठ मितभाषी
समजण्याची चूक करु नये.आपला स्वभाव
जपण्यात तो धन्यता मानतो .बोलण्याची गरज
असतांनाशुद्धा तो अल्प बोलतो आणि ती चूक
ठरते.बडबड्या आणि मितभाषी एकाच माळेचे मणी.
अंहकारी, गर्विष्ठ स्वभावाची माणसे सर्वांना नकोसी होतात.प्रत्येक गोष्टीचा अंहकार बाळगणे हा त्यांचा स्वभाव असतो.स्वत:चा हातरुमाल देखील त्यांना सर्वांच्या हातरुमालापेक्षा विशेष वाटतो.आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा गर्व बाळगणारा ,त्याच इतरांकडे बघितल्या की,गर्वाचे घर..सारखी अवस्था होते.
संशयी वृत्ती काहींच्या ठिकाणी असते.प्रत्येक घटनेकडे तो संशयाने पाहत असतो.माणसांवर विश्वास नसतो.शंका घेणे हा स्वभाव खूप नडतो.
काही माणसे जिद्दी स्वभावाची असतात.आपली
जिद्द पूर्ण करण्यासाठी टोकाला जातात.गरज नसतांना केवळ स्वभाव म्हणून सर्व करतात.
बेफिकीर स्वभावाची माणसे असतात.आपले खूप नुकसान करुन घेतात किंवा फायद्या पासून
वंचित राहतात.अशा स्वभावाने खूप नुकसान होते.
चिंतातूर स्वभावाची माणसे.कायम चेहऱ्यावर आठ्या घेऊन जगणारी माणसे.त्यांना जिकडे-तिकडे अडचणी दिसतात.सगळे काही वाईट चालले आहे असेच त्यांना दिसत असते.कशातही चिंता शोधतात.अशी माणसे कधीच सुखी राहत नाही व इतरांनाही राहू देत नाहीत.
स्वभाव हाच खरा धर्म आहे.तो प्रत्येकाचा वेगळा
आहे.आपला स्वभाव आपण ओळखला पाहिजे,तो इतरांनी सांगण्याची गरज असू नये.
स्वभाव हा स्वभावदोष ठरु नये,तो अधिक संतुलित कसा राहिला याबाबत विचार केला पाहिजे.
                     
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.