- ना.रा.खराद
आपले आयुष्य म्हणजे आपणास मिळालेली वेळ आहे, आपण ती वेळ कशी घालवतो किंवा वापरतो ह्यांवर जीवनाचे मोल ठरते.वेळ विकत घेता येत नाही, गेलेली वेळ परत येत नाही, वेळ ही एक संधी असते, वेळ ओळखता आली पाहिजे.कधी वेळ पाळावी लागते तर कधी ती टाळावी लागते.वेळोवेळी वेळेचा विचार करावा लागतो.कोणतेही काम वेळेवर केले तर त्यामध्ये यश लाभते.वेळ कुणासाठी थांबत नाही.वेळ सांगून येत नाही, परंतु खुप काही सांगुन जाते.
कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही, वेळेवर कामीं येणारी माणसे प्रिय ठरतात.कुणासाठी वेळ देणे फार मोलाचे असते.कुणाकडे वेळ नसते,तर कुणाची वेळ जात नाही.कोणत्याही कामाची वेळ ठरलेली असते तर कुणी वेळेअगोदर काम उरकून घेतो.वेळ दिसत नसली तरी दाखवत खुप काही असते.जो वेळेवर हजर तो लाभ पावतो.कधी वेळ येऊ द्यावी लागते,वेळेची वाट बघितली जाते.
कधी वेळ निभावून नेली जाते.कधी वेळेअभावी कार्य अर्धवट राहते.कधी वेळ पूरत नाही,कधी वेळ सरत नाही.कधी वेळेचे भान राहत नाही तर कधी वेळ भानावर आणते.वेळेचा कोण कसा उपयोग करते ह्यांवर जीवनाचे गणित अवलंबून असते.वेळ अमूल्य आहे असे काहींना वाटते तर ती जाणारच आहे असे काही समजतात.वेळ बदलत असते.
कोणत्याही कामाची एक वेळ असते, उशीर झाला असे वेळ सांगते.वेळेचे वेळापत्रक असते, त्यानुसार सर्व चालते.घड्याळ वेळ दाखवणारे यंत्र आहे.घड्याळ बघून निर्णय घेतले जातात.जो वेळ पाळत नाही,त्याचा
कार्यभार बुडतो,तो विश्वासपात्र नसतो.कधी वेळ अटीतटीची असते.काही मिनिटे महत्त्वाची असतात,वेळेची
नजाकत ओळखायला हवी.जशी जन्माची वेळ असते तशी ती मृत्यूचीही असते.
वेळ निघून जाते, वेळ घेऊन जाते.वेळ टाळावी लागते, पाळावी लागते आणि अगोदर कळावी लागते.वेळ
मोफत असली तरी कधी महाग पडते.कधी वेळेमागे धावावे लागते तर कधी वेळ चुकवावी लागते.वेळ खुप शिकवून जाते.वेळ एक संधी आहे, वेळ एक संदेश आहे.वेळ कधी थांबेल सांगता येत नाही.वेळ श्वास आहे.