आपण कुणासाठीच आणि कशासाठीच वेडे होत नाहीत, इतके शहाणपण बाळगून आहोत.शहाणपणाच्या अतिरेकामुळे जीवनातली गंमत आपण हरवून बसलो आहोत.लहान मुल आपल्याच जगात वावरते.ते जे काही करते त्यास आपण बालिशपणा म्हणून मोकळे होतो.परंतु जगण्याची खरी मजा याच बालिशपणात दडली आहे. शहाणपणाची प्रतिमा जपण्यात आयुष्याचे मातरे होऊन जाते.आयुष्य इतरांना आपण कसे जगतो हे दाखवण्यासाठी नसते.
आपण आपले आपल्या आनंदात असले पाहिजे.गोरा कुंभार भक्तीत वेडा झाला होता.कुणी देशभक्तीत वेडा होतो.झपाटलेला माणूसच खरा जगत असतो. वेड लागावे असे खुप काही आहे. मजनू लैलासाठी वेडा झाला.
स्वच्छंदी जगणे ते हेच.ओसंडून वाहणे हे जसे
नद्यांचे जीवन तसे मानवाचे देखील. पक्षी कसे
किलबिल करतात. हवे त्या ठिकाणी बसतात.
आपण किती किती बंधणे पाळतो.पार जखडून गेल्यासारखे. इतरांना आपण कसे दिसतो,लोकांना आपल्या बद्दल काय वाटते,
हि गुलामीची मानसिकता आहे. आपण काय
लोकांच्या तालावर नाचणार?
शिष्टाचार आणि संस्कृतीच्या नावाखाली माणसाचे मूळच नष्ट झाले आहे. समजा ,मला एखादे झाड आवडले आणि मी त्या झाडाखाली बसलो तर हजार लोक विचारतील, इथे का बसला? काय उत्तर देणार? मी जर म्हणालो,'मला आनंद मिळतो.' लगेच म्हणतील,'वेडा दिसतो.' वेडे असणे आणि वेडे समजणे यामध्ये फरक आहे. शहाणपणाचे जे निकष आहेत तेच मूळात. वेडेपणाचे आहेत. इतर प्राणी कुठल्याही नियमाशिवाय जगतात. माणसाने माणसासाठी जे लाखों निमय घालून दिले,त्याने माणसाला खरेखुरे वेड लागले आहे. जाती धर्म ,भाषा,वर्ण हे सर्व मानवी भेद का शहाणपणाचे आहेत? हजारों माणसांची कत्तल यामुळे होत आहे.
माणसाला कशाचे तरी वेड असले पाहिजे. नफा नुकसान बघत जगणे ,हे काय जगणे आहे. जीवंत रहाणे वेगळे आणि जगणे वेगळे.जगण्याची एक धूंदी ,नशा असला पाहिजे.उमलणाऱ्या चिमुकल्या कळीकडे न्याहळून बघा,किती अलगद ती उमलते.तिचा आकार आणि रंग वेड लावतो.निसर्गाने आपल्या अवतीभोवती रंगाची उधळण केली आहे ,डोळे उघडा आणि बघा वेडे होऊन जाल.शहाणपणाचा बुरखा फाडा आणि करा
प्रवेश वेड्या जगात जिथे शेकडों फुलपाखरे
तुमच्यावर रंग उधळत आहेत. पडा जरा बाहेर त्या कागदी नोटांच्या बाहेर.घ्या उंच भरारी पक्षांच्या सोबत.लागू द्या वेड बघून आसमानात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे.पडु द्या कानी खळखळणाऱ्या नद्यांचे सुर.वातावरणात दरवळणारा केतकीचा सुगंध
जाऊ द्या नाकात होऊ द्या वेडेपिसे कशाने तरी.
आसमंतात घिरट्या घालणारे गिधाड ,बघा त्याची कला.लुकलुकणाऱ्या चांदण्याची ती सजावट कोण बघणार. वेड लागावे असे सर्व काही आहे पण आपण वेड लागू देत नाही. कणाकणाने वारूळ बनवणाऱ्या मुंग्या, मध जमा करणाऱ्या मधमाश्यांना विचारा ,जगण्याचे वेड काय असते. आपल्या धूंदीत हसा,रडा,पळा,उडा,कुणाचीही तमा बाळगू नका.
हा स्वर्ग आहे ते ओळखा.सुखासाठी जगा,सुखाने जगा.त्यासाठी फक्त पैसे कमावण्याची धडपड करु नका.चिमणीचे पोट भरते तसे हत्तीचेही भरते.फक्त पोट भरण्यासाठी नाही तर मन भरण्यासाठी जगा.प्रतिष्ठेची लक्तरे फेकून द्या.महत्वाकांक्षेची कास सोडा.घ्या उंच
मानसिक भरारी.सगळीकडे प्रेमाने बघा.एक स्वच्छंदी आयुष्य जगा.आपले एक जग निर्माण करा.त्यामध्ये रममाण व्हा.स्वतः च्या आयुष्यात रस घेतला तर इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची गरज राहत नाही.
चला तर झाडे वेली,फूले पाखरे,ओढे नद्या
चंद्र तारे यांना मित्र बनवूया .त्यांच्या प्रेमात
वेडे होऊया!
- ना.रा.खराद