झेंड्याचा दांडा

           झेंड्याचा दांडा
                              - ना.रा.खराद
कोणताही झेंडा दांड्याशिवाय फडकत नाही , मात्र सर्वांना दिसतो तो फक्त झेंडा.आपली दृष्टी नेहमी शिखराकडे असते, पायथ्याशी आपणास देणेघेणे नसते, परंतु झेंड्याकडून आपली दृष्टी दांड्याकडे गेली पाहिजे.कोणतेही यश कुणा एकाचे नसते.ज्याने उंची किंवा शिखर गाठले त्याच्याही पायथ्याशी कुणीतरी आणि काहीतरी असतेच.
झेंड्याचा सन्मान करत असतांना दांडा नेहमी उपेक्षित राहतो.दांडा फडकत नाही,अचल राहतो म्हणून झेंडा फडकू शकतो.तो दांडा देखील जमीनीच्या आधाराने उभा राहतो, जमीन कशाच्या आधारे उभी आहे, इथपर्यंत आपले चिंतन गेले पाहिजे तेव्हा नतमस्तक आपोआपच होते.जे आपोआप होते तेच खरे असते.
उंच उंच इमारती बघतांना ते बांधणारे हात आपणास दिसले पाहिजे.स्वच्छ,सुंदर जागा बघून ती जागा स्वच्छ करणारे हातही आपण शोधले पाहिजेत.निवडून आलेल्या नेत्यांवर गुलाल 
उधळताना ज्यांनी निवडून आणले किंवा दिले ते मतदार आपणास दिसले पाहिजे.जेव्हा जिथे ईमानदारी, शिस्त,न्याय ,सत्य,प्रेम आढळते तेव्हा हे गुण रुजविणाऱ्या शाळा आणि शिक्षक आपणास दिसले पाहिजेत.एखादा गरीब मुलगा जेव्हा मोठा अधिकारी होतो तेव्हा त्याच्यासाठी ज्यांनी त्याग केला ती सामान्य
समजली जाणारी परंतु  असामान्य माणसेही आपण शोधली पाहिजेत.
आपण सर्व झेंड्याला सैल्यूट मारणारी माणसे,दांडा कायम दूर्लक्षितच राहतो.आपण यश बघतो ,त्याग बघत नाही.घोड्यावरचा नवरदेव बघतांना घोडाही दिसला पाहिजे.स्वादिष्ट जेवण मिळाले तर स्वयंपाकी बघितलाच पाहिजे.
वटवृक्ष बघतांना त्याच्या मुळ्याही लक्षात घ्याव्यात.दिसत नसल्या म्हणून त्या नसतात असे समजू नये.कुणाच्या तरी त्यागावरच कुणाचा तरी स्वार्थ साधला जातो.
कोणतेही यश एकट्याचे नसते मात्र उदोउदो एकट्याचा होतो. तमाशातील कलाकार आपणास दिसतात परंतु तंबू उभा करणारे कुणीच बघितलेले नसतात.बाजारातल्या शेंकडों
सुंदर वस्तू आपण बघतो परंतु कारखान्यात राबणारे हात आपणास दिसत नाही.विविध भाजीपाला,फळे आपण चालतो परंतु मातीत राबणारे हात कधी आपण हातात घेत नाहीत.
आपणास अधिक शोधक होणे गरजेचे आहे.अधिक कृतज्ञ होणे आवश्यक आहे.या दिशेने पाऊले पडावीत आणि मानवतेला अधिक बळकटी मिळाली एवढीच प्रार्थना करतो.
                   
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.