दरवाजा

               दरवाजा
                      - ना.रा.खराद
प्रत्येक खोलीला दरवाजा असतो.ती खोली भले कोणतीही असो.तो आपला रक्षक असतो.त्याच्या भरवशावर आपण निश्चिंत असतो.आतून आणि बाहेरून तो बंद करता येतो.दरवाजा आड आपले खरे जग असते.
आत शिरण्याचा आणि बाहेर पडण्याचा तो
मार्ग. अनेकांचे दरवाजे आपण झिजवलेले असतात तर अनेकांचा दरवाजा देखील आपणास माहीत नसतो.एखाद्यास किंवा एखादा आपणास दारात उभा करत नाही. कुणासाठी तरी आपले दरवाजे बंद असतात ,कुणासाठी कायमचे उघडे. दरवाजा साक्षी असतो ,सर्व घटनांचा. आल्या गेल्यांचा.
भिकारी दरवाजात थांबतो.खरे म्हणजे दरवाजा मर्यादा पाळतो.घरातल्या स्रिया दरवाजा ओलांडत नाहीत. बाहेरचा व्यक्ती दरवाजात थांबतो.बंद असेल तर ठोठावतो.
दरवाजा मजबूतच असतो असे नाही. काड्यामुड्यांच्या घरांनाही दरवाजे असतात.
दरवाजा घराचे प्रवेश द्वार असते. किल्ल्यांनाही दरवाजे असायचे.दरवाजा बंद केला की हिरकणी निर्माण होते. चोर दरवाजा तोडून आत घुसतात. दरवाजा केवळ घरांनाच असतो असे नाही. शाळा,दवाखाने,बैंका वगैरे. अनेक मोठी कारस्थाने बंद दरवाजात होतात. अवेळी दरवाजा बंद झाला तर त्याचे अर्थ काढले जातात. दरवाजा वेळेवर उघडला नाही तर त्याचीही चर्चा होते. कुणी नसतांना दरवाजा उघडा असेल तर विचारणा होते. रात्री कुणी दरवाजा ठोठावला तर भिती वाटते.चोर.बाहेरून दरवाजा बंद करतात.
अनेक मंदिराचे दरवाजे उघडणे शक्य होत नाही. दरवाजाआडचे रहस्य दडलेले असते.
दरवाजा बंद करून आत्महत्या केली जाते.
दरवाजातून आत डोकावण्याची कुणाला सवय असते. कुणाची वाट बघतांना दरवाजात आपण उभे राहतो. पाहुण्यांना निरोप देतांना दरवाजा पर्यंत येतो.नवी नवरी दरवाजात पाऊल टाकतांना ओवाळली जाते.
रागाने घर सोडतांना दरवाजा साक्षीअसतो.सासरी जाणारी मुलगी दरवाजा सोडतांना गहिवरते.आई बाबा दरवाजातून निरोप देतात. आयुष्यभर ज्या दरवाजातून ये जा केली ,अंत्य समयी त्यातूनच शव बाहेर निघते पुन्हा परत कधीच न येण्यासाठी!

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.