- ना.रा.खराद
गणित हा तसा माझा आवडीचा आणि नावडीचा विषय राहिलेला आहे.मी कधीही या विषयाची साथ सोडलेली नाही अथवा पूर्णपणे त्यास चिकटतो नाही.खरे म्हणजे कोणत्याही एका विषयाला चिकटून राहणे माझा स्वभाव नाही, कोणत्याही विषयाची विषय वासना माझ्यामध्ये कायम राहिली नाही.
शालेय जीवनात अनेक विषय,पैकी गणित आवडीचा विषय.सुत्र, चिन्हे वगैरे गंमत वाटायची, उत्तरापर्यंत पोहोचलो की आनंद व्हायचा.गणिताशी माझे तसे वैर मूळीच नव्हते.बालवयात गणित हा आवडीचा विषय होता,गणितामुळे इतर विषयांकडे दुर्लक्ष होत असे.जो गणित सोडतो तो हुशार असा एक त्यावेळी समज होता,गणिताचे शिक्षकच तसा प्रचार करत असे.
एकाच वेळी इतक्या विषयाचा अभ्यास करून पास व्हायचे म्हणजे मोठी कसरत होती, परंतु पास होणे किती सोपे असते, हे परीक्षेत कळाले.माझ्यासारखे मठ्ठ विद्यार्थी देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे.
गणित हा आकड्यांचा खेळ.बालवयात चिल्लर पैशांचा हिशेब करताना नाकी नऊ यायचे, पुन्हा नऊ हा आकडाच, जिथे तिथे गणित.बालवयात किराणा दुकानात पाठवायचे ,घरी आलो की हिशोब द्यावा लागायचा, काही पैसे वाचवण्यासाठी कसरत करावी लागत असे.त्रेधा उडत असे.
घरी पाहुणे आले की गणित पुन्हा डोके वर काढत असे.'पाढे पाठ आहे का? ' पाहुण्यांचा कायम भेडसावणारा प्रश्न.पाहुणा घरी आला की गणिताचा मास्तर घरी आल्यासारखे वाटायचे.गणिताशी माझे गणित कधी पूर्ण जुळलेच नाही ते कायम अपूर्णांकात राहिले आहे.
मला फार हिशोबाने वागणे देखील कधीच जमले नाही.नफा आणि तोटा यामध्ये तोटाच माझ्या वाट्याला आला आहे.जीवनाच्या गणितामध्ये आकडेवारी उपयोगाची नसते.
टक्के वगैरे शब्द खुपच व्यावहारिक पातळीवर घेऊन जातात.जीवनात मोजमाप नसावे.मुठीत बसेल तेवढे दिले किंवा घेतले ते पुरेसे.उगीच कुठेही तराजू घेऊन बसणे मला भावतो नाही.कितीही कमी असो , परंतु ते मोजलेले नसावे.निसर्ग जसा आपल्याला भरभरून देतो.तसे आपणही थोडे सैल ,उदार
असले पाहिजे.
प्रमाण राखण्यासाठी गणित आवश्यक असले तरी प्रमाणाबाहेर जे आहे त्यासाठी गणित नाही.कोण किती हसला आणि रडला ह्याचे गणित मांडू नये.आकड्याशिवाय जीवन जगता आले पाहिजे.गणिताचा व्यावहारिक उपयोग आहे.परंतू गणित जिथे अपूरे पडते तिथे ते अव्यावहारिक आहे.