- ना.रा.खराद
जीवन अपरिहार्यतेचे दूसरे नाव आहे.इच्छेप्रमाणे जगता न येणे जीवनाची अपरिहार्यता आहे.नको तिथे, नको तसे, नको त्याच्यासोबत जीवन कंठावे लागणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे.
जीवन हे स्वच्छंदी, ऐच्छिक असावयास हवे परंतु जन्माच्या अगोदरच जोखड तयार असते, जन्मताच ते वेढा टाकते आणि मनुष्य त्या जोखडात तडफडत राहातो.
बसमध्ये बसण्यासाठी सीट नसली म्हणजे उभे राहून प्रवास करावा लागतो, अपरिहार्य आहे.जीवनभर असेच घडते.तारेवरची कसरत
आयुष्याच्या तारेवरची असते.
अपरिहार्यता हे एक जोखड आहे, तडजोड आहे.आयुष्यभर तडजोड करण्यापलीकडे कुणी काही करत नाही.जिथे तिथे तडजोडीत आयुष्य काढावे लागते.मनासारखे जीवन न जगता येणे मोठी शोकांतिका आहे म्हणून जीवनात दुःख आहे.
हजारों प्रकारची अपरिहार्यता आपणास छळत असते.जे करु नये ते करायला लावते.ज्याचे तोंड बघू नये त्याच्या गळ्यात पडायला लावते.गर्दीतमध्ये खेटणे आणि खेटून देणे अपरिहार्य असते.धक्के खाणे अपरिहार्य असते.
कर्णकर्कश आवाज आपण बंद करु शकत नाही, ऐकणं अपरिहार्य असते.आपली निंदानालस्ती कानावर पडते,कुणाचे तोंड बंद करता न येणे अपरिहार्यता असते.
कामाचा कंटाळा आला तरी काम करणे अपरिहार्य असते.कर्तव्य हे अपरिहार्य असते, ते निभावेच लागते.बांधिलकी अपरिहार्यता आहे.एखादे जनावर जसे खुंटीला बांधून असावे,तसेच आयुष्य अपरिहार्यतेचा खुंटीला बांधलेले असते.जागेवर घिरट्या घालत आयुष्य काढणं ही अपरिहार्यता आहे.
जीवन मनसोक्त जगता न येणे , जिथे तिथे नियम ,कायदे , नैतिकता वगैरे काटेरी कुंपण घालतात आणि मनुष्य फक्त त्याचे पालन करतो कारण तो समाज नावाच्या सामूहिक अपरिहार्यतेचा गुलाम असतो.देशाची गुलामी तर समजते परंतु आपण खरे व्यवस्थेचे गुलाम असतो, व्यवस्था सांगेल तसे जगणं आपली अपरिहार्यता असते.
जन्माने नातेवाईक मिळतात, त्यांच्या सोबत कायम सौख्य बाळगून राहवे लागते.पटो अथवा न पटो संबंध ठेवावे लागणे अपरिहार्यता आहे.
लग्न नावाच्या बेडीने तर कहर केला आहे.नवरा कसाही असो , बायको कशीही असो.निभावून घ्यावे लागते.मुले कसेही असले तरी त्यांचे लाड पुरवत त्यांच्याशी काडीमोड करता येत नाही.
नोकरीच्या ठिकाणी तर खुप गळचेपी Boss ला हवे तसे वागावे लागते.ते बदलत राहतात आणि हा जुळवून घेत राहातो, फार जीवघेणी अपरिहार्यता असते.
अनेक सरकारे तडजोडीने चालतात,त्यांची अपरिहार्यता आहे.अपरिहार्यता सर्वांच्या वाट्याला येते, कदाचित तेच दैव असेल.आपल्या मनाविरुद्ध जे घडते ते दैव होय.
सर्वच वयातील सर्वच या अपरिहार्यतेत अडकून पडलेले असतात, परंतु त्याची एकदा सवय झाली म्हणजे,विसरही पडतो, आणि हे मुर्छित जीवन अपरिहार्यता आहे.जीवन जगणे कमी, जीवन कंठणे म्हणणे अधिक योग्य आहे.