- ना.रा.खराद
सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा,असलेली माणसे मोठी मानली जातात, परंतु हे खरे असते का? त्यांच्याठिकाणी मोठेपणा असतो का की लोकांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मोठे ठरवलेले असते,हे तपासणे गरजेचे आहे.
'जया अंगी मोठेपण..' कोणते मोठेपण दर्शवते.सामान्यपणे श्रीमंत लोकांना मोठे समजले जाते.एखादे लग्न मोठे झाले म्हणजे काय,अमाप पैसा खर्च केला.
अनेकांची संपत्ती ही त्यांच्या अगोदरच्या पिढीने जमवलेली किंवा कमावलेली असते तरीही त्यांच्या औलादींना मोठे समजले जाते.
पैशाला दिली जाणारी प्रतिष्ठा हे समाजाचे खरे चारित्र्य आहे.पैशाच्या बळावर मिळवलेले मोठेपण हे पैशाचे मोठेपण आहे.माणसे तशीच खुजी ,आखूड रहातात.हलकट विचार सोडत नाही.मूळात ज्या लोकांचे पैसे लूटले त्यांच्यावर तेच पैसे उधळून हे मोठेपण प्राप्त होते.
एखादा जमीनदार आहे म्हणून तो मोठा माणूस.जमीन मोठी असल्याने का माणूस
मोठा होतो.माणसाच्या ठिकाणी असलेल्या गुणांच्या आधारे माणूस मोठा मानला पाहिजे.
ज्याचा पैसा त्याच्यासाठी,मग कशाला उगीच
मोठा माणूस म्हणून आपण प्रचार करायचा.
त्याचा बंगला दोन कोटींचा आहे ,हे आपण का सांगत फिरायचे.त्याने तूला त्या बंगल्यात
बोलावून कधी चहा पाजला का? मग कशाला
फूकट लोकांच्या टिमक्या वाजत बसायचे ?
अनेक मोठी माणसे जी मानली जातात ती त्यांच्या अगोदरच्या पिढीमुळे.आपसूक आलेली संपत्ती, त्यातून मोठेपण.कशात मोठी
असतात ही माणसे मला कळत नाही.
लोक पैशामागे,फायद्यामागे असतात.मोठेपणा दिल्याशिवाय झोळी भरत नाही, हे भिकारी पण जाणतो.म्हणून तर तो मालक ,मायबाप वगैरे असे शब्द वापरतो.
स्वार्थी लोकांकडून होणारा उदोउदो ,हा खरेच
मोठेपणा आहे का? पण त्या भ्रमात ही मंडळी रहाते. एखाद्याकडे थोडा पैसा जास्त
असला किंवा आला की लगेच तो मोठा होतो.
पैसा असला की बाकी काही असण्याची गरज नाही ,असेच वाटू लागते.पैशाच्या जोरावर मिळवलेले हे मोठेपण अत्यंत भ्रामक आहे.
हे दूरुन साजरे असलेले डोंगर असतात.
पैसेवाल्यांना दिली जाणारी प्रतिष्ठा एकतर
भयातून असते नसता स्वार्थातून.तसे नसेल
तर प्रतिष्ठा का दिली जाते याचा विचार व्हावा.कष्टाने चार पैसे कमावून ,स्वाभिमानाने
जीवन जगणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा का दिली जात नाही.आपण जशा प्रकारच्या लोकांना 'मोठी माणसे' मानतो ,तो समाज त्याच लायकीचा आणि चारित्र्याचा असतो.