गैरफायदा

                गैरफायदा
 मनुष्य प्रत्येक बाबतीत स्वतः चा फायदा बघत असतो, ज्यामध्ये त्याचा फायदा आहे,अशी गोष्ट तो आवर्जून करतो.फायद्याचा विचार करुनच माणसे पाऊल उचलतात.प्रत्यक्ष वअप्रत्यक्ष,आज ना उद्या, कधीतरी जे आणि जो फायद्याचा
असेल तेच तो करतो.
 माणसे जशी माणसांचे नुकसान करणारे असतात,तशी माणसांचा फायदा करणारी देखील! आपल्या सोबत इतरांचेही भले पहाणारी माणसे असतात, त्याचबरोबर इतरांचे नुकसान झाले तरी चालेल, परंतु माझा फायदा झाला पाहिजे,अशी खुणगाठ काहींनी बांधलेली असते.जिथे फायदा तिथे ही मंडळी टपलेली असते.पैसा, पद यासाठी लाळ घोटणारी माणसे जिथे तिथे गैरफायदा घेतांना दिसतात.संधीसाधू वृत्तीची ही माणसे अलगदपणे आपला स्वार्थ साधून घेतात.कावळ्याची दृष्टी लाभलेले माणसातले हे कावळे होत.
चांगल्या माणसांच्या भोवती तर अशा लोकांचा गराडा असतो.ज्याच्यापासून फायदा आहे, फक्त त्याच माणसाला असले लोक महत्व देतात, इतरांना तुच्छ समजतात.चांगल्या लोकांची फसवणूक करुन आपली तुमडी भरण्याचे काम हे नतभ्रष्ट करत असतात.चांगला माणूस हेच
त्यांचे सावज असते.ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खाणारी,नरम लागले म्हणून कोपराने खणणारी नाठाळ माणसे.
 विश्वास टाकला तर दगा देणारी,मदत केली तर कायम हात पसरणारी, ऐकून घेतले तर मनात येईल ते बडबडणारी,सहन करतो म्हणून कायम त्रास देणारी असतात.
 इतरांच्या चांगूलपणाचा फायदा घेणारी, फायद्यासाठी स्तूतिसुमने उधळणारी, हारतुरे
घालणारी माणसे त्या आडून आपला गैरफायदा घेत आहेत, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
या जगात प्रत्येक सरळ माणसाला फसवले
जाते.कारण त्याच्या भोवती गैरफायदा घेणारे कायम असतात.फार चलाखीने ते
आपले इच्छित साध्य करतात.आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गैरफायदा घेतला जातो.
 चांगली माणसे जर वाईट मार्गावर गेली तर
वाईट लोकांना पळता भुई थोडी होईल.
सगळीकडे चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो,नसता वाईट माणसाला ताळ्यावर आणणे फार कठीण नसते.
 आपल्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेत असेल तर ' जशास तसे ' वागले पाहिजे.किमान आपण त्याचे सावज ठरु नये, इतके जरी करता आले तरी अशांची निराशा होईल व ते आपली वृत्ती सोडून देतील.
                    - 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.