दुकानदार
बाजारात विविध दुकाने थाटलेली , उभारलेली,मांडलेली असतात.गिऱ्हाईक गरजेप्रमाणे दुकान निवडतात.एकाच वस्तूंची अनेक दुकाने असतात,तर अनेक वस्तू एकाच
दुकानात मिळतात.जशी प्रत्येक दुकानांची काही
वैशिष्टे असतात,तशी दुकानदारांची देखील वैशिष्ट्ये असतात.
माला इतकीच चर्चा मालकाचीही असते.
अनेकवेळा मालक कसाही असो, परंतु माल चांगला मिळतो असे ग्राहक बोलतात,तर
माल चांगला आहे परंतु मालक नाही किंवा माल
खराब असेना का,पण मालक खुप चांगला आहे,असेही ग्राहकांचे मत असते.
छोट्या मोठ्या सर्वच दुकानात खरेदीसाठी जावे
लागते.दुकानदारामुळे कधी दुकान बदलले जाते.प्रत्येक दुकानदार आपल्या मूळ स्वभावानुसार वर्तण करतो.हास्यापद,वेंधळे, आचरटपणाचे, आततायीपणा, रागीट,संथ, उतावीळ, घाणेरडे,विलंबकारी अशा कितीतरी
प्रकारचे दुकानदार असतात.जसे दुकानदार प्रत्येक गिऱ्हाईक चोखंदळपणे हाताळतो ,तसे
गिऱ्हाईक देखील दुकानदाराला ओळखून वागते.
गोड बोलून आपला खराब माल ग्राहकांच्या घशी घालण्याचे कसब काहींकडे असते तर आपल्या
बाणेदार स्वभावामुळे खुप दुकानदार माशा मारत बसलेले असतात.काही दुकानदार अत्यंत
तटस्थ असतात, जून्या ग्राहकांना ओळख विचारण्याची तसदी घेत नाहीत.बडबडे दुकानदार आपलेच दुकान कसे चांगले आहे , हे
सांगत असतात, ग्राहकांना नको ते प्रश्न करुन
भंडावून सोडतात.
कित्येक दुकानदार खुप तुसडे असतात, ग्राहकांना सोयीचे बोलत नाही.कुणी तर कधीच
हसरा चेहरा करत नाही, कायम उधार विकल्या सारखे!
काही दुकानदार उपदेशक असतात,मालासोबत
हितोपदेश करतात.मितभाषी दुकानदार ग्राहकांशी ब्र शब्द काढत नाही.अति स्वच्छता
पाळणारे तर घाणेरडेपणाचा कळस गाठणारे काही दुकानदार असतात.
नीटनेटकेपणा काहींचे वैशिष्ट्य असते तर वस्तू
शोधण्यात वेळ घालवणारे दुकानदार असतात.
काहींच्या जीभेवर साखर असते तर काही कडू
लिंबाचा पाला पिलेले असतात.कुणी उद्धटपणे
बोलते तर फारच नमते!
जिथे मनुष्य तिथे त्याचे वैशिष्ट्य असणारच.
माणसे एकसारखी असती तर हे जग फार
कंटाळवाणे वाटले असते.
-