- ना.रा.खराद
पुणे म्हणजे ख्यातनाम शहर, शिक्षणाची पंढरी, सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे.पुण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, फक्त त्या माहिती असाव्या लागतात किंवा सोबतीला माहितीगार माणूस पाहिजे, किमान चुकीची माहिती देणारा तरी! पुण्याबद्दल काही जरी सांगितले तरी ते खरं वाटावं इतकं पुणे विलक्षण आहे.इतिहासातील कोणतीही घटना इथेच घडली असावी असे वाटते.
पुण्याची लोकसंख्या पहाता इथे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला असे वाटू लागते.शिक्षणाचे माहेरघर असल्याने इथे तरुणांचा ओढा जास्त, जिकडे तिकडे पोरांपोरींचे घोळके दिसतात.आपली मुले पुण्यात शिकतात, हे सांगताना, पूर्वी इंग्रजी शाळेत मुले असल्याचा जो अभिमान होता,तो दिसून येतो.
पुण्यातील गर्दी आणि घाई बघितली की माणसे अशीही असतात,याचे कुतूहल वाटते,कारण आमच्या ग्रामीण भागात असं काही नसतं.वाहने आणि त्यांची कोंडी हा इथला सातत्याने चालणारा खेळ.येथील रिक्शा हवेत चालल्यासारख्या चालतात, सुसाट! तरीही टक्कर नाही! पुण्यातील लहान सहान रस्ते या रिक्शावाल्यांना माहित असतात.बोळ,चाळ वगैरे सर्वकाही.
पुण्यातील मिसळ हा खाद्यपदार्थ येथील ओळख बनला आहे, पुण्यात जाऊन मिसळ न खाणे म्हणजे आग्रा येथे जाऊन ताजमहाल न पहाण्यासारखे आहे.
पुण्यात विदेशी लोक आहेत, परराज्यातील आहेत, त्यामुळे माणसाचे इरसाल नमुने इथे
बघायला मिळतात.उंच इमारती व तितकेच
खुजे मन असलेले लोक इथे आढळतात.
कुणालाही ओळख न विचारणारे व ओळख न सांगणारे पुणेरी लोक असतात.कामाच्या शोधात पुण्यात येऊन स्थायिक झालेले अनेक लोक, आपण अस्सल पुणेकर असल्याचे सांगतात.
पुण्यामध्ये हाँटेलमध्ये असलेले वेटर इतक्या थाटात असतात की त्यांना काही सूचना करण्याची हिंमत होत नाही.पुण्यात माणुसकी वगैरे शब्दांचे अर्थ स्वतःपुरते बघणे हाच आहे.
इथे कुणी कशासाठीच थांबत नाही.लघवी वगैरे इथे थांबवण्याचे कौशल्य हवे.इथे स्वतः प्रमाणे नाही तर शहरांप्रमाणे जगावे लागते.इथे एकदा मनुष्य रुळला की तो खरा पुणेकर होतो, काही केल्या पुणे तो सोडत नाही.
नाष्ट्यामध्ये पुण्यात उपमा,पोहे,मिसळ हे पदार्थ सांस्कृतिक ठेवा झाले आहेत,इतर पदार्थांना इथे थारा नाही.पुण्याचे आपले व्यक्तिमत्व आहे, ते जतन करण्यात पुणेकर धन्यता मानतात.
सांस्कृतिक वारसा,ठेवा वगैरे शब्द येथील रहिवाशी वारंवार वापरतात.इथे ज्या अनेक पेठा आहेत, त्यामध्ये बुधवार पेठ आपला वारसा टिकवून आहे.
इथे थांबला तो संपला तंतोतंत लागू पडते.पळणे,धावणे,धडपडणे पुणेरी जीवन आहे.
विसावा इथे आढळत नाही.क्षणांच्या विसाव्यासाठी इथे तास मोजावे लागतात.इथे आपले म्हणून कुणीही नसते, तरीही आपले पुणे म्हणत जीवन कंठायचे असते.
कृपया पुणेकरांनी अंगावर घेऊ नये,खरे असेल तरीही!