त्रास
- ना.रा.खराद
त्रास हा खूप त्रासदायक असतो, त्यामुळे तो कुणालाही कुणापासून आणि कशापासूनच नको असतो, तरीही तो होतो.कधी आपल्या पासून इतरांना तर कधी इतरांकडून आपणास!
त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, परंतु व्हायचा तो त्रास होतोच.त्रास हा कधी जाणीवपूर्वक दिला जातो तर कधी नकळत होतो.काहीही असले तरी प्रत्येक त्रासापासून माणसाला सूटका हवी असते.
त्रास करुन घेणे हा एक प्रकार असतोच.स्वत:चा
स्वतःला होणारा किंवा दिला जाणारा त्रास हा एक आत्मवंचनेतून होतो. संपर्कातील लोकांकडून होणारा त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास, वातावरण किंवा आरोग्य ह्याचा त्रास,सतत कोणतातरी त्रास हजर असतो.त्रास सहन करणे कित्येक ठिकाणी अगत्याचे असते, अपरिहार्य असते.
त्रास देणारे आपले शत्रू समजले जातात. त्रास होत असल्याचे कुणी सांगते , कुणी सहन करते.त्रास नसून कुणी त्रास असल्याचा गवगवा करते,तर कुणी त्रास देऊन,मी काय केले असा प्रश्न करते.त्रास होत असेल तर मुद्रा त्रासिक होते.
काही त्रास तात्पुरते तर काही कायम असतात.
इतरांना त्रास देणे काहींना सुखावते.इतरांना त्रास झाला की काहींना त्रास होतो.कोणताही त्रास सहन करण्याची एक मर्यादा असते.दुष्ट लोक हेतूपुरस्सर त्रास देतात.मूर्ख आणि अज्ञानी लोकांकडून निर्हेतुक त्रास होतो.
काही त्रास अपरिहार्य असतात.सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास सोसावा लागतो.शेजारी, मित्र, पाहुणे काही मागतात तेव्हा त्रास होतो.
मनस्ताप, पश्चात्ताप हा त्रास आहे.कधी त्रास होत असूनही वाच्यता करता येत नाही.कुठे त्रास होतो म्हणून दिला जातो.
कायम त्रास देणारा एखादा आजार किंवा मनुष्य असतो.त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी कधी अघोरी कृत्य केले जाते.त्रासापासून वाचण्यासाठी अंधश्रद्धेचाही अवलंब केला जातो.
एकंदरीत त्रास खूप प्रकारचे असतात, त्यापासून प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत असतो.योग्य उपाय करुन सुटका होते,कधी तडजोड तर कधी माघार,कधी आक्रमक तर कधी सौम्य पद्धतीने त्रास कमी केला जातो.परंतु त्रास हा होत राहणार.कुणापासून तरी, कशामुळे तरी आणि कधीही, कुठेही आणि कसाही!